Russia Launches 500 Drones At Ukraine: गेल्या तीन वर्षांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेले युद्ध थांबण्याची कोणतीही चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. कारण रशियाने युक्रेनविरोधातील कारवाई आणखी आक्रमक करत, गेल्या आठवड्यात शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे सलग तीन दिवस हवाई हल्ले केले आहेत. यामध्ये रशियाने युक्रेनवर तब्बल ९०० ड्रोन डागले आहेत. याबाबत एका युक्रेनियन अधिकाऱ्याने माहिती दिली आहे.
याचबरोबर, सलग तीन रात्री रशियाने युक्रेनवर केलेल्या या हवाई बॉम्बहल्ल्यांवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर टीका करत म्हटले की, “ते वेडे झाले आहेत.”
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धविरामासाठी प्रयत्न केले होते. मार्चमध्ये अमेरिकेने मांडलेला ३० दिवसांचा युद्धविरामाचा प्रस्ताव युक्रेनकडून बिनशर्त मान्य करण्यात आला होता. मात्र रशियाने अमेरिकेचा हा प्रस्ताव नाकारला होता.
या महिन्यातच रशियाने युक्रेनवर तीन वेळा हवाई बॉम्बहल्ले करण्याचे त्यांचेच विक्रम मोडले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की म्हणाले की, “या हल्ल्यांमागे कोणताही महत्त्वाचे लष्करी तर्क नाही, परंतु त्याचा राजकीय अर्थ बराच आहे.”
रविवारी रात्री, रशियाने युक्रेनवर २९८ ड्रोन आणि ६९ क्षेपणास्त्रे डागली आहेत. रशियाचा युक्रेनियनवरील युद्धकाळातील मोठा हवाई हल्ला असल्याचे सांगितले. शुक्रवार ते रविवारपर्यंत रशियाने युक्रेनवर सुमारे ९०० ड्रोन डागले, असे युक्रेनियन हवाई दलाच्या संपर्क विभागाचे प्रमुख युरी इहनाट यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितले
दरम्यान, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सोमवारी सांगितले की, त्यांच्या सैन्याने सोमवारी रात्री १०३ युक्रेनियन ड्रोन पाडले जे मॉस्कोजवळील दक्षिण आणि पश्चिम भागातून उड्डान करत होते. रशियाच्या फेडरल एअर ट्रान्सपोर्ट एजन्सीने सांगितले की, रविवार आणि सोमवारी मॉस्कोच्या तीन विमानतळांवर नियोजित ३२ उड्डाणे युक्रेनियन ड्रोन हल्ल्यांमुळे वळवावी लागली.
दरम्यान युक्रेनवर हल्ले करण्यासाठी रशिया २०२२ पासून इराणी बनावटीचे शाहेद ड्रोनचा वापर करत आहे. दुसरीकडे युक्रेनने त्याच्या मित्र राष्ट्रांकडून लहान ड्रोन मिळवण्यासोबतच, रशियाच्या आत खोलवर हल्ले करण्यासाठी स्वतःचे लांब पल्ल्याचे ड्रोन विकसित केले आहेत.