भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी बीडमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर फटकेबाजी केली. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी हेमंत करकरे यांच्याबाबत केलेल्या विधानावरून मुख्यमंत्री शिंदेंनी जोरदार हल्लाबोल केला. तसेच ‘दिल्ली गाजवणार मुंडेसाहेबांची लेक, कुठून आली तुतारी चल उचलून फेक’, अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटावर टीका केला.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

“देशात तापमान वाढले आहे. राज्याचेही तापमान ४० पुढे गेले आहे. मात्र, ४ जूनला महाराष्ट्राचा पारा ४५ पार होईल. तसेच देशाचा ४०० पार होईल. महायुतीच्या या तळपत्या विजयामध्ये विरोधकांची लंका खाक झाल्याशिवाय राहणार नाही. तुतारीची पिपाणी होणार आहे. आपल्या देशात फक्त मोदी गॅरंटी चालते. पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान करण्याची गॅरंटी जनतेने घेतली आहे. बीडची जनता एकदा ज्यांना स्वीकारते त्यांची पुन्हा कधीही साथ सोडत नाही. बीडच्या जनतेने कायम गोपीनाथ मुंडे यांना प्रेम दिले. आता पंकजा मुंडे यांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी सर्वजण आले आहेत”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा : देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका, “उद्धव ठाकरे कागदी वाघ, त्यांनी आयुष्यात..”

एकनाथ शिंदेंची कवितेतून टीका

“बीडचे लोक काय म्हणतात, दिल्ली गाजवणार मुंडेसाहेबांची लेक, कुठून आली तुतारी चल उचलून फेक. बीडच्या लोकांना माहिती आहे, पंकजा मुंडे यांना मत म्हणजे नरेंद्र मोदी यांना मत आणि मोदींना मत म्हणजे देशाच्या विकासाला मत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात भारताचे लौकीक वाढवले आहे. गेल्या १० वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकही सुट्टी घेतली नाही”, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांची काँग्रेसवर टीका

“आपल्या देशातील इंडिया आघाडी पाकिस्तानबरोबर आहे. काँग्रेसचे नेते म्हणत आहेत की, २६\ ११ च्या हल्ल्यात हेमंत करकरे यांचा मृत्यू हा कसाबच्या गोळीतून झाला नाही. हे आता पाकिस्तानची भाषा बोलू लागले आहेत. विजय वडेट्टीवार हे बरे होते, पण काँग्रेसमध्ये गेल्यापासून बिघडले आहेत. फारुख अब्दुल्ला म्हणतात, पाकिस्तान बांगड्या घालत नाही, त्याच्याकडे अणुबॉम्ब आहे. आरे या देशात राहता आणि पाकिस्तानची भाषा बोलता. आमच्याकडे मोठा बॉम्ब आहे. ते (मोदी) घरात घुसून मारतात. ते सर्जिकल स्ट्राईक करतात. या देशात राहून पाकिस्तानची बोली बोलतात, त्यामुळे यांना जेलमध्ये टाकले पाहिजे”, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.