त्रिसूत्रा, नवी दिल्ली

प्रथमेश आडविलकर itsprathamesh@gmail.com

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) संशोधन गट म्हणजेच रिसर्च युनिट म्हणून कार्यरत असलेल्या या संस्थांपैकी एक महत्त्वाचे युनिट म्हणजे नवी दिल्ली येथे असलेले ट्रान्सलेशनल रिसर्च अँड इनोव्हेटिव्ह सायन्स थ्रू आयुर्जेनॉमिक्स (त्रिसूत्रा) हे केंद्र होय. त्रिसूत्रा ही संस्था आयुर्वेद, औषधी आणि आधुनिक जनुकीय विज्ञान (जिनॉमिक्स) या तिन्ही शाखांना एकत्र करून आपले नावीन्यपूर्ण संशोधन करते. त्रिसूत्रा हे सीएसआयआरच्या अधिपत्याखालील आरोग्य सेवांसंबंधी संशोधन करणारे देशातील एक महत्त्वाचे आणि प्रमुख संशोधन केंद्र आहे.

* संस्थेविषयी –

सीएसआयआरचीच नवी दिल्ली येथे असलेली एक महत्त्वाची संस्था इन्स्टिटय़ूट ऑफ जिनॉमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी (आयजीआयबी) या संस्थेच्या आवारात सीएसआयआरने हे केंद्र स्थापित केले आहे. हे केंद्र त्रिसूत्रा तसेच या क्षेत्रातील देशातील इतर संशोधन संस्थांच्या सहकार्याने आपले संशोधन करत आहे.  आयुर्वेद, औषध आणि आधुनिक जनुकीय विज्ञान (जिनॉमिक्स) यांच्या पारंपरिक ज्ञानावर आधारित लोकांना परवडणाऱ्या दरात औषधे उपलब्ध करून देणे या हेतूने हे संशोधन केले जात आहे. त्रिसूत्रा हे एक आंतरविद्याशाखीय केंद्र असून, ही संस्था आयुर्वेद, आधुनिक औषधी आणि जनुकीय विज्ञान यांदरम्यान मेळ घालण्याचे काम करत आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये मधुमेह, दमा, हृदयविकार, अपस्मार, स्ट्रोक, स्किझोफ्रेनिया आणि बायपोलर डिसऑर्डर यांसारख्या सामान्य आजारांच्या प्रसारामध्ये सतत वाढ झालेली आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे १% लोक या रोगांनी ग्रस्त आहेत. तसेच अनेकांच्या बाबतीत मधुमेह आणि लठ्ठपणा यांसारख्या एकत्र समस्या आहेत. आजारांच्या वाढत्या संख्येत ही संख्या खूपच जास्त आणि धोकादायक आहे. मनुष्याच्या सरासरी आयुर्मानाच्या वाढीमुळे ही एक मोठी चिंता बनलेली आहे. कारण यापैकी बहुतेक आजार संपूर्ण आयुष्यभर वाढत राहतात आणि रुग्णाला त्यामुळे दीर्घकाळापर्यंत महागडे औषधोपचार करावे लागतात. आधुनिक वैद्यकीय क्षेत्रात, रुग्णाची विविध रोगांसाठी असलेली संवेदनशीलता आणि औषधांसाठी असणारा प्रतिसाद ओळखण्यासाठी अनुवांशिक भिन्नता म्हणजेच जेनेटिक व्हेरिएशन या तंत्राचा वापर विविध पद्धतींनी करता येतो. नेमका हाच संशोधनाचा धागा पकडून त्रिसूत्राने आयुर्वेद, आधुनिक वैद्यकशास्त्र आणि जनुकीय विज्ञान यांना वरील आजारांवर मात करण्यासाठी एकत्र आणलेले आहे.

