जैवविविधता हे हिमालयाचे मोठे वैशिष्टय़. या भागात जैवविविधतेने नटलेली ३४ जागतिक ठिकाणे आहेत. पंधरा हजार हिमनद्या तेथे आहेत. आशियातील आठ मोठय़ा नद्याही तेथे असून दोन अब्ज लोकांचा आशियाना या नद्यांच्या खोऱ्यात आहे. हिमालयाच्या जैवविविधतेचा अभ्यास करण्यात डॉ. कमलजित बावा यांचे मोठे योगदान आहे. त्यांना अलीकडेच वनस्पतिशास्त्रातील मानाचा लिनियन पुरस्कार मिळाला आहे. सध्या डॉ. बावा बंगळूरु येथील ‘अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकॉलॉजी’ संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांचे संशोधन हे जैवविविधता व वनस्पतिशास्त्रातील आहे. विशेष म्हणजे लिनियन सोसायटी ऑफ लंडनचा हा पुरस्कार मिळालेले ते पहिलेच भारतीय वैज्ञानिक.

पृथ्वी ग्रह हा जैविक विविधतेने नटलेला आहे, पण त्यातील जैवविविधतेची माहिती सूचिबद्ध झालेली नाही, त्यासाठी अजून काम करण्याची आवश्यकता आहे, असे मत बावा यांनी व्यक्त केले आहे. बावा हे बोस्टनच्या युनिव्हर्सिटी ऑफ मॅसॅच्युसेट्स येथे जीवशास्त्राचे प्राध्यापक आहेत. उष्ण कटिबंधीय वनस्पती, लाकडापेक्षा वेगळी वनउत्पादने, मध्य अमेरिका, पश्चिम घाट व पूर्व हिमालयाची जैवविविधता हे त्यांच्या अभ्यासाचे विषय. ‘कन्झर्वेशन अ‍ॅण्ड सोसायटी’ नियतकालिक ‘इंडिया बायोडायव्हर्सिटी’ पोर्टल हे त्यांचे उपक्रम विशेष महत्त्वाचे आहेत.

बावा यांचा जन्म पंजाबचा. उत्क्रांती जीवशास्त्रज्ञ, संवर्धन जीवशास्त्रज्ञ ही त्यांची मुख्य ओळख. अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्सचे ते सदस्य, तर रॉयल सोसायटीचे फेलो आहेत. पंजाब विद्यापीठातून बीएस व एमएस केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील वॉशिंग्टन व हार्वर्ड विद्यापीठांतून शिक्षण घेतले. एकूण १८० शोधनिबंध त्यांनी लिहिले असून दहा पुस्तकांचे संपादन केले आहे. ‘सह्य़ाद्रीज इंडियाज वेस्टर्न घाट्स’ हा विशेषांक त्यांनी काढला होता. ‘हिमालया-माऊंटन्स ऑफ लाइफ’ व ‘सह्य़ाद्रीज’ ही दोन पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. नॅशनल जिऑग्राफिक सोसायटीच्या समितीत त्यांनी काम केले असून त्यांना यापूर्वी गनरेस सस्टेनिबिलिटी अवॉर्ड, दी सोसायटी फॉर कॉन्झर्वेशनचा जीवशास्त्र पुरस्कार, ग्युजेनहेम फेलो, पी. एन. मेहरा स्मृती पुरस्कार असे मानसन्मान मिळाले आहेत. मोठय़ा प्रमाणावर होणाऱ्या हवामान बदलांमुळे भारतातील जैवविविधतेची महत्त्वाची केंद्रे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत ती वाचवण्यासाठी त्यांनी अशोका ट्रस्टच्या माध्यमातून मोठे काम केले आहे. जैवविविधता क्षेत्रात जगातील धुरीणांपैकी एक असलेल्या बावा यांचा गौरव वनस्पतिशास्त्र व जैवविविधता क्षेत्रातील संशोधकांना प्रेरणा देणारा आहे.