करोना व लॉकडाउनमुळे आधीच संथ झालेला अर्थव्यवस्थेचा गाडा आणखी चिखलात रुतला गेला आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं निर्गुंतवणुकीच्या धोरणावर जोर दिला असून, आणखी २६ कंपन्याचं खासगीकरण केलं जाणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधून (PSUs) सरकार आपली हिस्सेदारी विकण्यासंदर्भातील योजना तयार करत आहे. सरकारच्या या धोरणांवरून काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

करोनाच्या शिरकावापूर्वीच अर्थव्यवस्थेची गती मंदावली होती. त्यात ओढवलेल्या करोना व लॉकडाउनच्या संकटानं अर्थव्यवस्थेला खिळ बसली. याचा मोठा फटका बसला आहे. या आर्थिक गर्तेतून बाहेर पडण्यासाठी सरकारनं निर्गुंतवणुकीचं धोरणं स्वीकारलं आहे.

निर्गुंतवणुकीच्या धोरणावर जोर देत सरकारनं आधीच काही सार्वजनिक कंपन्यातीली हिस्सेदारी विकली आहे. आता आणखी २६ कंपन्यांचं खासगीकरण करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याची घोषणा केली आहे. या निर्णयावरून काँग्रेसनं मोदींना लक्ष्य केलं आहे.

आणखी वाचा- सार्वजनिक क्षेत्रातील ‘या’ २६ कंपन्यांचे केंद्र सरकार करणार खासगीकरण; पाहा RTI मधून समोर आलेली संपूर्ण यादी

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट केलं आहे. “देशाच्या आणखी २६ सरकारी कंपन्या विकल्या जाणार आहे. ७० वर्षात जे काही उभं केलं होतं, ते सगळं हे विकून टाकणार. आणि मोदीजी काय सांगून सत्तेत आले होते… ‘मैं देश नही बिकने दूँगा’ त्याचा अर्थ होता देशातील काही विक्री होण्यापासून सोडणार नाही. मोदी है तो यही मुमकिन है,” अशी टीका काँग्रेसनं केली आहे.

२७ जुलै २०२० रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी एक महत्वाची घोषणा करताना केंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्रातील २३ कंपन्यांचे खासगीकरण करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, एका माहिती अधिकार अर्जात मागितलेल्या माहितीत सरकार २३ नव्हे तर २६ कंपन्यांचं खासगीकरण करणार असल्याची माहिती समोर आली आहे.