23 October 2019

News Flash

प्रा. रवींदर दहिया

भारतीय वंशाचे वैज्ञानिक आंतरराष्ट्रीय पातळीवर नेहमीच चमकताना दिसतात

भारतीय वंशाचे वैज्ञानिक आंतरराष्ट्रीय पातळीवर नेहमीच चमकताना दिसतात, त्यातीलच एक नाव म्हणजे प्रा. रवींदर दहिया. त्यांचा विषय इलेक्ट्रॉनिक्स व नॅनोइंजिनीअरिंग हा असला तरी त्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर मानवी कल्याणासाठी केला आहे. त्यांच्या ‘ब्रेनी स्किन’ या विचाराच्या पातळीइतकी संवेदनशीलता असलेली त्वचा तयार करण्याच्या प्रकल्पाला १५ लाख पौंडांचे अर्थसाह्य़ मिळाले आहे. दहिया हे सध्या ग्लासगो विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनीअरिंगमध्ये प्राध्यापक असून त्यांनी भविष्यवेधी त्वचा तयार करण्याची संकल्पना प्रथम मांडली. त्यात खऱ्या त्वचेतील घटकांची नक्कल करून अतिशय लवचीक , अतिसंवेदनशील त्वचा तयार करण्यात त्यांनी मोठी प्रगती साधली आहे.

अनेकदा काही कारणांनी अवयव तोडावे लागलेल्यांना नैसर्गिक त्वचेमुळे असणारी संवेदना लाभत नाही, त्यांना ही त्वचा वरदान ठरणार आहे. त्याशिवाय संवेदनशीलता असलेली त्वचा धारण करणारे रोबोटही त्यातून तयार करता येणार आहेत. थोडक्यात हे कृत्रिम त्वचेचे जग असले तरी त्यात इलेक्ट्रॉनिक व अब्जांश तंत्रज्ञानाच्या मदतीने अभियांत्रिकीची कमाल असणार आहे यात शंका नाही. वयस्क लोकांना मदत करण्यासाठी परदेशात रोबोट असतात, त्यात रोबोट व मानव यांच्यातील आंतरक्रिया अधिक संवेदनशीलतेकडे झुकणारी असेल याची हमी माझे संशोधन देते, असे प्राध्यापक दहिया यांचे म्हणणे आहे. ब्रेनी स्किनमध्ये मानवी त्वचेप्रमाणेच न्यूरॉन्स असतील. तुम्ही तिला स्पर्श केलात की लगेच मेंदूला संदेश जाईल, सिलिकॉन आधारित न्यूरल ट्रान्झिस्टर व ग्राफिनची ही कमाल असणार आहे. कार्बनच्या पातळ पापुद्रय़ाइतकी जाड असलेली ही त्वचा अणूच्या जाडीएवढी, पण पोलादापेक्षाही मजबूत असेल. या त्वचेमध्ये प्रकाशीय विद्युत घट वापरले जाणार असून त्यातून प्रति चौरस सें.मी.ला २० नॅनोवॅट ऊर्जा उपलब्ध होईल. दहिया हे लवचीक इलेक्ट्रॉनिक उपकरणे व संवेदनशीलता तंत्रज्ञानातील तज्ज्ञ आहेत. त्यांचे मूळ संशोधन हे इलेक्ट्रॉनिक त्वचा, रोबोटिक यंत्रणा, प्रॉस्थेटिक्स  यात आहे. त्यांचे एकूण २०० शोधनिबंध व चार पुस्तके प्रकाशित आहेत. युरोपीय समुदायाच्या अनेक प्रकल्पांत त्यांनी नेतृत्व केले असून त्यांना मेरी क्युरी फेलोशिप मिळाली आहे. वयाच्या चाळिशीतील उत्तम स्कॉटिश वैज्ञानिकांमध्ये त्यांचा समावेश २०१६ मध्ये करण्यात आला आहे. मानवी जीवनात वेदना व समस्या भरपूर आहेत, त्या कमी करून अधिक कार्यक्षम कृत्रिम अवयव तयार करतानाच कृत्रिम त्वचेच्या स्पर्शातूनही मायेची ऊब निर्माण करणारे दहिया यांच्यासारखे वैज्ञानिक मानवतेची मोठी सेवा करीत आहेत यात शंका नाही.

First Published on July 6, 2018 2:07 am

Web Title: ravinder dahiya