Kolkata Law Student Rape Case : कोलकाता येथील एका लॉ कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे कोलकाता पुन्हा हादरलं आहे. या घटनेनंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पोलिसांनी या प्रकरणात आधी तीन आरोपींना अटक केलं असून या आरोपींमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या एका नेत्याचाही सहभाग आहे. त्यानंतर आज (२८ जून)पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे. संबंधित लॉ कॉलेजमधील सुरक्षा रक्षकालाही अटक करण्यात आलं आहे.
या प्रकरणात आतापर्यंत एकूण चार जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात असं दिसून आलं की, सामूहिक बलात्काराच्या वेळी सुरक्षा रक्षक पिनाकी बॅनर्जी हा घटनास्थळी उपस्थित होता. तसेच आरोपीच्या सूचनेनुसार तो संबंधित तरुणीला त्या ठिकाणी सोडून त्याच्या खोलीमधून (गार्ड रूम) निघून गेला. तेव्हा ती तरुणी मदतीसाठी वारंवार विनंती करत होती, पण तरीही संबंधित सुरक्षा रक्षकाने तिला मदत केली नसल्याचं तपासात समोर आलं आणि त्यानंतर पोलिसांनी त्यालाही अटक केल्याचं इंडिया टुडेनी एका वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, वृत्तानुसार, संबंधित घटनेची माहिती सुरक्षा रक्षकाने महाविद्यालयीन प्रशासनाला किंवा पोलिसांना देणं अपेक्षित होतं. मात्र, सुरक्षा रक्षकाने यापैकी काहीही केलं नाही. संबंधित घटनेची माहिती कोणालाही दिली नाही. त्यानंतर पीडितेने पोलिसांत तक्रार दिल्यानंतरच हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी सुरक्षा रक्षकाचीही चौकशी केली असता चौकशीत सुरक्षा रक्षकाचा निष्काळजीपणा समोर आला आहे.
‘मी पाया पडले, विनवणी केली, पण…’, पीडितेने सांगितली आपबिती
२४ वर्षीय पीडितेने तक्रारीत म्हटलं की, “३१ वर्षीय मोनोजित मिश्रा याने मला लग्नाचा प्रस्ताव दिला होता. मात्र, त्याचा प्रस्ताव मी नाकारल्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. आरोपी मिश्रा हा याच कॉलेजमधला माजी विद्यार्थी आणि तृणमूल काँग्रेस विद्यार्थी संघटनेचा पदाधिकारी आहे. त्याने लग्न करण्यासाठी दबाव आणला होता”, असं पीडितेने म्हटलं आहे.
तसेच पीडितेने घटनाक्रम सांगताना तक्रारीत म्हटलं की, “आरोपीने माझ्याशी लैंगिक संबंध ठेवण्याच्या उद्देशाने जबरदस्ती केली. त्यानंतर मी नकार देत प्रतिकार केला. मी रडत-रडत त्याला मला सोडण्यास सांगितलं. मी आरोपीच्या पाया पडले, मला जाऊ देण्याची विनंती केली, पण त्याने ऐकलं नाही आणि मला गार्डच्या खोलीत घेऊन गेला”, अशी आपबिती पीडितेने सांगितली आहे.