30 September 2020

News Flash

प्रश्नांकित उत्तरायण

मुलं आणि पालक यांच्यातली वाढती दरी बघता प्रश्न पडतो, मुलांना जन्म दिल्या क्षणापासून केवळ त्यांच्यासाठी जगण्याचा अट्टहास मातापित्यांनी कमी करायला हवाय का?

| October 12, 2013 01:02 am

मुलं आणि पालक यांच्यातली वाढती दरी बघता प्रश्न पडतो, मुलांना जन्म दिल्या क्षणापासून केवळ त्यांच्यासाठी जगण्याचा अट्टहास मातापित्यांनी कमी करायला हवाय का? मुलाबाळांच्यात गुंतून राहण्याची मानसिकता बदलायला हवी का? जबाबदारी नको म्हणून कित्येक जोडपी मुलं नकोतच असा निर्णय एकमतानं घेताहेत. जी पिढी जबाबदारी नाकारण्यासाठी भावी पिढीचं जगात येणंच नाकारू  शकते ती पिढी अगदी सहजगत्या मागच्या पिढीचं अस्तित्वही नाकारू शकते, त्यात आश्चर्य वाटून घेण्यात काय अर्थ आहे?
 .. कुठं तरी काही चुकतंय नक्कीच!       
मुलं असूनही एकटेपण भोगायला लागणाऱ्या अनेकांच्या आयुष्यातील उत्तरायण अशा विचारांनी प्रश्नांकित झालंय..
बरेच दिवसांनी श्यामलचा फोन आला. ‘वेळ असेल तर ये ना भेटायला.. मला काही यायला जमायचं नाही.. तूच ये. खूप भेटावंसं वाटतंय..’ का कोण जाणे, पण श्यामल नेहमीसारखी प्रसन्न, हसरी वाटली नाही.. नाही तर फोन करून इकडच्या-तिकडच्या गप्पा मारणारी. ‘अगं हा सिनेमा पाहिलास का? ते अमकं नाटक बघितलंस का?’ असं भरभरून बोलणारी माझी ही मैत्रीण आज शांत, उदास वाटली. म्हणूनच मुद्दाम वेळ काढून गेलेच तिच्याकडे. संध्याकाळी निवांतपणे गप्पा मारता येतील असं वाटलं, पण कसलं काय, ही आपली स्वयंपाक घरातच गुंतलेली.. कामं आटोपून मगच कॉफीचे मग हातात घेऊन बाहेर आली.. ‘चल, बाल्कनीत बसू..’  म्हणत तिनं हुश्श्य केलं.. थकून गेलेली होती..केसांचा पांढरा पट्टा अधिक ठसठशीत वाटत होता नि चेहरा अधिक सुरकुतलेला..
‘‘श्यामल, अगं कधीची स्वयंपाकघरातच काम करते आहेस, बाई आहे ना.. मग कशाला एवढी मरमर.?’’
 ‘‘बाई होती म्हणून तर भराभरा आटोपून घेतलं सगळं.. नाही तर ती गेली की मलाच एकटीला करावं लागलं असतं सगळं.. आता होत नाही गं पूर्वीसारखं.. पण केल्यावाचून पर्याय नाही.. नाही लक्ष दिलं तर घराचं हॉस्टेलच होऊन जायचं.. काय करू सांग.. सुटकाच नाही बघ या सगळ्यातून.खरं सांगते तुला, इतका कंटाळा आलाय या सगळ्याचा की वाटतं सगळं सोडून पळून जावं कुठं तरी.. सगळ्यांसाठी करत राहा.. करत राहा.. जन्म संपून जायची वेळ आली.. पण आयुष्यातील कामं करणं संपत नाहीत..  आता तरी कुणी आपल्यासाठी करावं असं वाटतंय, पण..’’
