भूप्रक्षोभक हलचालींमुळे जगात एक नवीन महासागर तयार होण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. शास्त्रज्ञांना आफ्रिका खंडात जमिनीच्या खोलवर खाली हालचाल आढळून आली आहे. ही हालचाल अगदी हृदयांच्या ठोक्यांसारखी असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. ही हालचाल हळूहळू आफ्रिका खंडाला दोन तुकड्यांमध्ये वेगळे करीत असल्याचेदेखील शास्त्रज्ञांना आढळून आले आहे. हे नव्या महासागराच्या जन्माचे संकेत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. जगभरातील संशोधकांच्या एका गटाने इथिओपियाच्या अफार प्रदेशाखालील कवच आणि आवरणाचा अभ्यास केल्यानंतर हा निष्कर्ष काढला आहे.
ज्या भागात टेक्टोनिक प्लेट्स एकमेकांपासून दूर जातात, तिथे जमीन पसरते आणि ती पातळ होत जाते. ही जमीन तुटून एक नवीन महासागराचे खोरे तयार करू शकते. लाखो वर्षांपूर्वी दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका अशाच प्रकारे विभक्त झाल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. नवीन अभ्यासात नक्की काय समोर आले आहे? खरंच नवीन महासागर तयार होऊ शकतो का? त्याविषयी जाणून घेऊयात.

अभ्यासात काय समोर आले?
- साउथहॅम्प्टन विद्यापीठातील संशोधकांना इथिओपियाच्या अफार प्रदेशात खोलवर एक स्थिर वस्तू आढळून आली आहे, जी अगदी माणसांच्या हृदयासारखी धडधडत आहे.
- ही वस्तू मॅग्मामुळे खालून धडधडत आहे. कालांतराने यामुळे हळूहळू खंडाचे विभाजन होत आहे आणि एक दरडही तयार झाली आहे.
- त्यामुळे एक नवीन महासागर तयार होऊ शकतो, अशी शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे.
- नक्की पृथ्वीच्या अंतर्गत काय घडतंय हे समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञांच्या गटाने अफार प्रदेश आणि मुख्य इथिओपियन रिफ्टमधून ज्वालामुखीच्या खडकाचे १३० हून अधिक नमुने गोळा केले आहेत.
- त्यांनी पृष्ठभागाखालील कवच आणि आवरण यांचा अभ्यास करण्यासाठी विद्यमान डेटा आणि प्रगत सांख्यिकीय मॉडेल्सचादेखील वापर केला आहे.
बऱ्याच काळापासून भूगर्भशास्त्रज्ञांचा असा विश्वास होता की, प्लम म्हणून ओळखला जाणारा उष्ण पदार्थ अफारच्या खाली असतो, ज्यामुळे कवच वेगळे होण्यास मदत होते. परंतु आतापर्यंत या प्लमची रचना आणि ते वेगळे होताना काय होते, याचा स्पष्ट अंदाज नव्हता. या अभ्यासाच्या प्रमुख लेखिका आणि साउथहॅम्प्टन विद्यापीठात असताना संशोधनावर काम करणाऱ्या भूगर्भशास्त्रज्ञ एम्मा वॉट्स म्हणाल्या, “आम्हाला आढळले की, अफारच्या खाली असलेले आवरण एकसमान किंवा स्थिर नाही, त्यात हालचाल जाणवली आहे. त्या हालचालीत विशिष्ट रासायनिक प्रक्रिया सुरू आहे.”
पृथ्वीच्या आतील भाग आणि त्याच्या पृष्ठभागामधील परस्परसंवादासाठी हा शोध महत्त्वाचा आहे, असेही त्या म्हणाल्या. अभ्यासात असे दिसून आले की, अफारच्या खाली असलेल्या आवरणाच्या प्लममध्ये रासायनिक पट्टे असतात, ज्यांचा प्रभाव भूगर्भीय रिफ्ट सिस्टीमवर पडतो. रिफ्टच्या प्रत्येक विभागातील परिस्थितीनुसार या पट्ट्यांचे अंतर बदलते. आफ्रिकन रिफ्ट प्लेट्स ही पूर्व आफ्रिकन रिफ्ट प्रणाली आहे. पूर्वेला सोमाली प्लेट आणि पश्चिमेला न्युबियन प्लेट आहे. ही गुंतागुंतीची भूवैज्ञानिक प्रक्रिया अफार प्रदेशात केंद्रित आहे. या ठिकाणी या प्लेट्स टेक्टोनिक पद्धतीने एकत्र येतात. या प्लेटच्या विभाजनामुळे महासागर तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हे संशोधन साउथहॅम्प्टन विद्यापीठ, स्वानसी विद्यापीठ, लँकेस्टर विद्यापीठ, फ्लोरेन्स व पिसा विद्यापीठे, जर्मनीतील जिओमार, डब्लिन इन्स्टिट्यूट फॉर अॅडव्हान्स्ड स्टडीज, आदिस अबाबा विद्यापीठ आणि जीएफझेड जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेस यांसारख्या १० संस्थांमधी तज्ज्ञांनी मिळून केले आहे. या अभ्यासाचे सह-लेखक व साउथहॅम्प्टन विद्यापीठातील प्राध्यापक टॉम गेरनन म्हणाले, “रासायनिक स्ट्रिपिंगवरून असे दिसून येते की, प्लम हे हृदयाच्या ठोक्याप्रमाणे धडधडत आहे.” त्यांनी पुढे म्हटले, “कवच किती जाड आहे आणि ते किती वेगाने वेगळे होत आहे यावर ही हालचाल अवलंबून असते.”
निष्कर्षांवरून असे दिसून येते की, अफारखालील प्लम स्थिर नसल्याने त्याचा परिणाम वरील टेक्टोनिक प्लेट्सच्या हालचालींवर होत आहे. २५ जून रोजी नेचर जिओसायन्समध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात, या प्लेट्स वरील प्लमच्या प्रवाहावर कसा परिणाम करतात हे स्पष्ट करण्यात आले आहे. आफ्रिका खंडाचे विभाजन होत असल्याने, भौगोलिक बदल दिसू शकतो आणि पूर्वेकडील भाग काही काळाने वेगळा होऊन, एका छोट्या खंडात रूपांतरित होऊ शकतो, असेही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. संशोधनाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर, संशोधकांची टीम आता पृष्ठभागाखालील आवरणाचा प्रवाह आणि त्याची हालचाल किती वेगाने होत आहे, याचा अभ्यास करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे.
खंडाचे विभाजन वेगाने होत आहे का?
जानेवारीमध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठातील प्राध्यापक केन मॅकडोनाल्ड म्हणाले होते की, हा खंड पूर्वीच्या अंदाजापेक्षा जास्त वेगाने तुटत असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या मते, इथिओपिया, केनिया व टांझानियाच्या काही भागांसह सोमालिया उर्वरित आफ्रिकेपासून वेगळे होऊ शकते आणि स्वतःच्या किनारपट्टीसह एक नवीन भूभाग तयार करू शकते. प्राध्यापक मॅकडोनाल्ड यांनी ‘डेलीमेल’ला सांगितले, “असे होऊ शकते की, हिंदी महासागराच्या पाण्याने पूर्व आफ्रिकन रिफ्ट व्हॅली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात पूर येईल.” या भागात मोठमोठ्या भेगा दिसून येत आहेत, मात्र शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, हा खंड पूर्णपणे विभाजित होण्यास अजून अनेक दशलक्ष वर्षे लागतील.