सतेज पाटलांनंतर साताऱ्यातील गोरे बंधूही राष्ट्रवादी विरोधात

दयानंद लिपारे, कोल्हापूर</strong>

लोकसभा निवडणुकीला गती आली असून दक्षिण महाराष्ट्रात एकीकडे उभय काँग्रेसचे प्रमुख नेते युतीमध्ये प्रवेश करीत असताना काँग्रेसच्या नाराज नेत्यांच्या हातात विरोधकांचे चिन्ह दिसू लागले आहे. कोल्हापुरात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या रूपाने उठलेला विरोधाचा आवाज आता सातारा जिल्ह्यात माणचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनीही आळवण्यास सुरुवात केली आहे. गोरे यांचे स्पर्धक, राष्ट्रवादीचे शेखर गोरे यांनीही हाती कमळ घेतले आहे. या त्रयीच्या विरोधाचे समान लक्षण म्हणजे राष्ट्रवादीस विरोध. महाआघाडीच्या रूपाने एकवटलेल्या विरोधकांना हा दक्षिण महाराष्ट्रात धक्का मानला जात असून त्यांच्या यशाच्या मार्गात धोंड उभी राहिली असल्याचे दिसत आहे.

निवडणुकीच्या धामधुमीत महायुतीने विरोधकांना धक्का देण्याचे तंत्र अवलंबले आहे. काँग्रेसचे डॉ. सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आहे. धाकटय़ा पातीनंतर थोरली पातीही याच मार्गाने जाण्याच्या तयारीत आहे. सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काँग्रेसचा हात सोडून माढा मतदारसंघात कमळाची उमेदवारी मिळवली. मोहिते पाटील, नाईक निंबाळकर अशा उभय काँग्रेसच्या मातबर  मंडळींनी पक्ष सोडल्यानंतरही उभय काँग्रेसच्या अडचणी दूर होण्याची चिन्हे नाहीत. विरोधाचे लोण सातारा जिल्ह्य़ात पोहचले आहे. याचा समान धागा आहे तो ‘राष्ट्रवादी’. एकीकडे तो व्यक्तिनिष्ठ आहे तर दुसरीकडे पक्षनिष्ठ. कारण काहीही असले तरी त्याची किंमत आघाडीला चुकवावी लागणार आहे.

महाआघाडीत पहिली संघर्षांची झलक झडली ती कोल्हापुरात. राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी नको असा त्यांच्याच पक्षातून सूर आळवला जात होता. पण उमेदवारी  मिळवण्यात महाडिक यांनी बाजी मारली. तथापि, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी व्यक्तिनिष्ठ भूमिकेतून महाडिक यांना विरोध केला. यापूर्वी महाडिक यांनी आपल्याबाबत आघाडीधर्म निभावला नाही, भाजपधार्जिणी भूमिका घेतली, असा जोरदार आक्षेप घेत पाटील यांनी आता हाती ‘धनुष्यबाण’ घेतले आहे. या वादाने महाआघाडीला धक्का बसला असून महाडिक यांच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

सातारा जिल्ह्यातही बंडाळी

कोल्हापुरातील बंडाळी सातारा जिल्ह्यातही पोहचली आहे. माण तालुक्यातील दोन्ही काँग्रेसमध्ये असलेले पण एकमेकांपासून फटकून राजकारण करणाऱ्या गोरे बंधूंनीही हाती ‘कमळ’ घेत महायुतीचा प्रचार सुरू केला आहे. त्यांच्या विरोधाचे कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची राजनीती. काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी ‘माढा मतदार संघात काँग्रेस प्रामाणिकपणे आघाडीधर्म निभावतो, पण विधानसभेवेळी राष्ट्रवादीकडून आघाडीला तिलांजली देऊ न बंडखोरीला फूस दिली जाते,’ असा आक्षेप नोंदवला होता. तर, विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीकडे अधिक मते असतानाही पराभव झाल्याने शेखर गोरे व्यथित झाले होते. आपल्या ठरवून केलेल्या पराभवानंतर अनेकदा वेळ मागूनही पवारांनी आपल्याला एकदाही भेट न दिल्याचा रागही त्यांनी व्यक्त केला आहे. दोघाही गोरे बंधूंच्या मनातील राष्ट्रवादी विषयीची खदखद ऐन निवडणुकीत बाहेर पडली असून त्यांनी भाजपचा प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. गोरे बंधूंचा हा विरोध महाआघाडीला त्रासदायक आणि महायुतीच्या पथ्यावर पडणारा आहे.