News Flash

शेट्टी यांच्या विजयाची साद शरद पवार घालणार

‘राजू शेट्टी यांना विजयी करा,’ अशी साद घालण्यासाठी पवार शुक्रवारी पंचगंगा काठी जाहीर सभा घेणार आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

शत्रुत्व आणि मैत्रीचे वर्तुळ पूर्ण

दयानंद लिपारे, कोल्हापूर

‘राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो,’ या उक्तीचा प्रत्यय कोल्हापुरात पाहायला मिळत आहे. साखर सम्राट, भांडवलदारांचे नेते म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी दोन दशके टीकेचे आसूड ओढले. पवार यांनीही शेट्टींना नमवण्यासाठी जातीपासून ते निवडणुकीच्या आखाडय़ापर्यंतचे सर्व मार्ग चोखाळले. टोकाच्या अंतरावर असणारे हे भिन्न विचारसरणीचे नेते आता राजकीय तडजोडीतून एकमेकांच्या अगदी निकट आले आहेत. इतके की ‘राजू शेट्टी यांना विजयी करा,’ अशी साद घालण्यासाठी पवार शुक्रवारी पंचगंगा काठी जाहीर सभा घेणार आहेत.

राज्याच्या राज्यकारणात साखर कारखानदारीचे महत्त्व नेहमीच अनन्यसाधारण ठरले आहे. एक काळ असा होता की साखर कारखानदारांनी उसाचा दर घोषित करायचा आणि शेतकऱ्यांनी फेटे उडवून त्याचा आनंद व्यक्त करायचा. मिळेल त्या दरात समाधान मानण्याची वृत्ती होती. काळाच्या ओघात शरद जोशी यांच्यासारखे नेतृत्व उदयाला आले. त्यांच्या मुशीत अनेक नवतरुण पुढे आले; त्यापैकी एक राजू शेट्टी. शेट्टी यांच्या आक्रमक आंदोलनामुळे उसाच्या दराने चार आकडी रक्कम पार केली.

हजारावरून ती दोन हजारांपर्यंत पोहचली. उसाचा गोडवा माहीत असणाऱ्या शेतकऱ्यांना आता उसाची गोड किंमतही कळू लागली. पण त्यासाठी शेट्टी यांना राज्यातील सर्वात प्रभावी अशा शरद पवार यांच्याशीही मुकाबला करावा लागला.

शेट्टी यांनी पवार यांची बारामती, हर्षवर्धन पाटील यांचे इंदापूर, पृथ्वीराज चव्हाण यांचे कराड अशा सर्व ठिकाणी उग्र आंदोलने छेडली. बारामतीत तर पवार यांचा तिळपापड झाला आणि तेथून पवार-शेट्टी संघर्षांची बीजे रोवली गेली. उसाच्या शिवारातून राजकीय स्थान भक्कम करणाऱ्या शेट्टींना रोखण्यासाठी पवार यांनी जात सुद्धा काढली. शेतीशी संबंधित त्यांची जात नाही, असा उल्लेख करून त्यांनी शेट्टी यांच्या विरोधात जातीय ध्रुवीकरणाचे गणितही आखले होते. तरीही शेट्टी पुढे सरकले.

दरम्यान काळाबरोबर राजकारण आणि त्यातील व्यक्ती, पक्ष यांच्या भूमिकाही बदलल्या. शेट्टी यांनी केंद्र शासनाविरोधात आवाज बुलंद केल्यावर पवारांनी त्यांच्याविषयी सहानुभूती व्यक्त करायला सुरुवात केली. शेट्टींच्या आंदोलनांना पवारांची पडद्याआड मदत सुरू झाली. आता तर महाआघाडीत सामावलेल्या शेट्टींच्या प्रचारासाठी पवार कोल्हापुरात आले आहेत. शुक्रवारी हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव येथे पवार शेट्टींच्या विजयासाठी साद घालणार आहेत. राजकीय शत्रुत्वापासून ते सोयीच्या मैत्रीपर्यंत असे एक मोठे वर्तुळ पूर्ण झाल्याचे सध्या मतदारांना पाहण्यास मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2019 4:33 am

Web Title: lok sabha election 2019 sharad pawar campaign for raju shetty
Next Stories
1 शिंदेच्या काळात मुस्लिम तरुणांना तुरुंगात नाहक सडवले – ओवैसी
2 विकास धोरण नसलेला काँग्रेस पक्ष जनतेला मूर्ख बनवत आहे – मुख्यमंत्री
3 १०२ वर्षीय आजोबांचे प्रत्येक लोकसभा निवडणुकीत मतदान
Just Now!
X