विराट कोहलीच्या खेळाबाबत मला खूप आदर आहे, मात्र आक्रमक खेळ करताना त्याने स्वत:च्या नैसर्गिक शैलीचा उपयोग करावा, अशी सूचना ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने केली आहे.
‘‘कोहलीच्या खेळात खूप प्रगती झाली असली तरीही त्याच्या खेळात सुधारणेला वाव आहे. सचिन तेंडुलकरच्या खेळाशी त्याची तुलना केल्यास कोहलीने आक्रमक फटके मारताना अधिक आत्मविश्वास दाखविला पाहिजे,’’ असे ली याने सांगितले.
तो पुढे म्हणाला की, ‘‘प्रत्येक सामन्यात सचिन आपल्या खेळाचा बारकाईने अभ्यास करीत असे व त्याप्रमाणे सुधारणा करीत असे. अनुभवाच्या जोरावरच तो महान फलंदाज झाला. विराट हादेखील त्याच्यासारखाच नैपुण्यवान खेळाडू आहे, मात्र अजूनही तो विद्यार्थिदशेतच आहे.’’
‘‘भारतीय संघातील खेळाडूंनी सांघिक कौशल्यावर भर दिला, तर हा संघ उपांत्य फेरीत स्थान मिळवू शकेल. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिका यांच्याकडे उपांत्य फेरीत पोहोचण्याची क्षमता आहे,’’ असेही ली याने सांगितले.
स्पर्धेतील वेगवान गोलंदाजांविषयी ली म्हणाला, ‘‘मिचेल जॉन्सन, पॅट कमिन्स, जोश हॅझलवूड हे अतिशय गुणवान गोलंदाज आहे. भारताच्या उमेश यादवकडेही कोणत्याही खेळपट्टीवर प्रभावी गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. तो अतिशय संयमी खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीत सातत्य नव्हते, तसेच त्यांना फलंदाजांकडून अपेक्षेइतकी साथ मिळाली नाही. विश्वचषक स्पर्धेत भारतीय गोलंदाजांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली पाहिजे.’’