डॉ नंदू मुलमुले

स्वप्नं पाहून, कष्ट करून उभारलेल्या कामातून निवृत्ती घ्यायचा टप्पा ज्येष्ठांसाठी वेदनादायी असतो. लाडानं वाढवलेलं कार्यरूपी अपत्य नव्या पिढीच्या हाती सोपवताना त्याच्या भविष्याची काळजी वाटणारच! नव्या पिढीचे विचार, पद्धती ज्येष्ठांना न पचणाऱ्या, तरी हस्तांतरण अटळ! विनिताताईंना ही अपरिहार्यता स्वीकारायला उशीर लागला. पण अखेर ज्येष्ठत्वानं आलेली परिपक्वता कामी आली…

रेल्वेचा सांधा बदलताना रुळांचा होणारा खडखडाट लोखंडी चाकांना जाणवावा, रेल्वेत बसलेल्या प्रवाशांना कळू नये, ही अपेक्षा. कुटुंबाची, कौटुंबिक व्यवसायाची सूत्रं मावळत्या पिढीच्या हातून उगवत्या पिढीच्या हाती जाताना जो सांधेबदल होतो, त्यातही थोडा खडखडाट होणारच. फक्त तो सहज व्हावा, हे परिपक्व होत गेलेल्या जुन्या पिढीकडून अपेक्षित. मात्र जी सूत्रं उभारण्यात आणि सांभाळण्यात उभी हयात गेली, ती हातून सुटणं वेदनादायक असतं हे सत्य नव्या पिढीनं समजून घेणंही जरुरी.

हेही वाचा…पाळी सुरूच झाली नाही तर?

रेवती सकाळची घरातली कामं आटोपून तयार झाली तेव्हा साडेनऊ वाजत आले होते. बाह्यरुग्ण विभागाची वेळ साडेदहाची, पण नगरच्या दुर्गम भागातून आलेले रुग्ण सकाळपासून जमू लागतात हे तिला राहुलनं- तिच्या डॉक्टर नवऱ्यानं लग्नापूर्वीच सांगून ठेवलं होतं. दिवसभरात किमान साठ ते सत्तर रुग्ण येणार. त्यांना तपासायचं म्हणजे वेळेवर दवाखाना सुरू करणं डॉक्टर आणि रुग्ण दोघांच्याही हिताचं.

राहुल आणि रेवती दोघं मुंबईच्या वैद्यकीय महाविद्यालयात शिकतानाच त्यांचा सहजीवनाचा इरादा पक्का झाला होता. रेवतीनं स्त्रीरोग विषयातली पदव्युत्तर पदवी हातात पडल्यावर नगर गाठायचं आणि तिच्या सासू-सासऱ्यानं अविरत कष्टानं उभी केलेली वैद्यकीय सेवेची धुरा सांभाळायची. पन्नास वर्षांपूर्वी महानगरापासून दूर, तुलनेनं वंचित भागात विशेषत: स्त्रीरुग्णांसाठी वैद्यकीय उपचाराचं राहुलच्या आईवडिलांनी- म्हणजे विश्वंभर आणि विनिता भानुशाली यांनी निर्माण करून ठेवलेलं हे केंद्र. एका छोट्या दोन खोल्यांच्या जागेत थाटलेला दवाखाना ते चार मजली सुसज्ज नर्सिंग होम, हा प्रवास त्यांच्या कष्टांची, विश्वासार्हतेची पावती देणारा.

हेही वाचा…‘शुभंकर’ रुग्णांचा आधार!

