scorecardresearch

विश्लेषण : उत्तर पश्चिम भारतात वादळासह गारपिटीची शक्यता; हवामानबदलाचे कारण काय?

उत्तर-पश्चिम भारतातील हवामान बदलाला ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे.

WEATHER FORECAST
सांकेतिक फोटो

भारतीय हवामान खात्याने उत्तर-पश्चिम भारतात ३० मार्च ते १ एप्रिल या कालावधीत अनेक ठिकाणी वादळासह पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवली आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदिगड, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान या भागत गारपिटीसह पाऊस तसेच काही ठिकाणी वादळाचा इशारा दिला आहे. याच कारणामुळे या भागात हवामानबदलाचे कारण काय? हवामान खात्याने काय इशारा दिला आहे? हे जाणून घेऊ या.

मागील दोन आठवड्यांपासून पावसाला सुरुवात

उत्तर-पश्चिम भारतातील एकूण दहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांपैकी सहा राज्यांमध्ये आतापर्यंत या महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. यामध्ये दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, चंदिगड या राज्यांचा समावेश आहे. २९ मार्चपर्यंत उत्तराखंडमध्ये साधारण पावसाची नोंद झाली. तर हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर या भागात तुलनेने पावसाचे प्रमाण कमी होते. मागील दोन आठवड्यांपासून उत्तर पश्चिम भारतात पावसाला सुरुवात झालेली आहे. तर दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये मागील दोन आठवड्यांपासून गारपिटीची नोंद झाली आहे.

हेही वाचा >> विश्लेषण: ७ सुदानी तस्कर, ३ देश, ५३ कोटींचे सोने..! काय होते ‘ऑपरेशन गोल्डन डॉन’?

दिल्लीमध्ये फेब्रुवारी महिन्यात पावसाची नोंद नाही

उत्तर-पश्चिम भारतात फेब्रुवारी महिन्यात पावसाचे प्रमाण कमी होते. पावसाचे हे प्रमाण ७६ टक्के कमी होते. तर दिल्लीमध्ये फेब्रुवारी महिन्यात पावसाची नोंद झाली नाही, मार्च महिन्यात येथे हवामानात बदल जाणवला. सफदरजंग हवामान केंद्राच्या नोंदीनुसार मार्च महिन्यात दिल्लीमध्ये ७५ टक्के अधिक पावसाची नोंद झाली.

उत्तर-पश्चिम भारतात अचानकपणे पाऊस का?

उत्तर-पश्चिम भारतातील हवामानबदलाला ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. सध्या भूमध्य प्रदेशात वादळाची स्थिती निर्माण झाली आहे. याच कारणामुळे उत्तर-पश्चिम भारतात पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम तुलनेने गौण होता. त्यामुळे फेब्रुवारी महन्यात या भागात कमी पाऊस झाला. आता मात्र या भागात गारपीट तसेच पावसाची शक्यता आहे. अफगाणिस्तानमध्ये सध्या चक्रीवादळ निर्माण झाले आहे, त्यामुळेदेखील भारताच्या उत्तर-पश्चिम भागात पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्रज्ञांनुसार या महिन्यात चार वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तर-पश्चिम भारताच्या हवामानावर परिणाम झाला आहे.

हेही वाचा >> G-Pay, PayTM, PhonePe ॲपवरील व्यवहारांना अतिरिक्त ‘चार्ज’ लागणार?

दिल्लीमध्ये १९ मार्च रोजी कमाल तापमान २५.३ अंश सेल्सिअस

हवामानबदलामुळे मार्च महिन्यात तापमानातही बऱ्याच प्रमाणात बदल झाला. दिल्लीमध्ये १९ मार्च रोजी कमाल तापमान २५.३ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते. मागील वर्षी या महिन्यात पावसाची नोंद झाली नव्हती. याच काळात २० मार्च रोजी दिल्लीमध्ये कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस होते.

भारतीय हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?

बुधवारी भारतीय हवामान खात्याने मार्च ३० ते १ एप्रिलपर्यंत जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदिगड, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थानमध्ये काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. या वादळ आणि पावसामध्ये पिकांचे नुकसान होण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 15:55 IST

संबंधित बातम्या