छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागात कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातील पुराचे पाणी वळविणे शक्य आहे. तसा व्यवहार्यता अहवाल प्राप्त झाला असल्याचे ‘मित्रा’ संस्थेचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले. कृष्णा पूर नियंत्रण प्रकल्पाच्या माध्यमातून दुष्काळ निर्मूलन आणि पूरनियंत्रण या दोन्ही बाबी समोर साधल्या जाणार आहेत. जागतिक बँकेच्या सहकार्याने हाती घेण्यात आलेल्या या प्रकल्पास गती येईल, असा दावा केला जात आहे.
पावसाळ्यात समुद्रात वाहून जाणारे पुराचे पाणी दुष्काळग्रस्त भागाकडे वळविणे शक्य असल्याचे जागतिक बँकेची तांत्रिक सल्लागार असलेल्या ‘ट्रॅकबेल’ संस्थेने त्याच्या व्यवहार्यता अहवालात म्हटले आहे. व्यवहार्यता अहवालास हिरवा कंदील मिळाल्याने कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतून वाहून जाणारे पुराचे ५० अब्ज घनफूट पाणी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागासाठी उपलब्ध होणार आहे. अंदाजे १५ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पातून साडेतीन लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊ शकेल असे सांगण्यात आले.
कृष्णा खोऱ्यातील समुद्रात वाहून जाणारे ५० टीएमसी पाणी ९३ किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून गुरुत्वाकर्षण पद्धतीने उजनी धरणात वळविण्याचा प्रस्ताव आहे. २०१९ मध्ये कोल्हापूर आणि सांगली भागात आलेल्या पुरानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीर्घकालीन उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचाच एक भाग म्हणून पुराचे पाणी समुद्रात वाहून न जाऊ देता, त्याचा उपयोग दुष्काळग्रस्त भागाच्या सिंचनासाठी केला जाणार आहे. त्यासाठीच हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. एकूण १२६ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात ९३ किलोमीटर लांबीचा आणि १४ मीटर रुंदीचा बोगदा आणि ३३ किलोमीटर लांबीचा कॅनॉल असणार आहे.
आशिया खंडातील हा सर्वांत मोठा बोगदा ठरणार आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी ‘मित्र’ संस्थेच्या अधिनस्थ असलेल्या ‘कृष्णा पूर नियंत्रण प्रकल्प’ यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. पुणे येथील कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयात राणाजगजितसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कृष्णा पूरनियंत्रण प्रकल्पाची बैठक घेण्यात आली होती. बैठकीत प्रकल्पाचा व्यवहार्यता अहवाल जागतिक बँकेच्या तांत्रिक सल्लागाराकडून तीन महिन्यांच्या आत सादर करण्याचा निर्णय झाला होता. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने उपलब्ध करून दिलेल्या वस्तुनिष्ठ माहितीमुळे मुदतीच्या आत हा अहवाल पूर्ण झाला आहे.
उर्वरित १६.६६ टीएमसीपेक्षा अधिक पाणी मिळणार
मराठवाड्याच्या हक्काच्या २३.६६ टीएमसी पाण्यापैकी सात टीएमसी पाण्याचे काम सध्या सुरू आहे. उर्वरित १६.६६ टीएमसीपेक्षा अधिकचे पाणी या कृष्णा पूरनियंत्रण प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्यात येणार आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील पूरस्थिती नियंत्रित करता येणार आहे.