 श्यामल माझ्यापेक्षा वयाने बरीच मोठी. सून-जावई आलेले.. सासू-सासरे शेवटपर्यंत हिच्याकडेच होते.. सासूबाईंचं आजारपण तीन र्वष काढलं तिनं.. ब्याण्णव वर्षांचे होईतो सासऱ्यांचं सर्व काही निगुतीनं केलं.. आज सून, मुलगा घरात असूनही हिची ही व्यथा.. तिच्या डोळ्यात आलेलं पाणी बघून माझा जीवही व्याकुळला.. कारण माझीही तीच व्यथा होती.. भरल्या घरातही एकटेपणा होता..
आणि मला वाटतं, सुशिक्षित, पांढरपेशा घरांतून अनेक स्त्रियांची हीच व्यथा असावी.. कारण नव्या पिढीची जीवनाकडं बघण्याची दृष्टीच बदलत चाललेली जाणवतेय.. घरातली प्रत्येक तरुण व्यक्ती त्यांच्या त्यांच्या विश्वात इतकी मग्न आहे की आई-बाबांचही वय झालंय, त्यांच्या गरजा बदलल्यात हेही पाहायला मुलांना वेळ नाही..  की त्यांना ते समजूनच घ्यायचं नाहीए ?
कुठं तरी काही चुकतंय नक्कीच!.. पण काय? भारतीय समाजव्यवस्थेचा एक भक्कम पाया म्हणून ज्याकडे बघितलं जातं, त्या एकत्र कुटुंबपद्धतीमुळे वयस्क स्त्रियांची घुसमट होताना दिसतेय. त्यांना स्वत:साठी वेळ देणं जमत नाहीय.. त्यामुळे होणारी प्रचंड मानसिक घुसमट, शारीरिक असाहाय्यता आणि आपल्यासाठी कुणाकडे वेळ नाही अशी एकटेपणाची भावना मधल्या पिढीला दु:खी करतेय.
आज पन्नाशी किंवा साठी ओलांडलेल्या मध्यमवयीन लोकांची ही पिढी म्हणजे जुन्या आणि नव्या पिढीच्या दरम्यानची पिढी आहे. या पिढीपर्यंत घरात चारपाच बहीणभावंडांचं कुटुंब होतं.. (कधी कधी यापेक्षाही अधिक सदस्य असायचे..!) मामा, मावशा, काका, आत्या अशी नाती आणि या नातेसंबंधातून येणारं आपलेपण, कुटुंबपण अनुभवलेलं, सोसलेलं आणि सहनही केलेलं असल्यामुळे सहनशीलता, दुसऱ्यासाठी करण्याची भावना मनात घट्ट रुजलेली. त्यामुळेच कर्तव्यपूर्तीची मानसिकताही मनात काठोकाठ रुजलेली.. बऱ्याच जणांनी लहान बहीण-भावांसाठी त्याग केलेला.. त्यांना होता होईल तशी मदत केलेली असल्यामुळे अजूनही त्या त्या पिढीतील लोक एकत्र कुटुंबपद्धतीला धरून आहेत. पण यामुळे कौटुंबिक सुखाची सापेक्षताच बदललेली आहे की काय असा प्रश्न मनात निर्माण होतोय.. कारण आपल्यापेक्षा वयानं मोठं असणाऱ्यांसाठी काही करण्याची, त्रास सोसण्याची आपली जबाबदारी आहे, असं ठामपणे मनाशी ठरवून घेतलेली ही पिढी, पण आता मात्र आपल्यासाठी करणारं कुणी नाही या भावनेनं खंतावतेय, दुखावली जातेय ..
हल्ली घरातून एक किंवा दोनच मुलं असतात. कधी एक मुलगा, एक मुलगी.. कधी फक्त दोन मुलीच.. तर कधी दोन मुलगे.. या मुलांना जेवढं देता येईल तेवढं देऊन आईबापांनी सर्व सुखं त्यांच्या पायाशी ओतलेली आहेत.. कारण बऱ्याच निम्न, उच्च आणि मध्यमवर्गीयांच्या घरी बऱ्यापैकी आर्थिक स्थैर्य आलेले असल्यामुळे आपल्याला नाही करता आलं, पण आपल्या मुलांना ही सुखं मिळावीत ही भावनाही या पाठीमागं असायची. मुलांसाठी भरभरून दिलं.. कशातही काही कमी पडणार नाही यासाठी प्रसंगी स्वत:च्या आवडीनिवडींना मुरड घातली.. त्याचबरोबर घरातील मोठय़ांची जबाबदारीही आनंदानं स्वीकारली.. आता ही पिढी उतारवयाकडं झुकलीय.. पण पुढच्या पिढीला या पिढीमध्ये गुंतून राहण्याची इच्छाच दिसत नाहीय.. किंवा त्यांचे स्वत:चेच व्याप इतके वाढलेत का की त्यापुढे आई-बाबांची माया, प्रेम, काळजी जाणवतंच नाहीए? एक मात्र नक्की त्याच्या झळा जुन्या आणि नव्या पिढीबरोबर वाढलेल्या या मधल्या पिढीला बसताहेत..!
