छत्रपती संभाजीनगर : दोन दिवसांपूर्वी मंत्रीपदच भाड्याने दिल्याचा आरोप केल्यानंतर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांना लक्ष्य केले. बीड पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर माध्यमांशी बोलताना आमदार धस यांनी अत्यंत गंभीर आरोप केले. एकाच व्यक्तीच्या खात्यावर महादेव ॲपच्या माध्यमातून तब्बल ९ अब्ज रकमेचा व्यवहार झाला आहे. यासंदर्भाने दोन अधिकाऱ्यांचीही नावे पोलीस अधीक्षकांना दिली असून, त्याची लिंक मलेशियापर्यंत असल्याचे धस यांनी सांगितले.

धनंजय मुंडे यांनी गुरुवारीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांविषयीची बाजू मांडली. मुंडे हे सध्या बीडचे पालकमंत्रीपद मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याच्या चर्चेवरून धस यांनी त्यांना लक्ष्य करत, तुम्हाला तुमचे पालकमंत्रिपद लखलाभ राहो, असे सांगत त्यांच्यावर विविध आरोप केले.

परळीत राख माफियांचेही थैमान असून, यामागे कोण आहे, हे समोर आले पाहिजे, असेही ते म्हणाले. वेगवेगळ्या तारांकितांना आणून नाचवण्याचा ‘परळी-पॅटर्न’ असल्याचाही आरोप धस यांनी केला. पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांची बिंदूनामावलीप्रमाणे यादी देण्याची विनंती केली आहे. शनिवारच्या मोर्चामध्ये विविध जाती, धर्मातील नागरिक सहभागी होतील, असेही ते म्हणाले.

हेही वाचा >>> १३ हजार पगार असलेल्या कर्मचाऱ्याने घातला २१ कोटींचा गंडा; प्रेयसीला दिला ४ बीएचकेचा फ्लॅट, स्वतः घेतल्या आलिशान गाड्या

बीडमध्ये आज मूक मोर्चा

छत्रपती संभाजीनगर : केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपींना अटक करावी, यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी बीडमध्ये शनिवारी सर्व संघटना, राजकीय पक्षांच्या नेत्यांचा सहभाग असलेला मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चास शरद पवार येतील असेही सांगण्यात येत होते. मात्र, त्यांच्या उपस्थितीबाबतच्या वृत्तास अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

मोर्चाच्या संदर्भाने सोमवारी बीड शहरात आमदार संदीप क्षीरसागर आदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. मोर्चा काढण्याचा निर्णय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केला होता. यामध्ये छत्रपती संभाजीराजे, खासदार बजरंग सोनवणे आदी सहभागी होतील, असे आमदार क्षीरसागर यांनी सांगितले. मोर्चाला विविध राजकीय, सामाजिक संघटनांचाही पाठिंबा मिळत आहे. मोर्चामध्ये व्यापारी, वकील, डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षक आदी संघटनांनी सहभागी होण्याचे आवाहन माजी राज्यमंत्री सुरेश नवले यांनी केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोर्चा सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, माळीवेस, अण्णा भाऊ साठे चौक, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे.