सुहास सरदेशमुख

नगरपालिका निधी देताना दुजाभाव केल्याचा आरोप करत काँग्रेसमधील ११ आमदार नाराज असल्याचे चित्र जालन्याचे आमदार कैलास गोरंटय़ाल यांनी निर्माण केले. मात्र, त्यांच्याशिवाय मराठवाडय़ातील इतर काँग्रेसचे आमदार त्यांच्यासमवेत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नाराज ११ आमदार कोण, याची विचारणा होत आहे. नाराजीचा सूर मोठय़ा आवाजात आळविणारे गोरंटय़ाल यांनी इतर सहकारी आमदारांची नावे सांगण्यास नकार दिला. ‘आम्ही येत्या काळात नेत्यांना भेटू तेव्हा तुम्हाला कळेल’ असे म्हणत त्यांनी नावे सांगण्यास नकार दिला.

जालना नगरपालिकेचा २८ कोटी रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला होता. त्या विषयीची नाराजी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात तसेच मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त करण्यात आली. काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्या समवेत झालेल्या एका वेबबैठकीत निधीच्या विषयावरून पुन्हा एकदा चर्चा घडवून आणली गेली. अनेक जण नाराज आहेत असे सांगण्यात आले. आमदार गोरंटय़ाल यांची नाराजी पोहोचविण्याचे काम काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी केले. काँग्रेसच्या आमदारांना डावलून राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांना कामांसाठी निधी दिला जात असल्याच्या आरोपात काही अंशी तथ्यआहे. मात्र, नगरविकास विभागाने असे जाणूनबुजून केले असेल असे नाही, असेही काही काँग्रेस नेत्यांना वाटते.

नगरपालिकेच्या राजकारणातून आमदार होण्यापर्यंतचा प्रवास असणाऱ्या काही मोजक्याच आमदारांची ही तक्रार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, मराठवाडय़ातील काँग्रेसची या मागणीच्या समर्थनात एकजूट होण्याची शक्यता कमी आहे. मराठवाडय़ात काँग्रेसचे आठ आमदार आहेत. यामध्ये नांदेड जिल्ह्य़ात चार आमदार आहेत.  तर लातूरमध्ये अमित देशमुख आणि धीरज देशमुख याशिवाय परभणीमध्ये सुरेश वरपुडर यांचा समावेश आहे. कैलास गोरंटय़ाल यांचा नगरपालिका निधीवरून सुरू असणाऱ्या वादात यापैकी कोणीही नसल्याचे सांगण्यात येत आहे.

नांदेडमधील आमदार त्यांची गाऱ्हाणी अशोक चव्हाण यांच्या मार्फत सोडवून घेतात. लातूरच्या दोन्ही नेत्यांना इतर मतदारसंघात लक्ष घालायचे नाही. परभणी जिल्ह्य़ातील काँग्रेसचे राजकारण हे नगरपालिकांच्या समस्याभोवती फिरत नाही. त्यामुळे गोरंटय़ाल यांनी ११ आमदार नाराज असल्याचा केलेला दावा नक्की कोणाच्या भरवशावर असा प्रश्न विचारला जात आहे.

दरम्यान गोरंटय़ाल नाराज असल्याच्या वृत्तानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. निधीचे आश्वासनही दिले. त्यामुळे हा प्रश्न तूर्तास बाजूला पडल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र, गोरंटय़ाल यांची खदखद काँग्रेसची नाराजी नव्हती, असेही सांगण्यात येत आहे. मात्र काही शिवसेना व राष्ट्रवादीच्या ताब्यात असणाऱ्या नगरपालिकांना निधी मिळत असल्याचेही चित्र खरेच आहे पण त्यावरून सरकारवर काँग्रेस नाराज असे निर्माण झालेले चित्र मराठवाडय़ापुरते तरी खरे नसल्याचे आवर्जून सांगण्यात येत आहे.