महाराष्ट्र-हरयाणातील विधानसभा निवडणुकांच्या बरोबरीने १७ राज्यांमधील ५१ विधानसभा मतदारसंघ आणि दोन लोकसभा मतदारसंघांत पोटनिवडणकांचे गुरुवारीच हाती आलेले निकाल भाजपला इशारा देणारे आहेत. दोन्ही राज्यांमध्ये भाजप जसा काठावर पास झाला आहे, तितकेच यश पोटनिवडणुकांमध्ये भाजपला मिळाले आहे. सुमारे तीस जागा भाजपने राखल्या; पण १२ जागांवर काँग्रेस विजयी झाला, तर उर्वरित जागा प्रादेशिक पक्ष वा अपक्षांच्या पदरात पडल्या. त्या अर्थाने पोटनिवडणुकांनीही भाजपला संमिश्र यशच दाखवल्याचे मानता येईल! सातारा आणि बिहारमधील समस्तीपूर लोकसभा मतदारसंघांत बिगरभाजप उमेदवारच निवडून आले. समस्तीपुरात रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्तीने काँग्रेसला धूळ चारली. उत्तर प्रदेशात सर्वाधिक ११ जागांवर लढाई होती. त्यात भाजप आणि मित्रपक्ष अपना दल यांना एकंदर आठ, समाजवादी पक्षाला दोन आणि बसपला एक जागा मिळाली. काँग्रेसचे उमेदवार सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये आघाडीवर होते. मात्र, दिवसाअखेर काँग्रेसची बाकी शून्य राहिली. काँग्रेसने मतमोजणीत काळेबेरे झाल्याचा आरोप केला असला तरी उत्तर प्रदेशात काँग्रेसची दुरवस्था पुन्हा दिसली. बिहारमध्ये भाजप आणि जनता दल (सं) या सत्ताधारी आघाडीला फटका बसला. किशनगंज या मुस्लीमबहुल मतदारसंघात ओवेसींच्या एमआयएमने भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला. नितीश कुमार यांच्या जनता दलाला फक्त एक जागा जिंकता आली.. लालू प्रसाद यांच्या राष्ट्रीय जनता दलाने मात्र दोन जागा जिंकल्या. बिहारमध्ये वर्षभराने विधानसभा निवडणूक होणार असून भाजपला इथे अधिक मेहनत घ्यावी लागणार असे दिसते. ईशान्येकडील राज्यांनी पुन्हा भाजपला कमळ फुलवण्याची संधी दिलेली आहे. सिक्किममध्ये तीन पैकी दोन जागांवर भाजप विजयी झाला. आसाममधील जागा भाजपला मिळणे अपेक्षितच होते. हिमाचलमधील धर्मशाळासह दोन्ही जागा भाजपच्या हाती लागल्या. अरुणाचलमध्ये दोन अपक्षांमध्ये लढत झाली. इथे प्रमुख पक्षांचे उमेदवार नव्हते. गुजरातमध्ये काँग्रेसमधील तगडा ओबीसी नेते अल्पेश ठाकूर याला भाजपने निवडणुकीच्या तोंडावर प्रवेश दिला पण, मतदारांनी अल्पेशला आणि भाजपलाही दणका दिला. मोदी-शहांच्या या राज्यात सहा जागांपैकी भाजपला तीन तर काँग्रेसलाही तीन जागा मिळाल्या. या तीन जागा म्हणजे काँग्रेसचा किंचितसा का होईना विजय मानायला हवा! बाकी हिंदी पट्टय़ातील मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थान या राज्यांमध्येही काँग्रेसलाच प्रत्येकी एक जागा मिळाली. या राज्यांनी काँग्रेसला थोडाफार हात दिलेला आहे. पंजाबमध्ये पुन्हा एकदा कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाकडे बघून मतदारांनी काँग्रेसला कौल दिल्याचे मानले जाते. पंजाबमधील चारपैकी तीन जागा काँग्रेसच्या पदरात पडल्या. ओडिशातील एकमेव जागेसाठी भाजप आणि बिजू जनता दलामध्ये लढत झाली, तिथे भाजप हरला. दक्षिण भारतात भाजपला पक्षाचा विस्तार करायचा असला तरी पोटनिवडणुकांच्या निकालावरून तरी ही वाट सोपी नसल्याचेच पाहायला मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी केरळमध्ये सबरीमाला प्रकरणाच्या हाताळणीने सत्ताधारी डाव्या आघाडीला अडचणीत आणले होते. पण पोटनिवडणुकीच्या निकालावर सबरीमालाचा कोणताही परिणाम झाला नसल्याचे दिसते. ही सत्ताधारी माकप आघाडी सरकारसाठी दिलासा देणारी बाब ठरली आहे. या राज्यातील पाचपैकी प्रत्येकी दोन जागा माकप आणि काँग्रेसला; तर एक जागा मुस्लीम लीगला मिळाली. चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला तारण्याचे काम केरळनेच केले होते. तमिळनाडूमध्ये दोन्ही जागांवर अण्णा द्रमुकने यश मिळवून द्रमुकसमोरील आव्हान कायम राखले आहे. शेजारील पुद्दुचेरीतील एकमेव जागा काँग्रेसला मिळाली आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये अद्याप तरी बिगरभाजप पक्षांनाच मतदारांनी पसंत केलेले आहे. पोटनिवडणुकांमध्ये उत्तर आणि ईशान्य भारतात भाजपच्या बाजूने कौल मिळाला; तर मध्य आणि पश्चिमेकडील राज्यांमध्ये तुलनेत काँग्रेसला अधिक संधी मिळाल्याचे दिसते. दक्षिणेतील राज्यांमध्ये मात्र प्रादेशिक पक्षांचीच सद्दी कायम राहिली, असे दिसते.