विश्वंभर एक हुशार विद्यार्थी, मात्र ध्येयवादी. त्यांना ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा करायची आस. महानगर सोडून ग्रामीण भागात कोणती मुलगी येणार? त्याच वेळी त्यांना विनिता भेटली. विनितांची मध्यमवर्गीय कौटुंबिक पार्श्वभूमी, साधेपणा, शिकण्याची तयारी, निगर्वीपणा त्यांना भावला. दोघांनी लग्न केलं. विनितांनी ‘डीजीओ’ची पदविका (डिप्लोमा इन गायनॅकोलॉजी अँड ऑब्स्टेट्रिक्स) प्राप्त केली. एकदम ग्रामीण भागात व्यवसाय सुरू करण्यापूर्वी अनुभव म्हणून नगरच्या सार्वजनिक रुग्णालयात नोकरी धरली. तिथे भरपूर अनुभव मिळाला आणि सामान्य स्त्रियांची साथही लाभली. विनिताताईंचं पंचक्रोशीत नाव झालं. रुग्णांची आपुलकीनं चौकशी करणं, त्यांच्याशी गप्पा मारणं, त्यांची सुखदु:खं जाणून घेणं, आवश्यक तेव्हा तत्परतेनं शस्त्रक्रिया करणं, या सर्व वागणुकीमुळे विनिताताईंच्या नावावर रुग्ण येऊ लागले. मग विश्वंभरनी निर्णय घेतला, की इथेच शुश्रूषागृह बांधावं. ग्रामीण रुग्णांना परवडतील असे मध्यम दर, मात्र सर्व अत्याधुनिक उपचारांची उपलब्धता, सोबत दोन निष्णात डॉक्टर, अशा तयारीसह दोन खोल्यांत सुरू झालेला हा प्रकल्प अल्पावधीत वाढत गेला. एका सुसज्ज इमारतीत स्थलांतरित झाला. रुग्णांची संख्या वाढत गेली, तसा विनिताताईंचा अनुभव समृद्ध होऊ लागला. त्यात त्यांची वाणी आपुलकीची. त्यामुळे त्यांना केवळ रुग्णांत नाही, तर समाजात एक आदराचं स्थान प्राप्त झालं. स्त्रियांच्या सार्वजनिक कार्यक्रमांत मिसळणं, आरोग्य शिबिरं भरवणं, स्त्री-आरोग्यावर प्रबोधनपर व्याख्यानं देणं, अशा विविध उपक्रमांत त्या सहभागी होत. दोघांनीही आयुष्याचा महत्त्वाचा कालखंड आपल्या कर्तृत्वानं उजळून काढला.

मात्र या सगळ्या उपक्रमात विनिताताईंना सगळ्यात प्रिय त्यांची ‘ओपीडी’, बाह्यरुग्ण विभाग. रोज येणाऱ्या विविध स्त्रीरुग्णांना तपासणं, उपचार करणं हेच. आपल्या अचूक निदानाचा फायदा होताना बघणं, रुग्णांकडून कौतुक स्वीकारणं, हेच त्यांचं विश्व. रुग्ण केवळ आपल्यासाठी येतात, ताटकळत बसतात, आपल्या निदानाची मोहोर बसल्याखेरीज त्यांना इतर कोणत्याही डॉक्टरचा भरवसा नसतो, याचं त्यांना एक आंतरिक समाधान होतं, अभिमानही असावा. रुग्णांच्या अविरत गर्दीनं त्यांना दुसऱ्या कुठल्या कामासाठी, कलेसाठी, रंजनासाठी, स्वत:साठी वेळही नव्हता आणि त्याची त्यांना कधी गरज वाटली नाही. ती सवलत स्वत:ला त्यांनी कधी देऊ केली नाही. चाळीस वर्षं हे असंच चाललं होतं. अखेरपर्यंत चाललं असतं, पण एके दिवशी सून आली. तीही डॉक्टर सून!

हेही वाचा…सांदीत सापडलेले : प्रेमाची थेरं!

