दावोस : जागतिक व्यापार संघटनेसारख्या बहुद्देशीय संघटनेत काही बदल अपरिहार्य असले तरी जागतिक व्यापार वाढण्यासाठी या संघटनेला खुलेपणाने आणि कार्यक्षमतेने काम करण्याची मोकळीक दिली पाहिजे, असे मत भारताचे माजी वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी येथे व्यक्त केले.

‘दी ग्रेट इंडो पॅसिफिक रेस’ या विषयावर येथे आयोजित परिसंवादात त्यांनी सांगितले की, व्यापार व सुरक्षेच्या क्षेत्रात महासागर हे महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. इंडो पॅसिफिक भागात खुल्या व्यापारउदिमास आपण पाठिंबा दिला पाहिजे. सहकार्याची भावना अंगीकारली तर या  भागात वाढीची मोठी क्षमता आहे. त्याचा योग्य वापर करून घेण्याची गरज आहे. याशिवाय सागरी मार्गाने काही भाग जोडलेले राहणे महत्त्वाचे आहे, यावरही त्यांनी भर दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जी २० राष्ट्रगटांच्या बैठकीतील  शेर्पा (व्यापार वाटाघाटीतील मार्गदर्शक किंवा वाटाडे) अशी प्रभू यांची भूमिका राहिली आहे. परराष्ट्र व्यापारातून मोठय़ा प्रमाणात रोजगार व उद्योग संधी निर्माण होत असतात, अशा व्यापाराला सुकर करण्याच्या भूमिकेतून त्यांनी वरील भूमिका मांडली.

जागतिक व्यापार संघटना गुंडाळण्याची सार्वत्रिक चर्चा सुरू असताना प्रभू यांनी उलट अशा दीर्घकाळाचा अनुभव असलेल्या बहुद्देशीय संघटनांना काम करण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन केले.

जागतिक व्यापार संघटनेच्या माध्यमातून गेल्या काही दशकात जागतिक व्यापार वाढीस लागला आहे. यासारख्या संघटनांमधून आर्थिक एकात्मता वाढीस लागते. म्हणून आपण तिला पाठिंबा दिला पाहिजे. जागतिक व्यापार संघटनेत बदल होणे गरजेचे आहे, कारण व्यापाराचे आजच्या काळातील स्वरूपही बदलले आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.