Parliament Monsoon Session 2025 : संसदेचं पावसाळी अधिवेशन २१ जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी दिली आहे. संसदेचं हे पावसाळी अधिवेशन २१ जुलै ते १२ ऑगस्ट या दरम्यान असणार आहे. या अधिवेशनाच्या काळात संसदेच्या दोन्ही सभागृहात देशातील विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. २१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होणार असल्याची माहिती मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली आहे.

दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय कामकाज समितीने पावसाळी अधिवेशनाच्या संदर्भातील तारखांबाबत निर्णय घेतत आल्याचं मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होणार?

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. तसेच अनेक जण जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं. अद्यापही भारता आणि पाकिस्तानमध्ये काही प्रमाणात तणावाचं वातावरण असल्याचं सांगितलं जातं. या पार्श्वभूमीवरून ऑपरेशन सिंदूरच्या अनुषंगाने विशेष सत्र घेण्याची मागणी विरोधकांनी केली होती. मात्र, विशेष सत्र घेण्याबाबत केंद्र सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर आता संसदेचं पावसाळी अधिवेशन २१ जुलैपासून सुरू होणार असून याच अधिवेशनादरम्यान ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होण्याची शक्यता आहे. याबाबत मंत्री किरेन रिजिजू यांनी संकेत दिले आहेत. आम्ही ऑपरेशन सिंदूरसह सर्व मुद्द्यांवर चर्चा करणार असल्याचं किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. दरम्यान, या पावसाळी अधिवेशनात पाकिस्तानवर देखील चर्चा होऊ शकते. विरोधी पक्ष केंद्र सरकारला अनेक प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. तसेच या दरम्यान काही महत्वाचे विधेयके सादर होण्याची देखील शक्यता आहे.