मुंबई: परदेशी गुंतवणूकदारांकडून नव्याने सुरू खरेदीच्या प्रवाहाने उत्साह दुणावलेल्या भांडवली बाजारात सेन्सेक्स-निफ्टीची शुक्रवारी सलग चौथ्या दिवशी आगेकूच कायम राहिली. आणखी ३०० अंशांची भर घालत सेन्सेक्सने ८४ हजारांची पातळी त्यामुळे पुन्हा सर केली.
आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज यासारख्या ब्लूचिप्सना खरेदीचे पाठबळ मिळाल्याने शुक्रवारी सत्रअखेर सेन्सेक्स ३०३.०३ अंशांनी वाढून ८४,०५८.९० वर स्थिरावला. सत्रातील उच्चांकी स्तरावरच त्याने दिवसाच्या व्यवहारांना निरोप दिला. निफ्टी ८८.८० अंशांनी वाढून २५,६३७.८० वर बंद झाला.
अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयातील मजबूती आणि आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती कमी झाल्याने सप्ताहसांगतेच्या सत्रात गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला. इस्रायल-इराण युद्धविरामानंतर निवळलेला ताण आणि संभाव्य अमेरिका-भारत व्यापार करारासंबंधाने वाढत्या आशावादामुळे बाजारातील तेजीला बळकटी मिळाली. साप्ताहिक आधारावर सेन्सेक्स १,६५०.७३ अंशांनी आणि निफ्टी ५२५.४ अंशांनी वाढला आहे. दोन्ही निर्देशांकांनी एकंदर २ टक्क्यांनी वाढ साधली. शुक्रवारच्या सत्रात मुंबई शेअर बाजारात २,२५१ समभागांनी वाढ साधली, तर घसरण झालेल्या समभागांची संख्या १,७६० अशी होती. व्यापक बाजारात खरेदीचा जोर होता, परिणामी बीएसई स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांक अनुक्रमे ०.५४ टक्के आणि ०.३८ टक्क्यांनी वाढले.
आखातातील युद्धबंदी आणि ९ जुलैच्या अंतिम मुदतीपूर्वी व्यापार तणाव कमी होण्याची आशा यासारख्या प्रमुख घटकांमुळे गुंतवणूकदारांच्या मनावरील चिंतेचे मळभ दूर सरले आहे. शिवाय सलगपणे काही दिवस सुरू राहिलेल्या विक्रीनंतर, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारही स्थानिक बाजारात खरेदीसह सक्रिय बनल्याने तेजीला आणखी हातभार लावला, असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.