पृथ्वीच्या ओझोन थराला जे छिद्र पडण्यास क्लोरोफ्लुरोकार्बन्सचे प्रदूषण कारणीभूत आहे हे आता सर्वपरिचित आहे. पण ज्या काळात याबाबत काहीही माहिती नव्हती तेव्हा, पृथ्वीवरील मानवी कृत्यांमुळे ओझोनच्या थराचा ऱ्हास होतो आहे, हे सर्वप्रथम पॉल जे. क्रुटझन यांनी सांगितले. ओझोन थराचा ऱ्हास पृथ्वीच्या वयाच्या कुठल्या काळात सुरू झाला, याचे प्रमाणीकरण करण्याचा प्रयत्न क्रुटझन यांनी सर्वप्रथम केला. हे नोबेल-मानकरी पर्यावरणप्रेमी क्रुटझन यांचे नुकतेच निधन झाले.
अॅमस्टरडॅममध्ये जन्मलेल्या क्रुटझन यांना भौतिकशास्त्र व गणिताची आवड होती, पण नंतर ते हवामानशास्त्राकडे वळले. क्रुटझन यांचे बालपण कष्टात गेले. नाझीव्याप्त नेदरलँड्समध्ये ते वाढले. विद्यापीठातील शिक्षणासाठी, बांधकामांच्या ठिकाणी त्यांनी काम केले. नंतर स्वीडनमध्ये त्यांचे नवे आयुष्य सुरू झाले. स्टॉकहोम कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांना संगणक प्रोग्रॅमरची एक जाहिरात दिसली, ती नोकरी करतानाच त्यांनी हवामानशास्त्रात विद्यावाचस्पती पदवी घेतली. ऑक्सफर्ड विद्यापीठ, नॅशनल सेंटर फॉर अॅटमॉस्फेरिक रिसर्च या संस्थांत काम केल्यानंतर त्यांनी मॅक्स प्लांक इन्स्टिटय़ूट ऑफ केमिस्ट्री या संस्थेत प्रदीर्घ काळ काम केले. अनेक वैज्ञानिकांची कारकीर्द त्यांनी घडवली.
वणव्यांचा हवाप्रदूषणावर परिणाम, अणुयुद्धाचे परिणाम, ओझोन थराचा ऱ्हास यांबाबत त्यांनी जे संशोधन केले त्यासाठी त्यांना १९९५ च्या नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले. क्रुटझन यांनी अँथ्रोपोसिन ही वेगळी संकल्पना मांडली. नंतर असे लक्षात आले की, हा शब्द जीवशास्त्रज्ञ युजिन स्टॉर्मर यांनी १९८० मध्ये वापरला होता, पण त्या संकल्पनेला वैज्ञानिक बैठक क्रुटझन यांनीच दिली. अँथ्रोपोसिन या संकल्पनेला नंतर २००२ मध्ये जिऑलॉजी ऑफ मॅनकाइंड या शोधनिबंधात मान्यता मिळाली. ओझोन थरामुळे पृथ्वीवरील प्राणी व वनस्पतींचे अतिनील किरणांपासून रक्षण होते. पण मातीतील जिवाणूंकडून तयार केल्या जाणाऱ्या नायट्रोजन ऑक्साइडमुळे स्थितांबरातील ओझोन वायूचा थर नियंत्रित केला जातो असे क्रुटझन यांनी प्रथम सांगितले. ओझोन थराचे रसायनशास्त्र उलगडण्याचे काम त्यांनी केले. त्यातूनच प्रेरणा घेऊन मारिओ मोलिना व एफ शेरवूड रोलँड यांनी ओझोन थर क्लोरोफ्लुरोकार्बन्समुळे नष्ट होत असल्याचे स्पष्ट केले. ‘ट्वायलाइट अॅट नून’, ‘न्यूक्लिअर विन्टर’ यांसारख्या विज्ञान शोधनिबंधांतून त्यांनी पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे निर्माण होणारे धोके सांगितले होते. वसुंधरेचे प्रदूषणाच्या संकटापासून, माणसाच्या हावरटपणापासून संरक्षण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 5, 2021 12:01 am