कौटुंबिक आघाडीवर मुलगा झाला तेव्हाच त्याचं डॉक्टर होणं ठरलेलं! लहानपणापासून परिचित विषय, वातावरण, वारसा, यामुळे मुलगा राहुल डॉक्टर होणं स्वाभाविकच होतं. त्यानं प्रेमविवाह केला तरी हरकत नाही, पण बायको डॉक्टर असावी, ही मायबापाची एकमेव अट होती, ती त्यानं पूर्ण केली. महानगरातलं माहेर सोडून सून आली, ती शुश्रूषागृहाची जबाबदारी उचलण्याचा उत्साह आणि उत्सुकता घेऊन. आता दवाखाना रेवतीनं सांभाळायचा हे लग्नाआधीच कौटुंबिक चर्चेत ठरलं होतं. रुग्णसेवेच्या नवनव्या संकल्पना राबवण्याचं कच्चं ‘नील-आरेखन’च तिनं सादर केलं होतं! सासरा प्रभावित झाला होता. सकाळी ६ ते ७ च्या दरम्यान रुग्णांनी अग्रिम पैसे भरून नावं नोंदवून ठेवायची. ज्यांनी नावं नोंदवली त्यांनाच प्राधान्य द्यायचं. वेळ उरली तर इतर, अन्यथा त्यांनी नव्यानं नोंदणी करावी. अशानं काय होणार? ‘केव्हाही जा, डॉक्टर तयारच असतात,’ ही बेफिकिरीची धारणा कमी होईल. रुग्णांना शिस्त लागेल. मर्यादित रुग्ण पाहिल्यानं डॉक्टरवर ताण येणार नाही. कमीतकमी गुंतवणूक भागिले अधिकाधिक परतावा म्हणजे ‘एफिशियन्सी’, हे सूत्र. विनिताताईंना हे काही फारसं पटलं नाही. ग्रामीण भागातले लोक एवढ्या सकाळी कसे पोहोचणार? त्यांचा नंबर साडेदहाला लागणार, तर आधीचे चार तास रुग्णांनी करायचं काय? मुख्य म्हणजे, वेळ वाचवून उरलेल्या वेळेत डॉक्टरनं करायचं काय?… पण त्या गप्प बसल्या.

अखेर ‘तो’ दिवस उजाडला. रेवती सकाळी तयार होऊन दवाखान्यात निघाली. कर्मचाऱ्यांच्या नजरेत नव्या मालकिणीचं कौतुक, मात्र काहींच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव. त्याचा उलगडा लवकरच झाला. तपासणी कक्षाचं दार ढकलून रेवती आत शिरली, तो काय? तिथे सासू आधीच हजर. बाजूलाच एक फिरती खुर्ची ठेवली होती, ती समोर करत विनिताताई सकृद्दर्शनी हसत म्हणाल्या, ‘‘या डॉ. रेवती, ही तुमची खुर्ची!’’
‘‘पण मम्मी, आपण दोघं एकच रुग्ण कसा तपासणार? म्हणजे, गरज काय दोन स्त्रीरोगतज्ज्ञांची?’’
‘‘तूच तपासणार, मी फक्त इथे बसते. हस्तांतरण एक प्रकारचं. म्हणजे इथल्या पद्धतीला तू सरावशील आणि रुग्णही सरावतील तुला.’’

हेही वाचा…मनातलं कागदावर : रंगीत जादूचा खेळ!

रेवती काहीशा नाराजीनंच बसली. स्वागतिकेनं रुग्ण आत पाठवायला सुरुवात केली. आलेल्या प्रत्येक स्त्रीची विचारपूस विनिताताई करत, रुग्णही त्यांनाच भेटायला उत्सुक असत. रेवतीकडे एक कटाक्ष टाकत आणि मग दुर्लक्ष करत. काही काळानं रेवती नुसती बसून कंटाळून गेली.

