लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) सोशल स्टॉक एक्सचेंजवर बुधवारी सूचिबद्ध झालेली सहावी ना-नफा संस्था ‘रूट्स २ रूट्स’ ही कला आणि संस्कृती क्षेत्रातील पहिलीच कंपनी आहे. एनएसईच्या वांद्रे कुर्ला संकुल येथील मुख्यालयात आयोजित या सूचिबद्धतेच्या औपचारिक कार्यक्रमाला, कला, संगीत, उद्योग, चित्रपट तसेच शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती.

हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील जवळपास १०० शाळांमध्ये कला, संस्कृती आणि वारसा या विषयावर मोफत डिजिटल शिक्षण कार्यक्रम राबविणाऱ्या ‘रूट्स २ रूट्स’ या सूचिबद्धतेतून यशस्वीरीत्या अंदाजे एक कोटी रुपयांचा निधी उभारला असून, त्यातून तिच्या सध्या सुरू असलेल्या उपक्रमांना अधिक सक्षम बनविले जाणे अपेक्षित आहे. स्मार्ट क्लासरूम उपकरणे, संगीत वाद्ये आणि त्यांची देखभाल तसेच शिक्षकांना प्रशिक्षण याकामी हा निधी खर्च केला जाणार आहे, असे ‘रूट्स २ रूट्स’चे संस्थापक राकेश गुप्ता यांनी सांगितले. संस्थेच्या प्रारंभिक भागविक्रीने जबरदस्त मागणी मिळवली आणि विक्रमी वेळेत भरणा पूर्ण केला.

हेही वाचा >>>Gold-Silver Price on 4 April 2024: सोन्याच्या किमतीत ऐतिहासिक वाढ; चांदीही ७९ हजार रुपयांच्या पुढे, पाहा आजचा भाव 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सूचिबद्धतेच्या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेत्री जूही चावला, उद्योगपती जय मेहता, सतारवादक आणि बॉलीवूड संगीत दिग्दर्शक असद खान, संगीत दिग्दर्शक एहसान नूरानी, चित्रपट दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांच्यासह एनएसईचे व्यवस्थापकीय संचालक आशीषकुमार चौहान, तसेच सेबी आणि नाबार्डचे अधिकारी उपस्थित होते.