नोटाबंदीच्या निर्णयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करणारे टाटा समूहाचे हंगामी अध्यक्ष रतन टाटा यांनी आता लोकांना होत असलेल्या त्रासावर चिंता व्यक्त केली आहे. लोकांचा त्रास कमी करण्यासाठी सरकारने त्वरीत उपाययोजना लागू करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. त्याचबरोबर सरकार लोकांना चांगली सुविधा पुरवण्यासाठी आपले सर्वोत्तम प्रयत्न करत असल्याचे प्रशस्ती पत्रकही त्यांनी जोडले आहे.
रतन टाटा यांनी गुरूवारी ट्विटरवरून नोटाबंदीबाबत आपले मत मांडले. नोटाबंदीच्या निर्णयामुळे सामान्य लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष करून गंभीर रूग्णांना याचा खूप त्रास होत आहे. अनेक छोट्या शहरांमध्ये सर्वसामान्यांवर उपचार करण्यास नकार देण्यात येत आहे. चलनाअभावी गरीबांना भोजन आणि घरगुती काम कारणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सरकारच्या वतीने सर्वोत्तम प्रयत्न केले जात असून अजूनही यात विशेष सुविधा देण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. जेव्हा एखाद्या राष्ट्रीय संकटावेळी लोकांना मदत केली जाते. त्यापद्धतीनेच गरीबांना मदत केली पाहिजे. जेणेकरून त्या लोकांचे जगणे सुरळित होईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
यापूर्वी रतन टाटांनी भ्रष्टाचार आणि काळा पैसा संपवण्यासाठी मोदी सरकारने नोटाबंदीचा धाडसी निर्णय घेतला असल्याचे सांगत या निर्णयाला पाठिंबा दिला होता.