भारत व चीन यांसारख्या मोठय़ा लोकसंख्येच्या देशांनी जर कोविड १९ चाचण्या वाढवल्या तर त्यांना त्यांच्याकडील करोना रुग्ण संख्या अमेरिकेपेक्षा जास्त असल्याचे दिसेल, असे अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. भारत आणि चीन यांनी कमी चाचण्या केल्याने रुग्णांची संख्या कमी असल्याचा दावा त्यांनी केला.

माइने येथे प्युरिटन मेडिकल प्रॉडक्ट्सच्या कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, ‘अमेरिकेने करोनाच्या २ कोटी चाचण्या केल्या आहेत. अमेरिकेच्या तुलनेत जर्मनीने ४० लाख चाचण्या केल्या असून दक्षिण कोरियाने ३० लाख चाचण्या केल्या आहेत.’

आतापर्यंत अमेरिकेत १९ लाख लोकांना संसर्ग झाला असून मृतांची संख्या १ लाख ९ हजार आहे. त्यामुळे करोनाचा फटका अमेरिकेला अधिक बसला आहे.भारत व चीन या देशात रुग्णांची संख्या अनुक्रमे २ लाख ३६ हजार १८४  व ८४ हजार १७७ आहे. भारताने आतापर्यंत ४ लाख चाचण्या केल्या आहेत. कोविड १९ चाचण्यांबाबत ट्रम्प यांनी सांगितले की, ‘आम्ही दोन कोटी लोकांच्या चाचण्या केल्या. लक्षात ठेवा, तुम्ही जेवढय़ा चाचण्या कराल तेवढे जास्त रुग्ण दिसतील. जास्त चाचण्या केल्याने आमच्याकडे जास्त रुग्ण दिसून येत आहेत. जर भारत व चीनने चाचण्या वाढवल्या तर त्या देशातही जास्त रुग्ण दिसतील. तरी हे दोन्ही देश चाचण्या करीत आहेत यात शंका नाही.’

तमिळनाडूत रुग्णालयांना १५ हजार रुपयांची मर्यादा

चेन्नई : तमिळनाडू सरकारने कोविड १९ रुग्णांवर उपचारांसाठी दिवसाला पंधरा हजार रुपये दर मर्यादा खासगी रुग्णालयांना घालून दिली आहे, पण ती अतिदक्षता विभागासाठी लागू आहे. यापेक्षा अधिक दर आकारल्यास कारवाई होईल. अतिदक्षता विभागातील रुग्णांकडून दिवसाला १५ हजार रुपयांहून अधिक खर्च वसूल करूनये. साधारण वॉर्डमध्ये दिवसाला ७५०० रुपये पेक्षा जास्त रक्कम आकारण्यात येऊ नये, असे  सरकारने बजावले आहे.