श्यामलचेच उदाहरण घ्यायचे तर तिची वेदना तिच्यासारख्या अनेक जणींचे प्रतिनिधीत्व करतीय..तिच्या सासूबाई तीन वर्षे अंथरुणाला खिळलेल्या होत्या.. त्यांचे सर्व काही श्यामलने केले.. पण दोन शब्दांचा कौतुकपर दिलासा कधीही कुणाकडूनही मिळाला नाही, अगदी नवऱ्याकडूनही नाही.. ९२ वर्षांचे होईतो सासरे त्यांच्याबरोबरच होते.. त्यांची संध्याकाळची जेवणाची सातची वेळ सांभाळता सांभाळता श्यामलच्या आयुष्यातील किती तरी संध्याकाळी तडजोडी करत गेल्या.. कधीही एखादा सुंदर कार्यक्रम कळूनही त्याला जाता नाही आलं. प्रेम, कर्तव्य म्हणून श्यामलने सारं काही केलं, त्या बदल्यात फक्त दोन कौतुकभरल्या शब्दांची तिला गरज होती, परंतु  ती अपेक्षाही कधीच पूर्ण झाली नाही. इतकं गृहीत धरलं जातं का घरातल्या स्त्रीला?
आज श्यामल ६५ वर्षांची झालीय.. पण तिला मात्र ‘तुमच्यासाठी मी चहा नाश्ता करते’ किंवा तू थकलीस आई, आम्ही करतो आता..
असं म्हणणारं कुणीही नाहीय.. कारण मुलगा आणि सून नोकरी करताहेत.. पैसा कमावताहेत, सुनेला घरी आल्यावरही कॉम्प्युटरमधून डोकेवर काढायला फुरसत नाही.. आईला मुलाने सतत काम करतानाच पाहिलेलं असल्याने साहजिकच ती कामं तिनेच केली पाहिजेत,
असं कळत नकळत गृहीत धरणं होत असावं..
पण ज्या आईच्या पदराला धरून मुलं लहानाची मोठी होतात.. लग्न होईपर्यंत आई हेच ज्यांच्या भावविश्वाचं केंद्र असतं.. तीच मुलं लग्न झाल्यानंतर किती सहजपणे त्या परिघाच्या बाहेर पडतात.. हे पाहिलं की वाटतं, पत्नीच्या रूपानं दुसरी स्त्री जीवनात आली की इतकी चटकन बदलून जातात मुलं? असं का बरं घडत असावं? आमच्या पिढीचं काही चुकलंय का मुलांना घडवताना, त्यांना जीवनातील सर्व सुखं सहजगत्या उपलब्ध करून देताना? घेण्याबरोबर देण्याची जाणीव त्यांच्या मनात रुजवणंच आम्ही विसरून गेलो की काय?
