News Flash

निफ्टी पहिल्यांदाच ९,५०० पल्याड!

मंगळवारच्या सुरुवातीच्या व्यवहारातच सेन्सेक्स तसेच निफ्टीने नव्या विक्रमाला गवसणी घातली.

प्रतिकात्मक छायाचित्र

निर्देशांकांची विक्रमी आगेकूच कायम

भांडवली बाजाराच्या मुख्य निर्देशांकांची विक्रमी आगेकूच मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही कायम राहिली. कंपन्यांचे तिमाही निकाल आणि यंदा  मान्सून दमदार व लवकर सुरु होण्याचे पूर्वअंदाज यांच्या जोरावरील भांडवली बाजारातील उत्साह सेन्सेक्ससह निफ्टीला नवीन अनोख्या टप्प्यावर घेऊन गेला.

एकाच व्यवहारातील २६०.४८ अंश वाढीमुळे सेन्सेक्सने ३०,५९१.५५ हा ३०,६०० नजीकचा स्तर गाठला. तर ६६.८५ अंश वाढीने निफ्टी ९,५०० च्या वर जाताना सत्रअखेर ९,५१२.२५ वर स्थिरावला.

सेन्सेक्स व निफ्टीने अनुक्रमे ३०,५८२.६० व ९,५१७.२० ही व्यवहारातील उच्चांक नोंदवून, त्यांचे यापूर्वीचे सत्रातील ११ मे २०१७चे उच्चांकही मोडीत काढले. तर दिवसअखेरचा सर्वोच्च बंद स्तर अवघ्या एकाच व्यवहारात मागे टाकला. उल्लेखनीय म्हणजे निर्देशांकाच्या दिवसातील उच्चांकी स्तरावरच मंगळवारच्या व्यवहार संपुष्टात आले.

केंद्रातील प्रमुख सत्ताधारी भाजपाला लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्याच्या घटनेला बुधवारी तीन वर्षे पूर्ण होत असतानाच प्रमुख निर्देशांकांनी विक्रमासह अनोख्या टप्प्याद्वारे सलामी दिली आहे.

कंपन्यांच्या तिमाही वित्तीय निष्कर्षांपासून भांडवली बाजार सावरत असतानाच दक्षिणपूर्व मान्सून अंदमान निकोबार बेटांवर तीन दिवस आधीच दाखल होत असल्याची वर्दी भारतीय वेधशाळेने दिल्याचा परिणाम दिसून आला.

eco09

मंगळवारच्या सुरुवातीच्या व्यवहारातच सेन्सेक्स तसेच निफ्टीने नव्या विक्रमाला गवसणी घातली. ३०,३२२.१२ हा मुंबई निर्देशांकाचा सप्ताहारंभीचा उच्चांक मागे टाकत मंगळवारच्या व्यवहाराच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स ३०,४२४.३३ या नव्या उच्चांकाला पोहोचला. तर निफ्टी या वेळी ९,४६१ या विक्रमी टप्प्यावर सुरुवात करता झाला. त्याचा सोमवारचा सर्वोच्च टप्पा ९,४४५.४० होता.

त्याचबरोबर बाजारात गुंतवणूकदारांचे खरेदीसाठी मनोबल वाढविण्याकरिता मॉर्गन स्टॅनलेचा भारतीय अर्थव्यवस्थेबाबतचा ७.९ टक्के वेगही निमित्त ठरला. अमेरिकी वित्त संस्थेने डिसेंबर २०१७ पर्यंत विकास दराबाबतची ही प्रगती अंदाजित केली आहे.

मुंबई शेअर बाजारातील पोलाद हा क्षेत्रीय निर्देशांक वगळता इतर सर्व तेजीच्या यादीत राहिले. यामध्ये माहिती तंत्रज्ञान, वाहन, ग्राहकोपयोगी वस्तू हे आघाडीवर राहिले. त्यांच्यात २ टक्क्यांपर्यंतची वाढ झाली. तर मिड कॅप व स्मॉल कॅप अनुक्रमे ०.२७ व ०.३८ टक्क्याने वाढले. सेन्सेक्समधील २१ समभागांचे मूल्य वाढले. त्यात हिरो मोटोकॉर्प, भारती एअरटेल, टीसीएस, आयटीसी, स्टेट बँक, मारुती सुझुकी, डॉ. रेड्डीज्, विप्रो, हिंदुस्थान यूनिलिव्हर हे आघाडीवर होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2017 2:52 am

Web Title: nifty crosses 9500 marks for the first time
Next Stories
1 ‘इंडिया ग्रिड ट्रस्ट’ची प्रारंभिक विक्री आजपासून
2 परिवहन सेवांसाठी खासगी-सार्वजनिक भागीदारीचा पर्याय अपरिहार्यच
3 भांडवली बाजारातील गुंतवणूक धोरणावर ‘एलआयसी’ ठाम!
Just Now!
X