‘दौड’ चित्रपट ज्यांनी पाहिला आहे त्यांना ‘चाको’ द ग्रेट लक्षात नाही असे होणारच नाही. चाको, दयाशंकर आणि उमापार्वती या तिघांमध्ये रंगलेला भन्नाट ‘शेर के पिछे पिताजी..’वाला संवाद आजही लोकांना तितकाच खळखळून हसवतो.  ‘दौड’चा उल्लेख जरी झाला तरी दोन घटका निखळ करमणूक करणाऱ्या चाकोच्या भूमिकेतील नीरज व्होरा यांचा चेहरा पहिल्यांदा डोळ्यासमोर येतो. आज विनोदी चित्रपट अगदी नावाला उरले आहेत. इरसाल विनोद रंगवणे, विनोदी व्यक्तिरेखा निर्माण करणे, अथपासून इतिपर्यंत लोकांची करमणूक करणारा चित्रपट लिहिणे आणि स्वत: अशा व्यक्तिरेखा अभिनयातून जिवंत करणे ही नीरज  यांची खासियत होती.

अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक तिन्ही आघाडय़ांवर त्यांनी केलेल्या चित्रपटांकडे नजर टाकली तर निखळ विनोद हाच त्यांचा मुख्य गाभा होता हे लक्षात येते. गुजरातच्या भूजमध्ये त्यांचा जन्म झाला, पण त्यानंतर त्यांचे कुटुंब मुंबईतच स्थलांतरित झाल्याने ते इथेच लहानाचे मोठे झाले. व्होरा यांचे वडील शास्त्रीय संगीतकार होते आणि शास्त्रीय संगीताचा वारसाच घरात असल्याने चित्रपट संगीत ऐक ण्याचीही जिथे त्यांना बंदी होती तिथे चित्रपट पाहणे तर दूरच राहिले. मात्र त्यांची आई चित्रपटप्रेमी असल्याने चित्रपटांचा खजिना त्यांच्यापुढे खुला झाला.. पण कारकीर्द म्हणून या व्यवसायाकडे वळण्यासाठी त्यांना वडिलांचेच सहकार्य लाभले हे विशेष. १९८४ साली त्यांनी केतन मेहता दिग्दर्शित ‘होली’ चित्रपटातून अभिनयाचा श्रीगणेशा केला. ते ज्या वेळी चित्रपटसृष्टीत आले तो काळ खरे म्हणजे केतन मेहता, श्याम बेनेगल, कुंदन शाह यांच्या वास्तववादी चित्रपटांचा होता. त्यामुळे नीरज यांनी आपला मोर्चा त्या वेळी टेलिव्हिजनक डे वळवला. ‘छोटी बडी बातें’, ‘सर्कस’सारख्या मालिकांमधून त्यांनी काम केले. त्यांना खरा सूर मिळाला तो ‘रंगीला’सारख्या गंभीर पण वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून.. ‘रंगीला’नंतर त्यांची कारकीर्द लेखक आणि अभिनेता म्हणून बहरली.

आपल्याकडे हिंदूी चित्रपटाच्या नायकाला नेहमीच एक साहाय्यक भूमिका लागते. मग ती कधी त्याच्या मित्राची असेल, भावाची असेल, काकाची असेल किंवा नायकाप्रति सहानुभूती असणारे एखादे आगळेवेगळे पात्र असेल.. ही जागा नव्वदच्या दशकातील चित्रपटांमध्ये नीरज यांनी भरून काढली. त्या काळाला अनुसरून प्रियदर्शन, रामगोपाल वर्मासारख्या दिग्दर्शकांबरोबर व्होरा यांची भट्टी जमली आणि एकापाठोपाठ एक विनोदी चित्रपट लेखक आणि अभिनेता म्हणून जन्माला आले. ‘बादशाह’, ‘रंगीला’, ‘दौड’सारख्या चित्रपटांतून कधी विनोदी, तर ‘मन’सारख्या चित्रपटांतून डोळ्यांतून पाणी आणणाऱ्या व्यक्तिरेखाही त्यांनी साकारल्या. अभिनयापेक्षाही त्यांची विनोदी लेखणी, संवाद सरस ठरले. ‘हेराफे री’, ‘फिर हेराफे री’, ‘आवारा पागल दिवाना’, ‘बादशाह’, ‘गोलमाल’ हे विनोदी चित्रपट जसे त्यांनी सहज लिहिले. तितक्याच सहजतेने त्यांनी ‘अकेले हम अकेले तुम’, ‘अजनबी’, ‘जोश’सारख्या वेगळ्या धाटणीच्या कथाही लिहिल्या. व्यावसायिक चित्रपटांना यशस्वी होण्यासाठी जो मसाला आवश्यक असतो तो त्यांच्या कथांनी पुरेपूर दिला, त्यात ओढूनताणून विनोद नव्हता की अंगावर येणारी दृश्ये नव्हती.

दुर्दैवाने, विनोदी कथालेखन आणि अभिनय या दोन्हींची जाण असणारा, ते तितक्याच ताकदीने प्रेक्षकांना देऊ शकणारा त्यांच्यासारखा हरहुन्नरी कलाकार त्यानंतर कोणी झालाच नाही. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी किती मोठी आहे हे अनेक कलाकारांनी त्यांच्याप्रति व्यक्त केलेल्या भावनांमधूनच स्पष्ट होते.