देशभरात करोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असून गेल्या चोवीस तासांमध्ये ६,०८० नव्या रुग्णांची भर पडली आहे. आत्तापर्यंत एका दिवसात झालेली ही सर्वाधिक वाढ आहे. एकूण रुग्णांची संख्या देशभरात १ लाख १८,४४७ झाली आहे. मात्र, टाळेबंदीमुळे करोनाच्या महासाथीचा प्रादुर्भावाचा वेग कमी करण्यात मोठे यश आल्याचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केला.

राज्यामध्ये चोवीस तासांत २९४० नवे रुग्ण दाखल झाले असून मृत्युसंख्या १५१७ इतकी झाली आहे. देशभरात करोनामुळे एकूण मृत्यू ३,५८३ झाले आहेत. गेल्या चोवीस तासांमध्ये ६,०८० नव्या रुग्णांची भर पडली असून आत्तापर्यंत एका दिवसात झालेली ही सर्वाधिक वाढ आहे. १७ ते २२ मे या सहा दिवसांमध्ये अनुक्रमे प्रतिदिन ४९८७, ५२४२, ४९७०, ५६११, ५६०९, ६०८८ इतकी रुग्णांमध्ये वाढ झाली. गेल्या चोवीस तासांमध्ये १४८ मृत्यू झाले आहेत.

 ७८ हजार मृत्यू टाळण्यात यश

टाळेबंदी लागू केल्यामुळे १४ ते २९ लाख रुग्ण आणि ३७ ते ७८ हजार मृत्यू टाळण्यात यश आल्याचे केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाचे सचिव प्रवीण श्रीवास्तव व करोनासंदर्भातील उच्चाधिकार गट-१चे प्रमुख व निती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी शुक्रवारी सांगितले. बॉस्टन कन्स्लटंट ग्रुपच्या अंदाजानुसार आत्ता देशात असलेल्या करोनाबाधितांपेक्षा रुग्णांची संख्या ३६ लाख ते ७० लाखांनी जास्त झाली असती. रुग्णांचे मृत्यूही १.२ लाखांनी वाढले असते.

फक्त शहरांमध्ये बाधित अधिक :  करोनाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने शहरांमध्ये झालेला आहे. करोनाचे ८० टक्के रुग्ण आणि मृत्यू फक्त पाच राज्यांमध्ये आहेत. सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात, दिल्ली आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये आढळले आहेत. त्यातही करोनाचे ६० टक्के रुग्ण आणि मृत्यू फक्त मुंबई, दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद आणि ठाणे पाच शहरांमध्ये आहेत.