मुंबई : गेल्या चार सत्रांतील भांडवली बाजारातील मोठय़ा पडझडीने गुंतवणूकदार होरपळून निघाले आहेत. जगभरातील प्रतिकूल बाजार घडामोडींचे अनुकरण करीत झालेल्या धूळदाणीत गेल्या चार सत्रांत मिळून गुंतवणूकदारांनी १०.३६ लाख कोटी रुपयांची मत्ता मातीमोल झाली आहे.

अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हसह, जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी व्याजदरवाढीचे देण्यात आलेले संकेत आणि त्याच वेळी वाढत्या खनिज तेलाच्या किमती आणि वाढत्या भू-राजकीय तणावामुळे पुरवठय़ातील अडचणी या घटनांचे जगभरातील सर्वच बाजारात प्रतिकूल पडसाद उमटले आहेत.

देशांतर्गत भांडवली बाजारात शुक्रवारी सलग चौथ्या सत्रात झालेल्या घसरणीने सेन्सेक्स-निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांचे मोठे नुकसान झाले. गेल्या चार सत्रांतील आपटीने ‘सेन्सेक्स’ने तब्बल २,२७१ अंश गमावले आहेत, तर गुंतवणूकदारांच्या मालमत्तेत सुमारे १०,३६,६३६.१७ लाख कोटी रुपयांची घसरण झाली आहे. सप्ताहारंभी सोमवारच्या सत्रात मुंबई शेअरबाजारातील सर्व कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवलाचे मूल्य हे २,८०,०२,४३७ कोटी रुपये असे सार्वकालिक उच्चांकाला होते. मात्र परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आणि जागतिक पातळीवरील प्रतिकूल घटनांमुळे देशांतर्गत गुंतवणूकदारांनी नफावसुलीला प्राधान्य दिल्याने शुक्रवारच्या व्यवहाराअंती बाजार भांडवलाचे मूल्य २,६९,६५,८०१.५४ कोटी रुपयांवर रोडावलेले आढळून आले.

मागील तीन दिवसांप्रमाणे शुक्रवारी समभाग विक्रीचा प्रभाव भांडवली बाजारावर दिसून आला. नफावसुलीला अग्रक्रम मिळाल्याने निर्देशांकामध्ये सर्वाधिक योगदान राखणाऱ्या बजाज फिनसव्‍‌र्ह, लार्सन अँड टुब्रो आणि इन्फोसिसच्या समभागात मोठय़ा प्रमाणावर घसरणीचे सेन्सेक्समधील ४२७ अंशांच्या घसरणीत प्रमुख योगदान राहिले. सप्ताहाअखेरच्या व्यवहारात मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक ४२७.४४ अंशांच्या घसरणीसह ५९,०३७.१८ पातळीवर बंद झाला. सेन्सेक्सने दिवसभरातील सत्रात ५८,६२०.९३ अंशांचा तळ दाखवला. मात्र अखेरच्या तासात निर्देशांकातील सामील आघाडीच्या समभागांमध्ये झालेल्या खरेदीने तो मोठय़ा घसरणीतून सावरला. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १३९.८५ अंशांची घसरण झाली आणि तो १७,६१७.१५ पातळीवर दिवसअखेर बंद झाला.

सेन्सेक्समध्ये बजाज फिनसव्‍‌र्हच्या समभागाचे ५.३७ टक्क्यांच्या घसरणीसह सर्वाधिक नुकसान झाले. त्यापाठोपाठ टेक मिहद्रा, टाटा स्टील, भारती एअरटेल, लार्सन अँड टुब्रो, इंडसइंड बँक, बजाज फायनान्स आणि इन्फोसिसच्या समभागात घसरण झाली. दुसरीकडे, हिंदूुस्थान युनिलिव्हर, मारुती, एचडीएफसी, टीसीएस आणि एचडीएफसी बँकेचे समभाग प्रत्येकी २.६८ टक्क्यांपर्यंत तेजी दर्शवित स्थिरावले.

रुपया आठ पैशांनी सावरला

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात नरमलेल्या खनिज तेलाच्या किमती आणि बँका, निर्यातदारांकडून डॉलरची विक्री झाल्यामुळे शुक्रवारच्या सत्रात रुपयाला बळ मिळाले. मात्र परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सुरू असलेले निधीचे निर्गमन आणि भांडवली बाजारातील समभाग विक्रीचा मारा रुपयांच्या मूल्यवर्धनाला मारक ठरत आहे. दिवसअखेर चलन बाजारात, डॉलरच्या तुलनेत रुपयाने ७४.४० रुपयांचा उच्चांकी स्तर गाठला, तर दिवसभराच्या सत्रात ७४.५५ रुपये प्रति डॉलरचा तळाला त्याने स्पर्श केला होता. अखेर कालच्या बंद स्तरापासून ८ पैशांनी सावरत ७४.५१ प्रति डॉलर पातळीवर रुपयाचे मूल्य स्थिरावले.

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून भांडवली बाजारात सुरू असलेला समभाग विक्रीचा मारा आणि अमेरिकी डॉलरच्या तुलनेत कमकुवत झालेल्या रुपयामुळे देशांतर्गत भांडवली बाजारातील घसरण वाढली. परिणामी सप्ताहाअखेर सर्व प्रमुख क्षेत्रांमध्ये दबावाखाली व्यवहार सुरू होते. जागतिक पातळीवर वाढती महागाई आणि कंपन्यांची कमजोर तिमाही आर्थिक कामगिरीमुळे गुंतवणूकदार चिंताग्रस्त असून समभाग विक्रीला प्राधान्य देत आहेत. जागतिक पातळीवरील विविध प्रतिकूल घटनांसोबतच आगामी अर्थसंकल्पामुळे भांडवली बाजारातील अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे. 

– विनोद नायर, संशोधन प्रमुख, जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेस