scorecardresearch

Kaali Poster Row : “अशा भारतात राहायचे नाही, जिथे…”; महुआ मोईत्रांचे विरोधकांना प्रत्युत्तर

भाजपाच्या गुंडगिरीला मी घाबरत नाही, असेही महुआ मोईत्रा म्हणाल्या

Mahua Moitra
टीएमसी खासदार महुआ मोइत्रा (फोटो – PTI)

तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) खासदार महुआ मोईत्रा यांच्या देवीबाबतच्या वक्तव्यानंतर वाद वाढताना दिसत आहे. महुआ मोईत्रांविरुद्ध उत्तर प्रदेश, कोलकाता आणि भोपाळसह अनेक भागात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. त्याचवेळी सर्व बाजूंनी वादात अडकलेल्या महुआ यांनी आपण कोणाला घाबरत नसल्याचे म्हटले आहे. टीएमसीने आधीच त्यांच्या वक्तव्यापासून स्वतःला दूर केले आहे आणि आता भाजपा देखील त्यांच्या अटकेची मागणी करत आहे.

मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये बुधवारी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्याविरुद्ध हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, भाजपाच्या पश्चिम बंगाल शाखेने मोईत्रा यांच्या अटकेची मागणी केली आहे. हिंदू देवतांचा अवमान करण्याची पश्चिम बंगालच्या सत्ताधारी पक्षाची ही अधिकृत भूमिका आहे का, असाही सवाल भाजपाने उपस्थित केला आहे.

Kaali Poster Row: महिला निर्मात्याचं ते वादग्रस्त पोस्टर हटवल्यानंतर पुन्हा नवं ट्वीट; एका शब्दाच्या कॅप्शनसहीत शेअर केला हा फोटो

मोईत्रा यांनी यावर दिलेल्या प्रत्युत्तरात म्हटले आहे की, त्या ‘देवीच्या उपासक’ आहेत आणि भाजपाच्या गुंडगिरीला आपण घाबरत नाही. सत्याला कुठल्याही कुबड्या घेण्याची गरज नसते, असे मोईत्रा म्हणाल्या. भाजपावर ताशेरे ओढत मोईत्रा यांनी ट्विटमध्ये “जय माँ काली. बंगालवासीय जिची पूजा करतात. ती धैर्यवान देवी आहे,” असे नमूद करून मी काली देवीची उपासक आहे. मला कशाचीच भीती वाटत नाही. तुमच्या गुंडांची, तुमच्या पोलिसांची आणि विशेषत: तुमच्या ट्रोल्सची भीती वाटत नाही, असे म्हटले आहे.

“माझ्यासाठी कालीमाता मांसाहार, मद्याचा स्वीकार करणारी”, तृणमूल खासदार महुआ मोईत्रांचं विधान; ‘त्या’ पोस्टरवरून वाद!

अशा भारतात राहायचं नाही

महुआ यांनी ट्विट करत मला अशा भारतात राहायचे नाही जिथे मला माझ्या धर्माबद्दल बोलण्याचेही स्वातंत्र्य नाही, असे म्हटले आहे. “मला अशा भारतात राहायचे नाही जिथे फक्त भाजपाचा पितृसत्ताक ब्राह्मणवादी दृष्टीकोन वरचढ असेल. मी मरेपर्यंत माझ्या विधानापासून मागे हटणार नाही. तुम्ही गुन्हे दाखल करा. मी देशाच्या प्रत्येक कोर्टात तुम्हाला भेटेल,” असे मोईत्रा यांनी म्हटले आहे.

‘पोस्टर किंवा चित्रपटाला पाठिंबा दिला नाही’

“तुम्ही खोटे बोलल्याने तुम्हाला चांगले हिंदू होता येणार नाही. मी कधीही कोणत्याही चित्रपटाचे किंवा पोस्टचे समर्थन केले नाही किंवा मी कधीही धूम्रपान या शब्दाचा उल्लेख केला नाही. तारापीठात जाऊन माँ कालीला खाण्यापिण्यासाठी काय अर्पण केले जाते ते पहा,” असे महुआ मोईत्रा यांनी म्हटले आहे.

शशी थरूर यांनी व्यक्त केले आश्चर्य

दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी ‘ट्वीट’ केले, की मोईत्रा यांनी काली देवीबाबात केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर झालेल्या टीकेने मला धक्का बसला आहे. त्यांनी लोकांना थोडेसे प्रगल्भ व्हावे. धर्म ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. दुर्भावनेतून निर्माण केलेल्या वादाबद्दल अनभिज्ञ नाही, परंतु मोईत्रांवरील हल्ल्यामुळे मी अस्वस्थ झालो आहे. धार्मिक भावना दुखावल्याबद्दल मध्य प्रदेशातील पोलिसांनी बुधवारी मोईत्रांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या संदर्भातील निवेदनात म्हटले आहे, की, मोईत्रांच्या वक्तव्याने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.

मनिमेकलाईंचे वादग्रस्त ‘ट्वीट’ हटवले

‘ट्विटर’ने चित्रपट निर्मात्या लीना मनिमेकलाई यांचे वादग्रस्त ‘ट्विट’ काढून टाकले आहे. २ जुलै रोजी एका ‘ट्वीट’मध्ये, कॅनडातील टोरंटो येथे राहणाऱ्या मणिमेकलाई यांनी माहितीपटासंबंधीचे पोस्टर प्रसिद्ध केले होते. त्यावरून हा वाद निर्माण झाला आहे. कायदेशीर मागणीनुसार हे ‘ट्वीट’ भारतात दाखवले जाऊ शकत नाही, अशी टिप्पणी करून ‘ट्विटर’ने हे ट्वीट कधी हटवले, हे स्पष्ट झालेले नाही. दिल्ली पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी मंगळवारी वादग्रस्त ट्वीटमुळे मणिमेकलाई यांच्याविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. ओटावा येथील भारतीय उच्चायुक्तांनी कॅनडातील हिंदू समुदायाच्या नेत्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कॅनडाच्या अधिकाऱ्यांना चित्रपटाशी संबंधित प्रक्षोभक बाबी काढून टाकण्याचे आवाहन केले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tmc mp mahua moitra bluntly on kaali poster controversy abn

ताज्या बातम्या