पाकिस्तानने पुलवामा हल्ल्याची कबुली दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर प्रतिक्रिया देताना विरोधकांवर निशाणा साधला आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जात आहे. यासाठी नरेंद्र मोदी गुजरातमध्ये आहेत. मोदींनी केवडिया येथील “स्टॅच्यू ऑफ युनिटी’जवळ जाऊन सरदार वल्लभभाई पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली. मोदींनी यावेळी सिव्हील सर्व्हिसेस प्रोबेशनर्सना देखील संबोधित केलं. काही लोक दहशतवादाचं जाहीर समर्थन करत असून ही चिंतेची बाब असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं.

“आज येथील संचलन पाहताना पुलवामा हल्ल्याचं चित्र डोळ्यासमोर आलं. पुलवामा हल्ला आणि वीर जवान शहीद झाले असताना काही लोक या दुखात सहभागी नव्हते हे देश विसरणार नाही. हे लोक पुलवामा हल्ल्यातही राजकीय स्वार्थ शोधत होते. त्यावेळी केलेली वक्तव्यं आणि राजकारण देश विसरू शकत नाही. देशाला इतकी मोठी जखम झाली असताना काही लोकांना हल्ल्यातही राजकारण दिसलं. पण हे सर्व होत असतानाही मी सर्व आरोपांना झेललं. अनेक वाईट गोष्टी ऐकत राहिलो. माझ्या मनात वीर जवान शहीद झाल्याची जखम होती. पण काही दिवसांपूर्वी शेजारी देशातून ज्या गोष्टी आल्या आहेत. तेथील संसदेत ज्याप्रकारे सत्य स्वीकारण्यात आलं आहे त्याने या लोकांचा खरा चेहरा देशांसमोर आणला आहे,” असं मोदींनी म्हटलं.

पुढे ते म्हणाले की, “आपल्या राजकीय स्वार्थासाठी कुठपर्यंत जाऊ शकतात हे विरोधकांनी दाखवलं आहे. पुलवामा हल्ल्यानंतर झालेलं राजकारण याचं मोठं उदाहरण आहे. देशहितासाठी, देशसुरक्षेच्या हितासाठी, जवानांचं मनोबल कमी व्हावं यासाठी तुम्ही राजकारण करु नका. देशविरोधी लोकांच्या हातातील बाहुलं होत तुम्ही ना देशाचं ना आपल्या राजकीय पक्षाचं हित करु शकता. देशहित हेच सर्वोच्च हित आहे”.

“आज जगातील सर्व देश दहशतवादाविरोधात एकत्र आले आहेत. दहशतवाद आणि हिंसाचारातून कोणाचाही फायदा होणार नाही. भारताने नेहमीच दहशतवादाविरोधात लढा दिला आहे,” असं मोदींनी यावेळी सांगितलं.

“आज काश्मीर विकासाच्या मार्गावर आहे. ईशान्येतही शांतता पूर्ववरत होते तसंच विकासासाठी पावलं उचलली जात आहेत. भारत एकत्रित येत आहे,” असं मोदींनी म्हटलं.

मोदींनी यावेळी करोनाचा उल्लेख करताना इतक्या मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल याची कोणी कल्पनाही केली नसल्याचं सांगितलं. पण देशाने सामूहिकपणे याचा सामना केल्याचं सांगत मोदींनी कौतुक केलं. आज भारत करोनामधून बाहेर पडत असून एकत्रितपणे पुढील वाटचाल करत असल्याचं त्यांनी सांगितलं.