श्रीकांत जाधव

प्रस्तुत लेखामध्ये आपण भारताचे आर्थिक सर्वेक्षण आणि केंद्रीय अर्थसंकल्प यांची परीक्षेच्या दृष्टीने  असणारी उपयुक्तता यावर चर्चा करणार आहोत. यूपीएससी मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर तीन मधील आर्थिक विकास या घटकासाठी हे दस्तावेज महत्वपूर्ण अभ्यास साहित्य आहे.  २०२० मध्ये कोरोना या महामारीमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असून या महामारीचा प्रादुर्भाव असल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची वृद्धी नकारात्मक झालेली आहे. भारत सरकारने मे २०२० मध्ये आत्मनिर्भर भारत या पॅकेजद्वारे अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी वित्तीय मदतीची घोषणा केली आणि विविध धोरणात्मक निर्णय जाहीर केले. याचा नेमका कोणता फायदा अर्थव्यवस्थेला होणार आहे या दृष्टीने परीक्षाभिमुख तयारी करावी लागेल. आर्थिक सर्वेक्षण आणि केंद्रीय अर्थसंकल्प हे दोन्ही दस्तावेज हे भारतीय अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती काय आहे, सरकारने  आखलेली धोरणे तसेच प्रस्तावित क्षेत्र निहाय खर्चाचे नियोजन, सरकारने साध्य केलेली ध्येय्ये व संबंधित आकडेवारी तसेच नवीन आखलेली धोरणे, योजना याची  माहिती यामध्ये असते.

भारताच्या आर्थिक सर्वेक्षणावर थेट प्रश्न विचारण्यात आलेले नसले तरी यामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित महत्वपूर्ण माहिती विस्तृत पद्धतीने दिलेली असते, ज्यामध्ये अर्थव्यवस्थेशी निगडीत प्रत्येक क्षेत्राशी संबंधित आखली गेलेली ध्येयधोरणे, आकडेवारी, असणारी आव्हाने, करण्यात आलेल्या उपाययोजना इत्यादीविषयी चर्चा केलेली असते. २०१९-२० चा भारताच्या  आर्थिक सर्वेक्षणामध्ये खंड दोनमधील पहिले प्रकरण ‘२०१९-२० मधील  भारताच्या आर्थिक कामगिरीचे अवलोकन’ हे आहे, ज्यामध्ये २०१९-२० मधील स्थूल देशांतर्गत उत्पादनातील वृद्धी, स्थूल देशांतर्गत उत्पादन आणि याचे घटक, बचत आणि गुंतवणूक, सार्वजनिक वित्त, किंमती आणि मौद्रिक व्यवस्थापन, परकीय व्यापार, २०१९-२० साठी वृद्धीची शक्यता, क्षेत्रनिहाय विकास ( Sectoral Developments) यामध्ये कृषी आणि कृषी संबंधित संलग्न क्षेत्रे, औद्योगिक, कॉर्पोरेट आणि पायाभूत सुविधा कामगिरी, सेवा क्षेत्र, सामाजिक सोयी-सुविधा, याविषयी माहिती आहे. तसेच शाश्वत विकास, ऊर्जा आणि हवामान बदल याचीही माहिती आहे. एकंदरीत हे प्रकरण संक्षिप्त स्वरुपात संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती काय आहे, यावर भाष्य करते. खंड दोन मधील इतर प्रकरणामध्ये उपरोक्त नमूद घटकांवर स्वतंत्र प्रकरणे देऊन सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. खंड एकमध्ये सरकारचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील धोरणात्मक नीतीचे अवलोकन केलेले आहे तसेच खंड दोनला परिशिष्टे जोडून अर्थव्यवस्थेविषयीची आकडेवारी देण्यात आलेली आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प आणि आर्थिक सर्वेक्षण यावर विचारण्यात आलेले काही प्रश्न.

*  २०१७-१८ मधील केंद्रीय अर्थसंकल्पात, उद्देशित उद्देशांपैकी एक उद्देश ‘भारताला रुपांतरीत करणे, उर्जावान बनविणे आणि भारताला स्वच्छ बनविणे आहे’. या उद्देशाला साध्य करण्यासाठी २०१७-१८ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात  प्रस्तावित केलेल्या उपायांचे विश्लेषण करा. (२०१७) या प्रश्नाचे उत्तर लिहिताना २०१७-१८ मधील

केंद्रीय अर्थसंकल्पात या उद्देशाला साध्य करण्यासाठी  प्रस्तावित केलेले उपाय काय आहेत आणि या उपायामुळे ‘भारताला रुपांतरीत करणे, उर्जावान बनविणे आणि भारताला स्वच्छ बनविणे या उद्देशाची पूर्तता कशी होईल’ या अनुषंगाने विश्लेषणात्मक पद्धतीने उत्तर लिहिणे अपेक्षित आहे.

*  २०१८-१९ मधील केंद्रीय अर्थसंकल्पात दीर्घकालीन भांडवली नफा कर (Long-term Capital Gains Tax-LCGT) आणि लाभांश वितरण कर (Dividend Distribution Tax-DDT) या संबंधित सादर करण्यात आलेल्या महत्वपूर्ण बदलावर भाष्य करा. (२०१८). या प्रश्नाचे उत्तर लिहिताना या दोन्ही करांची २०१८ पूर्वीची स्थिती आणि २०१८-१९ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आलेले बदल याचा  एक तुलनात्मक तक्ता देऊन यावर भाष्य करणे गरजेचे होते ज्यामधून यामुळे नेमका कोणता फायदा अर्थव्यस्थेला होणार आहे, हे अधोरेखित करणे अपेक्षित होते.

*  किमान आधारभूत किंमत ((MSP) यामुळे तुम्हाला काय समजते? किमान आधारभूत किंमत ही  शेतकऱ्यांना कशा प्रकारे कमी उत्पन्न पेचातून (low income trap) वाचवू शकते. (२०१८).

*  अलीकडील काळातील जागतिक व्यापारामधील संरक्षणवाद आणि चलन हाताळणीच्या घटना कशा भारतातील स्थूल आर्थिक स्थिरतेला  (macroeconomic stability of India)  प्रभावित करत आहेत? (२०१८).

*  अशा अप्रत्यक्ष करांची गणना करा जे भारताच्या वस्तू आणि सेवा कर(GST) यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. भारतात जुलै २०१७ पासून कार्यान्वित असणाऱ्या जी. एस. टी चे महसुली परिणाम यावर देखील भाष्य करा. (२०१९).

*  तुम्ही या मताशी सहमत आहात का? कीे स्थिर सकल देशांतर्गत उत्पादनातील (GDP) वृद्धी आणि कमी चलनवाढ यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला चांगल्या स्थितीमध्ये ठेवलेले आहे? तुमच्या युक्तिवादाच्या समर्थनात कारणे द्या. (२०१९).

आर्थिक विकास या घटकावरील प्रश्न सोडविण्यासाठी  हे दस्तावेज खूपच उपयुक्त ठरतात. बाजारामध्ये यावर  संक्षिप्तरूपाने  संकलन केलेली अनेक पुस्तके उपलब्ध असतात पण शक्यतो सरकारने प्रकाशित केलेले मूळ

दस्तावेज अभ्यासने  अधिक उपयुक्त ठरते. त्याचबरोबर हे दस्तावेज इतर पेपरसाठीदेखील साहाय्यभूत आहेत.