सुषमा, माझी ४० वर्षांपासूनची मैत्रीण. आम्ही बरोबरीनं सरकारी नोकरीला लागलो.. अगदी अलीकडेच सुषमानं व्हीआरएस घेतली. अजून चार वर्षांची नोकरी शिल्लक असताना. का, तर मुलगा आणि सून दोघेही नोकरी करतात, मग नातवंडांकडे बघायला कुणी नको का? मिरजेचा बंगला बंद ठेवून सध्या ठाण्यात येऊन मुलं आणि सुनांबरोबर राहते आहे. किती सहजासहजी स्वत:चं आखीव-रेखीव, स्वतंत्र आयुष्य सोडून मुलांसाठी आणि नातवंडांसाठी तिनं जीवनाची पायवाटच बदलली.. आईवडिलांनी फक्त मुलांसाठी कर्तव्य करत राहायचं एवढच कळतं आमच्या पिढीला.. माझ्या ठाण्याच्या घरी आम्ही जुन्या मैत्रिणी एकत्र भेटलो.. कितीतरी वर्षांनी तिघीजणी जमलो होतो. अनेक जुन्या-नव्या आठवणींना उजाळा देत हसत होतो, खिदळत होतो.. पण सुषमाची चुळबुळ चालू होती.. सारखी नातवंडांची काळजी करत होती..
‘चल गं, निघते आता..! चल गं, उशीर होतोय. निघते आता.’ असंच म्हणत होती. हिनं स्वत:ची मुलं सांभाळीतच नोकरी केली.. आता निवृत्त झाल्यावरही तिला स्वत:साठी वेळ नव्हता.. ‘अगं पूर्वी थोडा तरी वेळ मिळत होता गं.. पण हल्ली धड पेपरही वाचायला मिळत नाही..!’ सुषमा कौतुकानं सांगत होती खरं, मात्र बोलण्याच्या ओघात बोलून गेली.. ‘संध्याकाळी मुलं त्यांच्या हवाली करते तेव्हा सुटल्यासारखं वाटतं.. या वयात मुलं सांभाळणं अवघडच होतं बघ.. तुला गंमत सांगू.. कदाचित वयामुळं असेल, आपण हळवे होतो आणि थोडा जरी पक्षपात झाला तरी तो जाणीवपूर्वक वाटायला लागतो. पूर्वी दोन्ही मुलं माझ्यासाठी काही ना काही घेऊन यायची.. आता प्रसाद कुठे सेल लागला तर बायकोला साडी आणतो.. निशित त्याच्या बायकोसाठी एखादा ड्रेस. पर्स. काहीतरी घेऊन येतो.. पण अगदी कालपरवापर्यंत माझ्यासाठी साडी.. ड्रेस आणणाऱ्या मुलांनी, त्यांची लग्नं झाल्यापासून एकदाही माझ्यासाठी काहीही आणलेलं नाहीए बघ.. आई, तुला आवडते तशी ही बघ साडी आणलीय.. असं दोघांपैकी एकानंही म्हटलं नाही गं किती दिवसांत.. कपाटं भरलीत साडय़ांनी.. गरजही नाहीय नव्या साडय़ांची.. पण जिवाला चटका लागल्यासारखं होतं. फक्त त्यांनी बोलावं तरी हीच अपेक्षा असते. पण..अशी कशी गं बदलून जातात मुलं लग्न झाल्यानंतर? ’ सुषमानं तिच्याही नकळत हा प्रश्न विचारला.. आणि मन हळवं झालं.. कारण तिच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडंही नव्हतंच. मीही गेल्या तीन वर्षांपासून याच प्रश्नाचं उत्तर शोधतेय..!
माया, माझ्या मैत्रिणीची मैत्रीण, सरकारी नोकरीत काम करणारी.. मुलगा फारसा शिकला नाही.. कुठे नोकरीतही नीट टिकला नाही.. पण त्यानं स्वत:च्या पायावर उभं राहावं म्हणून हिची अखंड धडपड चालू असायची.. नव्या नव्या धंद्यासाठी तो कर्ज घ्यायचा.. तिचा नवराही यथातथाच कमवत होता.. असेच १४-१५ लाखांचे कर्ज फेडून ती स्वत:च कर्जबाजारी झाली. मात्र वयाची तिशी गाठलेल्या मुलाला अचानक उपरती झाली. ‘अमेरिकेत मुलं १८ वर्षांची होताच घराबाहेर पडतात. स्वत:च्या पायावर उभं राहतात.. आता मी घराबाहेर पडणार. आता मी स्वतंत्रपणे राहणार. तुमचा माझा काही संबंध नाही..’ ही उपरती त्याला तेव्हा झाली, जेव्हा मायाच्या पतीला ब्रेन हॅमरेजमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले तेव्हा..! मुलासाठी घेतलेल्या कर्जाचं ओझं डोक्यावर होतंच. त्यात नवरा अधू झालेला अशा प्रसंगी भक्कमपणे आधार देण्यासाठी ज्या मुलाच्या खांद्याची जरूर होती तो मुलगा मला स्वतंत्रपणे जगायचंय, असं म्हणून आईवडिलांकडे पाठ फिरवून निघून गेला. माया खचून गेली.. का वागला असेल मुलगा असं?