संध्याकाळी तिनं अजूनही मुंबईत पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या नवऱ्याला फोन केला आणि सगळी कहाणी सांगितली. तो आईशी बोलतो म्हणाला. पण दुसऱ्या दिवशी तोच प्रकार. थोडं नेपथ्य बदललं. रेवतीची आता स्वतंत्र दालनात बसण्याची सोय झाली. पण मुख्य तपासणी कक्षात विनिताताई बसलेल्या, त्यामुळे सगळ्या स्त्रिया ‘मोठ्या बाईंना’च दाखवण्याची विनंती करत. त्यांचंही साहजिकच. कसेबसे दोन-चार जुने रुग्ण रेवतीनं पाहिले आणि उर्वरित वेळ जुनी जर्नल्स चाळण्यात घालवला. दिवस कसाबसा काढला. आता कर्मचारीही तिच्याकडे विचित्र नजरेनं पाहू लागले. (की तिला तसा भास झाला?) तिचा सकाळी उठून दवाखान्यात जाण्याचा उत्साह कमी होऊ लागला. ‘माझ्यावाचून काही अडतच नसेल तर काय?’ उलट सारी जबाबदारी विनिताताई आता अधिक उत्साहानं अंगावर घेऊ लागल्या. त्यांच्या नवऱ्यानं काही सांगण्याचा दुबळा प्रयत्न करून पाहिला, पण विनिताताई उसळल्या, ‘‘जरा विचार करा, मी अचानक रुग्ण पाहणं, तपासणं बंद केलं, तर त्याचा रुग्णांच्या उपस्थितीवर परिणाम नाही होणार? जरा तिला अनुभव मिळू देत. मग होईल लोकांना हळूहळू सवय.’’ पण काम केल्याशिवाय अनुभव कसा मिळेल? या प्रश्नाचं त्यांच्याजवळ उत्तर नव्हतं किंवा त्यांना ते द्यायचं नव्हतं.

एके दिवशी रेवतीनं मनाशी काही निर्णय घेतला. बॅग भरली आणि सासू-सासऱ्यांच्या पाया पडली. निघायची तयारी पूर्ण झाली. ‘‘नवऱ्याजवळ जातेय, तिथे एक वैद्यकीय अधिकारी पदाची जागा रिकामी आहे,’’ रेवतीनं खुलासा केला.

ती बोलत राहिली. ‘‘तुम्ही जोवर दवाखान्यात काम कराल, तोवर मला काम मिळणार नाही. तुमचा अनुभव, तुमचं कौशल्य, याची मी या घटकेला बरोबरी करू शकत नाही. मला काम मिळालं, तरच मला त्या गोष्टी प्राप्त होतील. मी वेगळा दवाखाना थाटू शकते, पण याच गावात ते चांगलं दिसणार नाही… आणि मला नव्यानं थाटायचा तर मी माझ्या शहरी काढेन, कारण माझी मुळं तिथे आहेत,’’
रेवतीनं क्षणभर सासूकडे पाहिलं. ‘‘तुमची मन:स्थिती मी समजू शकते, पण कधी तरी तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागणार. तोवर माझं ज्ञान गंजून जाईल. विषयापासून दूर राहिल्यानं माझा आत्मविश्वास कमी होईल. ज्या दिवशी तुम्हाला पूर्णपणे थांबावंसं वाटेल त्या दिवशी मला बोलवा.’’

हेही वाचा…माझी मैत्रीण’ : सुमी!

विश्वंभरना सुनेचं कौतुक वाटलं. किती संयमित शब्दांत ही आपली बाजू मांडते आहे. चाळीस वर्षं जोपासलेली संस्था आता नव्या पिढीकडे सोपवायला हवी. काम कठीण आहे, पण नाही केलं तर संस्थेचं आयुष्य माणसाएवढंच होऊन राहील. तोवर नवी पिढी उमेद गमावून बसेल आणि आपण मुलगा-सून गमावून बसू…
नवरा-बायकोत जणू मूक संवाद झडला. विनिताताईंच्या डोळ्यांत पाणी तरारलं. त्यांनी सुनेची बॅग हातात घेतली. ‘‘रिकामी करून दे ती मला. आजपासून तू दवाखाना सांभाळ. मी हीच बॅग भरून मस्त सहलीला जाईन. किती तरी दिवसांची प्रलंबित आहे आमच्या शाळकरी मित्रमैत्रिणींची सहल! जा तू दवाखान्यात आता. रुग्ण वाट पाहात असतील.’’

हेही वाचा…जिंकावे नि जगावेही : आरोग्याला प्राधान्य हवंच!

विश्वंभर आता अभिमानानं बायकोकडे पाहू लागले. रेल्वेनं सांधा बदलला. थोडा खडखडाट झाला, पण प्रवासात खंड पडला नाही…

nmmulmule@gmail.com