भारतात करोनाचा संसर्ग वेगाने वाढतच असल्याचे चित्र आहे. गेल्या चोवीस तासांत देशात ५७,९८२ नवे करोनाबाधित आढळून आले आहेत. तर ९४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण रुग्णसंख्या आता २६ लाखांच्या पार पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सकाळी ही आकडेवारी जाहीर केली.

आजच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २६ लाख ४७ हजार ६६४ झाली आहे. यांपैकी ५० हजार ९२१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १९ लाख १९ हजार ८४३ रुग्ण बरे झाले आहेत. ६ लाख ७६ हजार ९०० अॅक्टिव रुग्ण आहेत. करोना संक्रमितांच्या संख्येच्या हिशोबानं भारत जगातील तिसरा सर्वाधिक बाधित देश बनला आहे.

तर आयसीएमआरच्या माहितीनुसार, देशात १६ ऑगस्टपर्यंत एकूण तीन कोटी ४१ हजार ४०० नमुन्यांची चाचणी झाली आहे. रविवारी एका दिवसात ७ लाख ३१ हजार ६९७ नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे.

जगभरात करोनाचा संसर्ग वाढत आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील सेंटर फॉर सिस्टिम्स सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंगच्या (सीएसएसई) माहितीनुसार, अमेरिकेत रविवारी कोविड-१९च्या बाधितांची एकूण संख्या ५४ लाखांहून अधिक झाली आहे. अमेरिकेत एकूण रुग्णसंख्या ५४,००,१८० झाली आहे. तर मृतांची एकूण संख्या १,६९,९५५ झाली आहे.

सर्वाधिक संसर्ग झालेल्या अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात ६,२२,४२७ बाधित आढळले आहेत. त्यानंतर फ्लोरिडात ५,७३,४१६, टेक्सासमध्ये ५,५४,८२६ तर न्यूयॉर्कमध्ये ४,२५,५०८ बाधित आढळले आहेत. सीएसएसईच्या माहितीनुसार, १,८०,००० पेक्षा अधिक रुग्णसंख्येमध्ये जॉर्जिया, इलिनोइस, अॅरिझोना आणि न्यू जर्सी या राज्यांचा समावेश आहे. आजवर बाधितांचे प्रमाण आणि मृत्यूंमध्ये अमेरिकेला सर्वाधिक फटका बसला आहे.