न्यायालय म्हटलं की शिस्त आणि शांतता आलीच. पण, कधी कधी काही प्रसंग घडतात आणि न्यायालयालाही संताप अनावर होऊन जातो. अशीच एक घटना व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे सुरू असलेल्या सुनावणीवेळी घडली. सुनावणी सुरू असताना कॅमेऱ्यांसमोर एक व्यक्ती शर्ट न घातलाच दिसली. त्यावरून सर्वोच्च न्यायालय संतापले. “मागील सात ते आठ महिन्यांपासून व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे सुनावणी घेतली जात आहे. तरीही असे प्रकार घडत आहेत,” अशा शब्दात न्यायालयानं फटकारलं.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव आणि हेमंत गुप्ता यांच्या खंठपीठासमोर एका याचिकेवर व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे सुनावणी सुरू होती. सुनावणी सुरू असतानाच एक अंगावर शर्ट न घातलेला उघडा व्यक्ती स्क्रीनवर दिसू लागला. अचानक हे दृश्य पाहून न्यायायमूर्तींचा संयम सुटला. न्यायमूर्तींनी नाराजी व्यक्त करत फटकारले.

“व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे सुनावणीला सुरूवात होऊन सात आठ महिने लोटले आहेत. तरीही असे प्रकार घडत आहेत. असं घडायला नको,” अशा शब्दात न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव यांनी या प्रकारवर संताप व्यक्त केला.
करोनानं देशात शिरकाव अनेक बदल झाले. जीवनशैलीबरोबरच कामाच्या पद्धतीही बदलल्या. अगदी न्याय व्यवस्थाही यातून सुटली नाही. न्यायालयांनाही व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे सुनावण्या घ्याव्या लागल्या. या सुनावण्यावेळी अनेक गंमतीशीर प्रसंगही घडले.

यापूर्वी घडला होता गंमतीशीर प्रसंग

२६ ऑक्टोबर रोजी असाच प्रसंग घडला होता. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली खंठपीठासमोर सुनावणी सुरू असताना एक वकील शर्ट न घालताच स्क्रीन समोर आला होता. हे बघून न्यायालयाला धक्काच बसला होता. त्यावेळी न्यायालयाने वकिलांची कानउघडणी केली होती.