करोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लसीची निर्मिती करणाऱ्या पुण्यातील ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे अध्यक्ष सायरस पूनावाला आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला, अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांना सरकारने २०२२ साठी पद्मभूषण देण्याचा निर्णय घेतला आहे. सायरस पूनावाला हे पूनावाला ग्रुपचे अध्यक्ष आहेत, ज्यामध्ये सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचाही समावेश आहे. सीरम इन्स्टिट्यूटनेच भारतात कोव्हिशिल्ड लस  तयार केली आहे.

भारतामध्ये करोना प्रतिबंधक लसीकरणासाठी सर्वात आधी परवानगी मिळालेल्या पुण्यातील ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे अध्यक्ष असणारे सायरस पूनावाला यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असणाऱ्या पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांचे पुत्र अदर पूनावाला यांनी एक खास ट्विट केले आहे.

“या वर्षी पद्म पुरस्कार प्राप्त होणाऱ्या सर्व पात्र व्यक्तींचे माझे मनःपूर्वक अभिनंदन. माझे गुरू, माझे नायक, माझे वडील डॉ. सायरस पूनावाला यांचा गौरव केल्याबद्दल मी भारत सरकारचे आभार मानतो,” असे अदर पूनावाला यांनी म्हटले आहे.

सायरस पूनावाला यांना पद्मभूषण जाहीर झाल्यानंतर शरद पवार यांनीही एक खास ट्विट केले आहे. “माझा बॅचमेट असणाऱ्या सायरस पूनावाला यांचा मला फार अभिमान वाटतोय. त्यांना औषध क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालाय,” असं शरद पवार यांनी म्हटले आहे. करोना महामारीमध्ये कोव्हिशिल्ड लस वेगाने तयार करून ती जगभर पोहोचवल्याबद्दल सरकारने यापूर्वी अनेकदा सिरम इन्स्टिट्यूटच्या कार्याचे कौतुक केले आहे. यावेळी सिरम इन्स्टिट्यूटचे एमडी सायरस पूनावाला यांचा गौरव करून एक मोठे उदाहरण समोर ठेवण्यात आले आहे.

सायरस पूनावाला यांनी पुण्यातील हडपसर परिसरात १९६६ साली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना केली. सायरस पूनावाला यांना शर्यतीच्या घोड्यांमध्ये रस होता. घोड्यांच्या रक्ताचा उपयोग अनेक प्रकारच्या लस निर्मितीसाठी केला जातो. त्यातूनच सायरस पूनावाला यांनी लस निर्मितीक्षेत्रात पाऊल टाकले. ‘सीरम’ ही विविध आजारांवरील लस निर्माण करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मंगळवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये देशातील १२८ महत्त्वाच्या अशा व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये देशातील पहिले सीडीएस बिपिन रावत आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांची नावे आहेत, ज्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.