शनिवारी (९ नोव्हेंबर) येणाऱ्या अयोध्येचा ऐतिहासिक निकालाकडे देशवासिंयांचे लक्ष लागले आहे. या निकालाकडे जय-पराजयाच्या दृष्टीकोनातून पाहू नका. हा निकाल म्हणजे कोणाचा विजय किंवा पराभव नाही, निकाल काहीही येवो. देशातील नागरिकांनी शांतता, एकता आणि सद्भावना कायम राखावी, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत देशवासियांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्री तसेच भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना वादग्रस्त विधान न करण्याची सूचना केली आहे. संघ परिवार तसेच, मुस्लीम संघटनांनीही लोकांना शांतता राखण्याचे आणि निकालाचा आदर करण्याची विनंती केली आहे. दोन्ही समाजात सलोखा आणि सामंजस्य राहावे यासाठी गेल्या आठवडय़ात बैठकाही झाल्या होत्या.

उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत देशातील जनतेला शांतता कायम राखण्याचं आवाहन केलं आहे. “सर्वोच्च न्यायालयात गेल्या काही महिन्यापासून अयोध्या प्रकरणावर निरंतर सुनावणी होत होती. या काळात समाजातील सर्व वर्गांकडून सौहार्दाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही चांगली गोष्ट होती. शनिवारी येणाऱ्या कोर्टाच्या निर्णयानंतरही आपल्याला शांतता कायम राखायची आहे. कोर्टाकडून येणारा निर्णय म्हणजे जय-पराजय नाही. शांती, आणि एकता कायम राखणं ही आपल्या देशाची महान परंपरा आहे. या परंपरेला आणखी बळ द्या.”

अयोध्येचा खटला राजकीय आणि सामाजिकदृष्टय़ा संवेदनशील असल्याने निकाल देण्यापूर्वी सरन्यायाधीश गोगोई यांनी अयोध्या तसेच, संपूर्ण उत्तर प्रदेशमधील सुरक्षेचा आढावा घेतला आणि त्या नंतरच निकालाचा दिवस निश्चित केला. शनिवार-रविवारी न्यायालयाचे कामकाज बंद असते. पण, अयोध्या खटल्याचे महत्त्व लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने शनिवार निकाल देण्याचे ठरवले. शुक्रवारी उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांनी न्या. गोगोई यांची भेट घेऊन त्यांना कायदा-सुव्यवस्थेची माहिती दिली होती. दिल्लीसह देशभर दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. अयोध्येत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.