मी राज्यशास्त्र या विषयात एम.ए. करत आहे. मी बहि:शाल पद्धतीने शिक्षण घेत आहे. प्रथमवर्ष तर मी पूर्ण केले, पण काही आर्थिक अडचणींमुळे द्वितीय वर्षांला प्रवेश घेऊ  शकले नाही. आता नोंदणी करण्याची वेळ निघून गेली आहे. मला पदव्युत्तर पदवी घ्यायची आहे. तसेच पीएच.डी.सुद्धा करायचे आहे. मी काय करावे?

चैताली पोळ

पीएच.डी. करण्यासाठी तुम्हाला पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करावाच लागेल. कारण पीएच.डी.साठी ती आवश्यक अर्हता आहे. त्यामुळे तू राज्यशास्त्र या विषयातच दुसऱ्या वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे गरजेचे आहे. तो बहि:शाल पद्धतीने केला तरी चालेल. तुला अद्यापही दुसऱ्या वर्षांला प्रवेश मिळू शकतो.

मी रसायनशास्त्रातून बीएस्सी करत आहे. सध्या पदवीच्या तृतीय वर्षांला आहे. मला ५५-६० टक्के गुण मिळाले आहेत. रसायनशास्त्रात उत्कृष्ट करिअर करण्यासाठी मी काय करायला हवे

उमेश कोळेकर

रसायनशास्त्रात उत्तम करिअर करण्यासाठी सर्वप्रथम दर्जेदार संस्थेमधून एम.एमस्सी करणे आवश्यक आहे. अशी संधी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (दिल्ली/ मुंबई/ मद्रास/ रुरकी/कानपूर/गांधीनगर/ इंदौर/गौहाटी/ धनबाद/ रोपर/पाटणा) आणि इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स येथील अभ्यासक्रमांद्वारे मिळू शकेल. आयआयटी भुवनेश्वर आणि खरगपूर येथे जॉइंट एमएस्सी- पीएच.डी. इन केमिस्ट्री या इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो.

आयआयटी मुंबई येथे डय़ुअल डिग्री एम.एस्सी-पीएच.डी. इन एन्व्हॉयरॉन्मेंटल सायन्स इंजिनीअरिंग या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो.(अर्हता- पदवी अभ्यासक्रमात किमान दोन वर्षांसाठी जीवशास्त्र/जैवतंत्रज्ञान/रसायनशास्त्र/गणित /भौतिकशास्त्र यांचा अभ्यास केलेला असावा.

आयआयटी भुवनेश्वर येथे जॉइंट एम.एस्सी- पीएच.डी. इन अ‍ॅटमॉस्फिअर अँड ओशन सायन्स या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. (अर्हता- पदवी अभ्यासक्रमात रसायनशास्त्र या विषयासह गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांचा समावेश असावा.

या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी तुला जॉइंट अ‍ॅडमिशन टेस्ट फॉर एम.एस्सी ही परीक्षा द्यावी लागेल.

मुंबईस्थित इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी या संस्थेतील एम.एस्सी इन केमिस्ट्री या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाल्यास उत्तम प्रकारचे करिअर घडू शकते. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी संस्थेमार्फत चाळणी परीक्षा घेतली जाते.

संपर्क – http://www.ictmumbai.edu.in

तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.)