‘सरदारी बेगम’, ‘मनपसंद’, ‘देस परदेस’, ‘लूटमार’ अशा डझनभर चित्रपटांचे निर्माते किंवा कार्यकारी निर्माते, ‘मनपसंद’मधल्या ज्या गाण्यांमुळे टीना मुनीम (आता अंबानी) गाजल्या त्या गाण्यांसह कित्येक गीतांचे कवी आणि मुख्य म्हणजे चित्रवाणीवर जेव्हा वृत्तवाहिन्यांचा सुळसुळाट झाला नव्हता, त्या काळात चित्रवाणी प्रेक्षकांपुढे विविधांगी मालिकांचा नजराणा ठेवणारे चित्रवाणी-निर्माते अशा विविध नात्यांनी अमित खन्ना परिचित आहेत. स्वत:ची ‘प्लस चॅनेल’ ही चित्रवाणी कंपनी १९८९ मध्ये खन्ना यांनी काढली, ती विकत घेऊन पण खन्ना यांना प्रमुखपदी ठेवूनच रिलायन्सला त्या क्षेत्रात पाय रोवता आले एवढं उदाहरण, खन्ना यांना व्यवसाय उमगला, हे सांगण्यासाठी पुरेसं आहे. गेल्या १५ वर्षांत दोन बिनीच्या इंग्रजी आर्थिक-वृत्तपत्रांत खन्ना यांनी मनोरंजन-व्यवसायाकडे एकंदर अर्थव्यवहाराच्या नजरेतून पाहणारी सदरंही दीर्घकाळ लिहिली..

..मग त्याचं आता काय एवढं?

आता अर्थातच पुस्तक! ‘वर्डस्, साऊंड्स, इमेजेस : अ हिस्ट्री ऑफ एंटरटेनमेंट इन इंडिया’ हे पुस्तकाचं नाव. ‘एंटरटेनमेंट इंडस्ट्री’ – ‘मनोरंजन (क्षेत्र नव्हे,) उद्योग’- हा शब्दप्रयोग ज्यांच्यामुळे प्रचलित झाला, अशा ज्येष्ठांपैकी अमित खन्ना हे असले, तरीही पुस्तकाच्या नावात ‘इंडस्ट्री’ नाही.. कारण खन्ना ‘इंडस्ट्री’ काळाच्याही आधीपासूनचा मागोवा घेताहेत. या पुस्तकाच्या पहिल्या काही पानांत तर अभिनगुप्त, भरतमुनी आणि कालिदासही आहेत. नंतर अर्थातच चित्रपटाकडे झालेली वाटचाल, या क्षेत्राचा सुवर्णकाळ आणि नंतरही टिकून राहिलेली सुगी.. चित्रपटांच्या अर्थकारणात झालेले मोठे बदल.. असं बरंच काही आहे..

..हो, पण आता नेटफ्लिक्स, एचबीओ वगैरे ‘स्ट्रीमिंग कंपन्यां’मुळे चित्रवाणी आणि चित्रपटांबद्दल काही म्हणायचंय का खन्ना यांना?

– पुस्तकाविषयी उत्सुकता वाढवणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर मुंबईत येत्या शुक्रवारी मिळेल! त्या दिवशी मेहबूब स्टुडिओत या पुस्तकाचं अनावरण होणार आहे.