* संशोधनातील योगदान –

त्रिसूत्रा संशोधन केंद्राने आपल्या संशोधनाबरोबरच संस्थेने आंतरविद्याशाखीय संशोधनाला (Interdisciplinary research) प्राधान्य देत आयुर्वेद, आधुनिक वैद्यकशास्त्र आणि जिनॉमिक्स या तीन शाखांमधील मूलभूत संशोधनाशी योग्य समन्वय साधलेला आहे. संस्थेने आपल्या संशोधनातील विषयावर दीर्घ संशोधन करून अनेक आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रकाशित केलेले आहेत. त्रिसूत्रा आयुर्वेद, आधुनिक वैद्यकशास्त्र, जिनॉमिक्स आणि मॉलिक्युलर मेडिसिन या विषयांवर अधिक संशोधन करत आहे. संस्थेच्या संशोधनाचे हे प्रमुख विषय असून इतर संशोधन संस्थांच्या सहकार्याने अशा प्रकारचे संशोधन प्रकल्प राबवणे चालू आहे. या संशोधन प्रकल्पांमध्ये अगदी भारतीय जनुकांची विविधता इथपासून ते गुंतागुंतीच्या मानवी रोगांची जनुकीय रचना इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. विविध मानसिक व मेंदूशी संबंधित अनेक आजारांवर संशोधन करत असतानाच त्रिसूत्राने नेहमी अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वाटेने जात त्या रोगांच्या समस्येवर तेवढीच अद्ययावत उत्तरे शोधलेली आहेत. दरवर्षी संस्थेकडून कित्येक शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित केले जातात. याशिवाय देश-परदेशातील विविध विद्यापीठांबरोबर त्रिसूत्रा परस्पर सहकार्याने अनेक शैक्षणिक व संशोधन प्रकल्प राबवत आहे.

* विद्यार्थ्यांसाठी संधी –

सीएसआयआरच्या सूचनेनुसार त्रिसूत्रा या केंद्रात इन्स्टिटय़ूट ऑफ जिनॉमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी (आयजीआयबी) या संशोधन संस्थेच्या अंतर्गत Academy of Scientific & Innovative Research (AcSIR) नुसार पदव्युत्तर, पीएच.डी. व पोस्ट डॉक्टरल संशोधन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना पूर्ण करता येतात. तसेच पदवीधर विद्यार्थी लघुकालीन संशोधन प्रकल्पांसाठी येथे अर्ज करू शकतात. त्यामुळेच त्रिसूत्रा संशोधनाबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातील संशोधनाला पुरेसा वाव देण्याचे कार्यही करत आहे. त्रिसूत्रा देशातील व परदेशातील अनेक विद्यापीठांशी पीएच.डी. व पोस्ट डॉक्टरल संशोधन अभ्यासक्रमासाठी संलग्न आहे. भारतातील विविध विद्यापीठांमध्ये जिनॉमिक्स वा अनुवांशिकताशास्त्रासारख्या विषयांमध्ये पीएच.डी.चे संशोधन करणारे अनेक विद्यार्थी आपल्या संशोधनामध्ये येथील तज्ज्ञ व अनुभवी संशोधकांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी येथे नेहमी येत असतात. तसेच दरवर्षी सीएसआयआरच्या नेट, गेट वा तत्सम परीक्षांमधून गुणवत्ताप्राप्त अनेक जेआरएफ/ एसआरएफ विद्यार्थी इथे पीएच.डी.चे संशोधन करण्यासाठी प्रवेश घेतात. या संशोधक विद्यार्थ्यांना देशविदेशातील अनेक कार्यशाळांना पाठवून त्यांचे कार्य सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते.

*  संपर्क –

सीएसआयआर- ट्रान्सलेशनल रिसर्च अँड इनोव्हेटिव्ह सायन्स थ्रू आयुर्जेनॉमिक्स (त्रिसूत्रा) युनिट

सीएसआयआर- इन्स्टिटय़ूट ऑफ जिनॉमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी (आयजीआयबी)

साऊथ कॅम्पस, मथुरा मार्ग, सुखदेव विहार बस डेपोच्या विरुद्ध दिशेला, नवी दिल्ली ११००२५

ई-मेल – trisutra@igib.in

संकेतस्थळ –  http://www.trisutra.in/