भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या मुलीने म्हणजेच शर्मिष्ठा मुखर्जी यांनी 'In Pranab, My Father: A Daughter Remembers' हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकांमधल्या दाव्यांमुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. राहुल गांधी हे विनम्र स्वभावाचे आहेत त्यांना अनेक प्रश्नही पडतात मात्र त्यांना राजकीय समज येणं बाकी आहे असं प्रणव मुखर्जी म्हणाले होते. पुस्तकातला हा उल्लेख बुधवारीच समोर आला होता. त्यानंतर आता आणखी एक उल्लेख समोर आला आहे. शर्मिष्ठा मुखर्जी यांनी त्यांच्या पुस्तकात काय म्हटलं आहे? "माझ्या वडिलांना (प्रणव मुखर्जी) यांना राहुल गांधी अनेकदा भेटायला येत असत. एकदा माझे वडील म्हणाले होते की राहुल गांधींंच्या कार्यालयाला तर AM, PM यातला फरक समजत नाही मग अशात ते पंतप्रधान कार्यालय म्हणजेच PMO चालवण्याची अपेक्षा कशी काय ठेवू शकतात? " शर्मिष्ठा मुखर्जी यांनी लिहिलेलं हे पुस्तक ११ डिसेंबरला प्रकाशित होणार आहे. हे पण वाचा- “राहुल गांधींना राजकीय परिपक्वता येणं बाकी”, प्रणव मुखर्जींनी सांगितलं होतं, ‘या’ पुस्तकात मुलगी शर्मिष्ठा यांचा दावा पुस्तकात हा उल्लेख नेमक्या कुठल्या प्रसंगावर आहे? शर्मिष्ठा मुखर्जी या पुस्तकात म्हणतात, "एके दिवशी सकाळी, मुगल गार्डन (आत्ताचं अमृत गार्डन) मध्ये प्रणव मुखर्जी मॉर्निंग वॉकला गेले होते. त्यावेळी राहुल गांधी त्यांना भेटायला आले. प्रणव मुखर्जींना मॉर्निंग वॉक आणि पूजा यात कुठलाही व्यत्यय आलेला चालत नसे. तरीही त्यांनी राहुल गांधींना भेटण्याचा निर्णय घेतला. याबाबत चौकशी केल्यावर त्यांना कळलं की राहुल गांधी आणि त्यांची भेट संध्याकाळी ठरली होती. मात्र राहुल गांधींच्या कार्यालयाने त्यांना सांगितलं की पूर्वनियोजित भेट सकाळी आहे. त्यांनी हा प्रसंग मला सांगितला आणि म्हणाले की राहुल गांधी यांच्या कार्यालयाला AM, PM यातला फरक कळत नाही तर मग ते पंतप्रधान कार्यालय चालवण्याची अपेक्षा किंवा स्वप्न कसं काय पाहू शकतात?" पुस्तकात प्रणव मुखर्जींच्या डायरीचीही पानं 'In Pranab, My Father: A Daughter Remembers' या शर्मिष्ठा मुखर्जी लिखित पुस्तकात प्रणव मुखर्जी यांच्या डायरीची काही पानं आहेत. या डायरीत त्यांनी समकालीन राजकारणावर त्यांचे विचार मांडले आहेत. प्रणव मुखर्जी यांनी देशाचं राष्ट्रपतीपदही भुषवलं होतं. तसंच त्यांनी गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांसह काम केलं होतं. ऑगस्ट २०२० मध्ये वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. प्रणव मुखर्जींनी काय म्हटलं आहे डायरीत? प्रणव मुखर्जी यांच्या मुलीने केलेल्या दाव्याप्रमाणे प्रणव मुखर्जींनी त्यांच्या डायरीत हे देखील लिहिलं होतं की, "राहुल गांधी AICC च्या कार्यक्रमात आले नाहीत. ते का अनुपस्थित राहिले हे मला माहीत नाही. जेव्हा गोष्टी सहजपणे मिळतात तेव्हा त्यांची किंमत राहात नाही." याचसह प्रणव मुखर्जींनीही हा देखील उल्लेख केला आहे की, "सोनिया गांधी आपल्या मुलाला (राहुल गांधी) उत्तराधिकारी करण्यासाठी सगळे प्रयत्न करत आहेत. मात्र या युवकात (राहुल गांधी) राजकीय करीश्मा आणि राजकीय समज यांचा काही प्रमाणत अभाव आहे. काँग्रेसला ते पुन्हा उभारी देऊ शकतात का? लोकांना ते प्रेरित करु शकतात का? हे मला आज ठाऊक नाही." एनडीटीव्हीने याविषयीचं वृत्त दिलं आहे. शर्मिष्ठा मुखर्जी यांनी पुढे असंही म्हटलं आहे की, "प्रणव मुखर्जी हे राहुल गांधींचे टीकाकार होते. त्यांना असं वाटत होतं की राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाला नवी उभारी देऊ शकणार नाहीत. मात्र एक बाब निर्विवाद आहे की जर आज प्रणव मुखर्जी हयात असते तर त्यांनी राहुल गांधींचं कौतुक केलं असतं. भारत जोडो यात्रा राहुल गांधी यांनी ज्या प्रकारे यशस्वी करुन दाखवली त्याची त्यांनी स्तुती केली असती."