कर्मचाऱ्यांची कामगार न्यायालयात धाव

मुंबई : कर्ज थकबाकीदार असल्याने एशियन हॉटेल्स (वेस्ट) या कंपनीची मालकी असलेल्या मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक असलेल्या पंचतारांकित हयात रिजन्सी हॉटेलच्या व्यवस्थापनाने कामकाज स्थगित करून ग्राहकांसाठी दरवाजे तात्पुरते बंद करीत असल्याचे सोमवारी रात्री अकस्मात जाहीर केले. या हॉटेलची मालकी एशियन हॉटेल्स (वेस्ट) या कंपनीकडे असून, तिने करोनामुळे ओढवलेल्या आर्थिक संकटामुळे कर्जफेड थकल्याच्या परिणामी येस बँकेने कंपनीच्या एस्क्रो खात्यातील व्यवहार गोठवल्याने अशी परिस्थिती ओढवल्याचे म्हटले आहे. दरम्यान, हॉटेलच्या हवालदिल कर्मचाऱ्यांनी थकलेल्या वेतनाबाबत दाद मागण्यासाठी कामगार न्यायालयात धाव घेतली आहे.

करोना महासाथीच्या आघातामुळे संप्रू्ण आतिथ्य उद्योगावर आर्थिक संकट आले असून, त्याचाच फटका बसल्याने येस बँकेचे कर्जाचे हप्ते भरणे एप्रिल २०२१ पासून जिकिरीचे बनल्याचे एशियन हॉटेल्स (वेस्ट) या कंपनीने स्पष्ट केले आहे. मात्र हप्ते थकल्यानंतर येस बँकेने एस्क्रो खात्यात दैनंदिन व्यवसायातून जमा होणारी ही रक्कमही रोखून धरली. यातून वस्तू व सेवा कर, मूल्यवर्धित कर, टीडीएस अशी सरकारची करविषयक देणी भागविणे तसेच कर्मचाऱ्यांचे भविष्यनिर्वाह निधी तसेच कर्मचारी विमा योजनांतील योगदानही करणे कंपनीला अशक्य बनले. कंपनीच्या हजेरीपटावर ३००हून अधिक कर्मचारी असून, त्यांना वेतनही यातून देता आलेले नाही.

येस बँकेने या खात्यामधून केवळ विजेचे देयक, पाणीपट्टी आणि वायुपुरवठय़ाचे शुल्क भरण्यासाठी काही रक्कम काढण्याची मुभा दिली, असे एशियन हॉटेल्स (वेस्ट)कडून स्पष्ट करण्यात आले. कंपनीने २८ मे रोजी मुंबई शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, येस बँकेकडील एकूण थकीत कर्जाचे प्रमाण ४.३२ कोटी रुपये इतके आहे.