काँग्रेसकडून संविधानाच्या नावावर लाल पुस्तक छापण्यात येत असून त्याची पानं कोरी आहेत. तसेच शहरी नक्षलवादाला समर्थन देण्यासाठी त्या पुस्तकाचा रंग लाल आहे. हा एकप्रकारे संविधान संपवण्याचा प्रयत्न असून काँग्रेसला देशात स्वत:चं संविधान लागू करायचं आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नांदेडमधील प्रचारसभेत बोलताना केली होती. त्यांच्या या टीकेनंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, या टीकेबाबत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनीही भाष्य केलं आहे.

काय म्हणाले मल्लिकार्जून खरगे?

मुंबईत आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला मल्लिकार्जून खरगेदेखील उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींच्या या टीकेला प्रत्युत्तर दिलं. पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झूटो के सरकार’ आहेत. त्यांनी आरोप केला, की लाल रंगाचे संविधान दाखवून काँग्रेस शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देत आहे. मात्र, २०१७ मध्ये मोदींनी हेच संविधान तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेट म्हणून दिलं होतं. मग ते सुद्धा कोरं का? याचं उत्तर आता पंतप्रधान मोदींनी द्यावं, असं ते म्हणाले.

हेही वाचा – “संविधानाच्या नावाखाली लाल पुस्तकं छापून काँग्रेसने…”; नांदेडच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल!

पंतप्रधान मोदींनी नेमकं काय म्हटलं होतं?

दरम्यान, नांदेडमधील सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी दाखवत असलेल्या लाल संविधानावरून काँग्रेसला लक्ष्य केलं होतं. “काँग्रेसचे लोक संविधानाच्या नावावर लाल पुस्तकांचे वाटप करत आहेत. त्यावर भारताचे संविधान असं लिहिलं आहे. मात्र, त्या पुस्तकाची पान कोरी आहेत. निवडणुकीच्या प्रचारात खोट्या गोष्टी पसरवण्याचं काम काँग्रेस पक्ष करतो आहे. संविधानाच्या नावावर लाल पुस्तक छापणं आणि त्यात संविधानाचा एक शब्दही न लिहिणं हा संविधान संपवण्याचा प्रयत्न आहे”, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली होती.

हेही वाचा – “उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर…”, अमित शाहांचं भर सभेत खुलं आव्हान, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“काँग्रेसला देशात बाबासाहेब आंबेडकरांचे नाही तर स्वत:चं संविधान लागू करायचं आहे. हाच प्रयत्न त्यांनी आणीबाणीच्या काळात केला होता. काँग्रेसच्या मनात बाबासाहेब आंबेडकरांप्रती द्वेष आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान काँग्रेसने काश्मीरमध्ये लागू होऊ दिलं नाही. तिथे कलम ३७० द्वारे वेगळा कायदा लागू केला. त्यांनी तेथील दलितांना कोणतेही अधिकार दिले नाहीत, आज हेच लोक दलितांच्या हक्काच्या आणि संविधान रक्षणाच्या गोष्टी करत आहेत”, असेही ते म्हणाले होते.