“संकटकाळात सशस्त्रदलानी जे काम केलं आहे ते अभिनामास्पद आहे. सशस्त्र दलानं कायमचं महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. हे वर्ष कोविड वर्षाच्या रूपात ओळखलं जाईल. सशस्त्रदलांनी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीही मोठं काम केलं आहे आणि हे नक्कीच अभिमानास्पद आहे,” असे गौरवोद्गार संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काढले. स्वातंत्रदिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी सशस्त्रदलांना संबोधित केलं. तसंच त्यांच्या शौर्याचंही कौतुक केलं. यावेळी त्यांनी गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या जवानांनाही श्रद्धांजली वाहिली.

“संकटकाळात डीआरडीओने गृहमंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मत्रालय, सशस्त्रदल आणि उद्योग समुहांसोबत मिळून नवी दिल्लीत १२ दिवसांच्या विक्रमी कालावधीत सरदार वल्लभभाई पटेल कोविड रूग्णालयाची उभारणी केली,” असंही राजनाथ सिंह म्हणाले. “मे २०२० मध्ये हवाई दलाच्या सेलूर येथील १८ व्या स्क्वाड्रनमध्ये एलसीए तेजसच्या दुसऱ्या टप्प्यातील विमानांचा समावेश केला गेला. आत्मनिर्भरतेच्या दृष्टीनं टाकण्यात आलेलं ते मोठं पाऊल आहे. यासोबतच हवाई दलाची क्षमता वाढवण्यासाठी २१ मिग-२९ विमानं खरेदी करण्यासाठीही मंजुरी दिली आहे. तमिळनाडूतील तंजावूरमध्ये सुखोई MKI चा २२२ स्क्वाड्रन उभं केलं आहे जे ब्रह्मोस क्षेपणास्त्रानं सुसज्ज आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

राफेल लढाऊ विमानं भारतात येऊ लागली आहेत ही आनंदाची बाब आहे. दोन आठवड्यांपूर्वीच पाच राफेल विमानं अंबाला एअरबेसवर पोहोचली. राफेल लढाऊ विमानांचं येणं ही सैन्याच्या इतिहासात नव्या युगाची झालेली सुरूवात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हवाई दलात अत्याधुनिक लढाऊ विमानांची कमतरता भासत होती. आमचं सरकार सत्तेत येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकार ते सरकार असा फ्रान्ससोबत करार करून ३६ राफेल विमानं भारतात आणण्याचं काम सुरू केलं असल्याचंही ते म्हणाले.

गेल्यावर्षी ऐतिहासिक घोषणा

“पंतप्रधानांनी संरक्षण क्षेत्रात सुधारणा करण्याची मागणी स्वीकारली आहे. गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनी लालकिल्ल्यावर संबोधित करताना त्यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या स्थापनेची ऐतिहासिक घोषणा केली होती. राष्ट्रीय सुरक्षेच्या चौकटीत जे काही येतं ते आपण करतो. आपण स्वसंरक्षणासाठी करतो, दुसऱ्यांवर हल्ला करण्यासाठी काही करत नाही. जेव्हा आपल्यावर कोणी हल्ला केला तेव्हा आपण त्यांना चोथ प्रत्युत्तर दिलं आहे,” असं राजनाथ सिंह म्हणाले.

इतिहास साक्षीदार

भारतानं कधीही दुसऱ्या कोणाच्या जमिनीवर ताबा मिळवण्यासाठी आजपर्यंत कधीही हल्ला केला नाही याचा इतिहास साक्षीदार आहे. भारताचा सर्वांचं हृदय जिंकण्यावर विश्वास आहे. परंचु आमच्या स्वाभिमानावर कोणालाही कधी हल्ला करु देणार नसल्याचंही संरक्षणंमंत्र्यांनी स्पष्ट केलं.