 आईवडील मुलांसाठी करत राहतात.. आईबाप होण्याचं कर्तव्य पार पाडण्याच्या जबाबदारीपोटी आयुष्याची ओंजळ मुलाबाळांच्या सुखासाठी रिती करीत राहतात.. मात्र ही रिती झालेली ओंजळ परिणामस्वरूप उतारवयात पदरी एकटेपणाची, कृतघ्नपणाची पायवाट देऊन जाते, असंच म्हणावं लागेल
का? ..! पण मुलं अशी वागतील अशा भावनेनं कर्तव्यात चूक करणं आपल्या भारतीय मनाला पटणारं नाहीच..! त्यामुळे ज्यांच्या बाबतीत हे असं घडतं त्यांनी नशीब आपलं असं म्हणायचं आणि ‘ठेविले अनंत तैसेची राहावे’ असं म्हणून खंतावलेल्या मनानं जगायचं का? खरं तर समाजात घडणाऱ्या अनेक घटनांची उत्तर शोधणं तसं महाकठीण काम.. पण प्रश्न पडणारच.
     मुलं आणि पालक यांच्यातली ही वाढती दरी बघता प्रश्न पडतो, मुलांना जन्म दिल्या क्षणापासून केवळ आणि केवळ त्यांच्यासाठी जगण्याचा अट्टहास भारतीय मातापित्यांनी कमी करायला हवाय का? मुलाबाळांच्यात गुंतून राहण्याची मानसिकता आता बदलायला हवी का? नवी पिढी इतकी स्व-केंद्रित होताना दिसते आहे की, जबाबदारी नको म्हणून कित्येक जोडपी मुलं नकोतच असा निर्णय अगदी ठामपणे आणि एकमतानं घेताहेत.. जी पिढी जबाबदारी नाकारण्यासाठी भावी पिढीचे जगात येणं नाकारू  शकते ती पिढी अगदी सहजगत्या मागच्या पिढीचं अस्तित्व नाकारते आहे त्यात आश्चर्य वाटून घेण्यात काहीच अर्थ नाही, असंही म्हणावसं वाटते.. जेव्हा जगण्याचे संदर्भच बदलताहेत.. तेव्हा टाहो फोडण्यात काय अर्थ आहे असेही म्हणावेसे वाटते..
मुलींना आपल्या आईवडिलांबद्दल प्रेम वाटत असते.. तसंच आणि तेवढंच प्रेम त्यांना आपल्या सासूसासऱ्यांबद्दल वाटेलच अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे.. कदाचित हे नातं निर्माण होण्यासाठी काळ हे माध्यम असू शकतं.. पण दुसरी स्त्री जीवनात आल्यानंतर आपल्या आईला ज्या पद्धतीनं मुलं विसरतात ते मात्र अनाकलनीयच असतं.. बायकोच्या आईवडिलांकडे तिचा ओढा असतो.. म्हणून त्यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवायची अपरिहार्यता बऱ्याच वेळा मुलांमध्ये दिसून येते. पण आईवडिलांना विसरण्याची, दुर्लक्ष करण्याची वृत्ती मुलांमध्ये कशी निर्माण होत असेल हाही एक अगम्य प्रश्न मनाला पडतो..
