नवी दिल्ली, पीटीआय : जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (वय ७९) यांचे येथील राम मनोहर लोहिया रुग्णालयात मंगळवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. गोवा, बिहार, मेघालय तसेच ओडिशाचे राज्यपालपदही त्यांनी सांभाळले. याखेरीज लोकसभा तसेच राज्यसभेचेही ते सदस्य होते.

विविध व्याधींवर अतिक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अनुच्छेद ३७० हटविण्याचा निर्णय केंद्राने ५ ऑगस्ट २०१९ रोजी घेतला. त्यावेळी मलिक हे जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल होते. जम्मू आणि काश्मीरमध्ये दोन महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी लाच देण्याचा प्रयत्न झाला या त्यांच्या वक्तव्यानंतर ते वादात सापडले. शेतकऱ्यांबाबतचे मुद्दे तसेच पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर (२०१९) त्यांनी केंद्र सरकारला जाब विचारला होता. मलिक यांनी उपस्थित केलेल्या दोन प्रकल्पांची केंद्रीय अन्वेषण विभागाने चौकशी सुरू केली होती. त्यातील २२०० कोटींच्या किरू जलविद्याुत प्रकल्पाबाबतच्या खटल्यात मलिक यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते.

उत्तर प्रदेशातील बागपत येथे २४ जुलै १९४६ रोजी मलिक यांचा जन्म झाला. समाजवादी विचारांच्या विद्यार्थी चळवळीतून त्यांनी भारतीय क्रांती दलात प्रवेश केला. त्यानंतर काँग्रेस, जनता दल व अखेरीस भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास होता. व्ही. पी. सिंह यांच्या मंत्रिमंडळात ते राज्यमंत्री होते. मलिक यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.