तेजी कोलमडली ; विदेशी गुंतवणूकदारांचे पलायन

दोन्ही निर्देशांकात अनुक्रमे १.१३ टक्के आणि १.०४ टक्क्य़ांची घसरण झाली.

निर्देशांकांत सलग तिसरी घसरण

मुंबई : जागतिक बाजारातील कमजोरी आणि विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची अथकपणे सुरू असलेली विक्री याच्या एकत्रित परिणामाने भांडवली बाजाराच्या निर्देशांकांत शुक्रवारी सलग तिसऱ्या सत्रात घसरण झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकांची अत्युच्च शिखर स्तरापासून पडझडच नव्हे, तर त्यांनी तांत्रिकदृष्टय़ा महत्त्वाच्या पातळ्यांखाली घसरण झाल्याने आल्हाददायी तेजीही निमाल्याची बाजारात हवा आहे.

भांडवली बाजारात काही समभागांमध्ये कमालीचे वाढलेले मूल्यांकन आणि सप्टेंबर तिमाहीतील कंपन्यांच्या मिळकतीचे कमी-अधिक राहिलेले संमिश्र रूप याचेच प्रतिबिंब बाजाराच्या एकंदर नरमलेल्या मूडमध्ये उमटत आहे, असा दलालांचा सूर आहे.

जोरदार विक्रीच्या माऱ्यासह घसरणीसह खुल्या झालेल्या मुंबई निर्देशांक शुक्रवारी मध्यान्हापूर्वीच्या सत्रात काहीसा सावरून, ६०,००० पुढची कमावतानाही दिसून आला. तथापि ही सरशी अल्पजीवी ठरली आणि मंदीवाल्यांनी बाजारावर पुन्हा जम बसवला. दिवस सरत असताना, गुरुवारच्या तुलनेत आणखी ६७७.७७ अंशांच्या तुटीसह ‘सेन्सेक्स’ ५९,३०६.९३ वर बंद झाला. बरोबरीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक- ‘निफ्टी’ही १८५.०६ अंशांच्या नुकसानीसह १७,६७१.६५ या पातळीवर दिवसअखेरीस स्थिरावला. दोन्ही निर्देशांकात अनुक्रमे १.१३ टक्के आणि १.०४ टक्क्य़ांची घसरण झाली.

ऑक्टोबरमध्ये २०,००० कोटींची विक्री

’ चढे मूल्यांकन आणि त्याच्याशी निगडित जोखीम ही विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांसाठी चिंतेची बाब बनली आहे. जागतिक महत्त्वाच्या काही दलाली पेढय़ांनी भारतीय भांडवली बाजाराबद्दलचा दृष्टिकोन बदलून तो ‘तटस्थ’ असा खालावला आहे. त्यातून विक्रीला चालना मिळून, त्याच्या दबावामुळे आठवडाभर भांडवली बाजारात घसरण दिसून आली. ऑक्टोबर महिन्यात या गुंतवणूकदारांची नक्त समभाग विक्री २०,००० कोटींपुढे गेली आहे. मूल्यांकन वाढलेले असण्याबरोबरच, चलनवाढीच्या जोखीमही बाजारात अस्वस्थता निर्माण करीत आहे, असे एम्के वेल्थ मॅनेजमेंटचे संशोधनप्रमुख जोसेफ थॉमस यांनी प्रतिपादन केले.

अडीच टक्क्य़ांची साप्ताहिक आपटी ’ मागील सलग तिसऱ्या घसरगुंडीसह, साप्ताहिक स्तरावर ‘सेन्सेक्स’ १,५१४.६९ अंशांनी गडगडला. निफ्टी निर्देशांकांतील साप्ताहिक घसरण ही ४४३.२५ अंशांची आहे. दोन्ही निर्देशांकातील घसरणीचे प्रमाण अनुक्रमे २.४९ टक्के आणि २.४४ टक्क्य़ांचे राहिले. उल्लेखनीय म्हणजे दिवाळीच्या तोंडावर इतकी मोठी साप्ताहिक घसरण बाजाराने अनुभवली आहे. आगामी आठवडय़ात बाजारात तीन दिवसच व्यवहार होतील. गुरुवारी ४ नोव्हेंबरला लक्ष्मी-पूजनानिमित्त बाजारात सायंकाळी मुहूर्ताचे सौद्यांचे प्रतीकात्मक तासाभराचे व्यवहार होतील, तर शुक्रवारी बाजारातील व्यवहार सुटीनिमित्त बंद असतील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sensex tumbles 678 points nifty ends below 17 0 zws