   औरंगाबादमध्ये राहात असल्यापासूनचे आमचे एक पंजाबी फॅमिली फ्रेंड.. त्यांची दोन्ही मुलं आणि माझी दोन्ही मुलं समवयस्क. मुलं वाढत असताना जवळजवळ १५ वर्षे आम्ही दोन्ही कुटुंबांनी एकत्रितपणे अनेक गोष्टी केल्या.. पिकनिक्स, ट्रिप्स, जेवणं, पाटर्य़ा, वाढदिवस.. अंजना आणि डॉ. सिंग अगदी जवळचे मित्र आहेत आमचे.. अंजनाचेही विश्व माझ्याप्रमाणेच सदैव तिच्या दोन्ही मुलांभोवतीच सामावलेलं असायचं.. दोन्ही मुलं अत्यंत हुशार.. मुलाला, विवेकला तर हिनं तळहातावरल्या फोडाप्रमाणं जपलं, वाढवलं. डोळ्यांचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्याच्या सीएच्या अभ्यासापर्यंत त्याच्याबरोबर जागून अभ्यास केला, करवून घेतला. आज विवेकचं लग्न झालंय. त्यानं एका नेपाळी मुलीशी प्रेमविवाह केलाय. डॉ. सिंगनी आता मुंबईत लिंकिंग रोडवर एक सुरेख फ्लॅट घेतला आहे.. साठी उलटली असली तरी एका कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहेत ते. सून, मुलगा आणि नातू यांच्याबरोबर ते दोघंही आता मुंबईतच राहाताहेत. नुकतेच डॉ. सिंग आणि अंजना घरी आले होते. मुलांची ख्याली-खुशाली बोलून झाल्यावर मी अंजनाला म्हटले..‘अंजना, खुश किस्मत हो, बेटा, बहू और पोते के साथ रहती हो, मुझे देखो, बेटी दामाद के साथ अमेरिका रहती है, बेटा बहुके साथ दुबईमें रहता है. ना मुलगा बरोबर ना मुलगी. पोते को देखने के लिए तरसती रहती हूं. मुलं आहेत, पण दूर देशी. असून नसल्यासारखे. त्याचं खूप दु:ख होतं बघ!’
त्यावर एक निश्वास सोडत अंजना म्हणाली, ‘एकलेही सही पर अपनी मर्जीसे तो जी रही हो ना? कसला मुलगा आणि कसली सून. मी तर अक्षरश: मोलकरीण झालेय या घरात. घरात असूनही मुलाशी दोन शब्द बोलणं कठीण झालंय. आमच्या सूनेचे रीतीरिवाज खूप वेगळे आहेत, त्यामुळे ती मिसळूनच घेत नाहीए. मुलाशी बोलावं तर त्याला ते पटत नाही. दिवसभर आम्ही नातवाला सांभाळत बसतो फक्त. मै अपने बेटेसे परायी हो गयी हूँ.. बताओ.. क्या करूं?’ अशा बाबतीत सहसा पुरुष मत व्यक्त करत नाहीत. पण डॉ. सिंग चटकन बोलून गेले, ‘भाभाजी, हमारी बहूंने अंजना की ऐसी बुरी हालत कर दी है, की बेटा न होता तो अच्छा होता..’ हे ऐकून काय बोलावे तेच कळेना..
ज्या विवेकला लहानाचे मोठे करताना अंजना तीळतीळ झिजली होती.. आज त्याच्याबरोबर एका घरात राहून बोलायची चोरी व्हावी ही कसली जगण्यातली तडजोड? मुलं मोठी होईपर्यंत सुखाच्या अपरिमित क्षणांनी जीवन संपन्न असते.. तेच जीवन मुलांची लग्न झाल्यानंतर इतक्या पराकोटीचे दु:खी व्हावं याला काय म्हणायचं? नको ते एकत्रित राहणं असं वाटत असूनही नातवांसाठी अंजना आणि डॉ. सिंग अनिवार्यपणे मुलाबरोबर एकत्र राहताहेत.. हे पाहिलं की वाटतं, अशी कशी बदलतात मुलं लग्न झाल्यानंतर?
