पंजाबच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ सुरू आहे. पक्षश्रेष्ठींना आपल्या कार्यक्षमतेबद्दल शंका असल्याने आपल्याला अपमानित वाटत आहे, असं कारण देत कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी फोन करुन आपल्याला सॉरी म्हणाल्याचा दावा केला आहे. तर राजीनामा देण्यापूर्वी सिंग यांनी गांधी यांना पत्र लिहिलं असल्याचंही आता समोर आलं आहे.

पंजाबच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याच्या काही तासांपूर्वी अमरिंदर सिंग यांनी काल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात गेल्या पाच महिन्यांच्या राजकीय घडामोडींमुळे दुःखी असल्याचे जाहीर केले. या पत्रात सिंग यांनी म्हटलं आहे की, नवज्योत सिंग सिद्धू यांच्या कडव्या हल्ल्यामुळे ते राजीनामा देत आहेत. त्याचबरोबर राज्यातल्या राजकीय घडामोडी पंजाबच्या समस्या आणि राज्याच्या गरजांवर आधारित नाहीत हेही सिंग यांनी अधोरेखित केले आहे.

हेही वाचा – “राजीनाम्यानंतर सोनिया गांधी मला फोन करुन सॉरी म्हणाल्या”; कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा दावा

अमरिंदर सिंग यांनी आपल्या प्रशासनाचा बचाव केला आणि आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या आरोपांचा मागोवा घेतला, ज्यात पोलीस कारवायांसह, वीजदरासंदर्भातला वाद, शेतकरी आंदोलन आणि करोना महामारीच्या परिस्थितीचा समावेश आहे.

त्यांनी श्रीमती गांधींना ही आठवण करून दिली आहे की, “पंजाबचे लोक भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या परिपक्व आणि प्रभावी सार्वजनिक धोरणांकडे पाहत आहेत, जे फक्त चांगलं राजकारणच नाही तर सामान्य माणसाच्या समस्यांच्या निराकरणावरही लक्ष केंद्रित करतात.