इथे दोष लग्न होऊन घरी येणाऱ्या सुनेकडे आहे असं म्हणता येत नाही.. पण आपल्या मुलांना स्वत:चे मत नसते का? त्यांना योग्य अयोग्य कळत नाही का? आईवडिलांच्या ऋणांची जाणीव होत नसेल का? मुलांसाठी आयुष्य वेचणाऱ्या आईला आपल्या मुलांकडून कशाची अपेक्षा असते? म्हातारपणी त्यानं आपला आधार व्हावे..! आजकाल आर्थिक नियोजन व्यवस्थित केलं तर मुलांपुढे हात पसरण्याची वेळ येत नाही.. पण पैसा असला तरी मानसिक आधाराची गरजच असतेच..परदेशातील आईवडील ज्या स्वातंत्र्याची अपेक्षा करीत आनंदाने वृद्धाश्रमात राहतात त्या प्रकारची मानसिकता अद्याप तरी आपल्याकडील मातापित्यांच्या मनात रुजलेली नाही.. अर्थात एक किंवा दोन मुलं असलेल्या आजच्या पिढीच्या मनात पुढे ओघानेच ही मानसिकता रुजेलच.. कारण एकुलता एक म्हणून वाढलेल्या मुलांच्या मनात आईवडिलांची काळजी घेणं हा आपल्या आयुष्यातील जबाबदारीचा एक टप्पा आहे हे बीज रुजणारच नाही कदाचित.. कारण व्यक्तिस्वातंत्र्याच्या कल्पना या पिढीमध्ये खूप वेगळ्या अनुषंगाने विकसित होत आहेत.. आणि मुळात आई-वडिलांची काळजी घेण्यासाठी मुले आईवडिलांच्या जवळ सोडा, मायदेशात तरी राहिली पाहिजेत ना?
आजकाल मुलं घरच काय, देशही सोडून निघून जाताहेत.. मनानं कितीही वाटले तरी आईवडिलांची काळजी घेण्यासाठी त्यांना मायदेशी येण्याची इच्छाच उरत नाही.. पण बाळंतपणासाठी मात्र आईने तिथं यावं हे गृहीतच असतं. आईलाही कौतुक असतं त्यामुळे तीही जातेच. माझ्या माहितीतल्या किमान ३० जणी आज परदेशात मुलीच्या किंवा सुनेच्या बाळंतपणासाठी गेलेल्या आहेत. बाळंतपण करून आल्या की त्यांचं पुन्हा एकाकी आयुष्य सुरू होतं.
 हे सगळं पाहिल्यावर वाटतं, खरंच कोणाची चूक आहे? आपल्या समाजव्यवस्थेनुसार वागत आलेल्या आमच्या पिढीचं काही चुकलंय का? आपापली कर्तव्यं पार पाडण्यात कांकणभर सरस ठरणाऱ्या आम्ही मुलांसाठी खूप काही केलं या समाधानातच चुकीची बीजं रोवली गेलीत का? मुलांना सुनांना जेवढं देता येईल तेवढं दिलं.. मात्र ओंजळ रिकामी झाल्याचं दु:ख पदरात आलंय का? की मुलांकडून अपेक्षा करणे ही मोठी चूक ठरतेय आईवडिलांची? की आता जगण्याचे संदर्भ बदलून नव्यानं जीवनवाटा निवडायला हव्यात का? आयुष्याची उरलेली पायवाट जोडीदाराच्या साहाय्यानं अथवा एकला चलो रे.. म्हणत घालवण्यासाठी मनाची तयारी आधीपासूनच करायला हवी का? दुसऱ्यांनी बदलावं ही अपेक्षा करण्याऐवजी आपणच जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवाय का?  कारण आयुष्याची पायवाट. सरळ कधीच नसते.. वळणावळणांनीच ती पुढे पुढे जाते. क्षितिजापर्यंत पोहोचताना दमछाक होणारच.. अशा वेळी.. फक्त मागं वळून पाहायचं.. आणि जोडीदाराचा हात घट्ट धरून ठेवायचा.. जमेल तोवर..!
radhikatipre@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2013 1:02 am

Web Title: old age life and experience
टॅग Chaturang
Next Stories
1 लक्ष्मीच्या पावलांनी..
2 सारे काही पालकांच्या हाती!
3 कुंचलेतून साक्षात्कार
Just Now!
X