Pakistan Troll on New York Times Square : न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये लावण्यात आलेल्या डिजिटल होर्डिंगवर सध्या पाकिस्तानमधील राजकीय नेत्यांचे फोटो झळकताना दिसून येत आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ, लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर आणि राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांचे फोटो या डिजिटल स्क्रीनवर लावण्यात आलेले आहेत. इतकंच नाही तर माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटोही स्कीनवर दिसून येत आहे. भारताबरोबर झालेल्या युद्धानंतर न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तानच्या नेत्यांचे फोटो झळकल्याने त्याची संपूर्ण जगभरात चर्चा होत आहे. दरम्यान, टाइम्स स्क्वेअरवर पाकिस्तानी नेत्यांचे फोटो का लावण्यात आले, त्यामागचे नेमके कारण काय? या फोटोंमुळे पाकिस्तानची नाचक्की कशी झाली? ते जाणून घेऊ…
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अनेक अड्डे उद्ध्वस्त केले. भारताच्या या कारवाईला पाकिस्तानने सुरुवातीला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला; पण भारतीय लष्कराने तो यशस्वीरित्या हाणून पाडला. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भेदरलेल्या पाकिस्तानने भारताकडे युद्धविरामाची झोळी पसरविल्याचे समोर आले, त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही पाकिस्तानची चांगलीच नाचक्की होत आहे. न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर पाकिस्तानमधील नेत्यांची व लष्करप्रमुखांची खिल्ली उडवली जात आहे. दुसरीकडे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अन्यायग्रस्त आणि बळी ठरलेले नेते म्हणून सादर करण्यात आलं.

टाइम्स स्क्वेअरवरील फोटोंमध्ये नेमकं काय?
- टाइम्स स्क्वेअरवरील हे डिजिटल होर्डिंग पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) या इम्रान खान यांच्या पक्षाच्या परदेशातील समर्थकांनी लावले आहेत.
- होर्डिंगवर पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यावर थेट आणि खुले आरोप करण्यात आले आहेत.
- असीम मुनीर यांच्यावर फ्रॉड मार्शल, खोटारडा, अपयशी आणि स्वार्थासाठी काहीही करणारी व्यक्ती अशी टीका करण्यात आली आहे.
- पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांना राजकीय फसवणुकीचे साथीदार म्हणून दाखवण्यात आलं आहे.
- या निदर्शनाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
हेही वाचा : Parle-G Price : पॅलेस्टाईनमध्ये ५ रुपयाचं पार्ले-जी २३०० रुपयांना? नक्की काय घडतंय…
जगातील सर्वाधिक गर्दीच्या आणि व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या भागांपैकी एक असलेल्या टाइम्स स्क्वेअरमध्ये घडलेला हा निषेधाचा प्रकार पाकिस्तानची नाचक्की करणारा आहे. या प्रदर्शनामधून देशातील अंतर्गत अस्थिरतेवर आणि नागरी व्यवहारांतील लष्कराच्या वाढत्या हस्तक्षेपावर तीव्र टीका झाल्याचं मानलं जात आहे. या डिजिटल होर्डिंगवरील संदेशांचे व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले असून, विशेषतः इम्रान खान यांचे समर्थक आणि लष्करावर टीका करणाऱ्या लोकांकडून या व्हिडीओंना मोठा प्रतिसाद मिळत आहे.
होर्डिंगवरील फोटोंमुळे पाकिस्तानची नाचक्की
टाइम्स स्क्वेअरमध्ये लावण्यात आलेल्या डिजिटल होर्डिंगमध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे दोन वर्षांपासून बेकायदा तुरुंगात असल्याचे दाखविण्यात आले आहे. दुसऱ्या एका फोटोत लष्करप्रमुख मुनीर यांचे व्यंगचित्र होते. “खरी कामगिरी तुम्हाला उंचावते, बनावट पदव्या नाही”, असा मजकूर या फोटोंवर छापण्यात आला होता. यातून असे दिसून येतंय की, जनरल असीम मुनीर यांना पाकिस्तानच्या सर्वोच्च लष्करी पदावर दिलेल्या बढतीवरून पाकिस्तानमधील काही लोकांमध्ये नाराजी आहे. दरम्यान, या बॅनर्सवरून केवळ असीम मुनीर नव्हे, तर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावरही टीका करण्यात आली. त्यांना पूर्णपणे स्वार्थाने प्रेरित नेता म्हणून संबोधण्यात आलं. एकूणच या निदर्शनांचा सूर पाकिस्तानमधील सत्ताधारी यंत्रणेची खिल्ली उडवणारा होता.
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला. या कारवाईत लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीनसारख्या दहशतवादी संघटनांचे पाकिस्तान व पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. भारतीय हवाई दलाच्या कारवाईत १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. यामध्ये अब्दुल रऊफ अझहर आणि मसूद अझहर यांच्या नातेवाईकांचाही समावेश होता. या कारवाईने भेदरलेल्या पाकिस्तानने भारताकडे युद्धविरामाची विनंती केली.
मुनीर यांना फिल्ड मार्शल पदावर बढती मिळाल्याने वाद
भारतासमोर गुडघे टेकल्यानंतर काही दिवसांतच पाकिस्तानने जनरल असीम मुनीर यांना फिल्ड मार्शल या पदावर बढती दिली. विशेष बाब म्हणजे, १९५९ नंतर पाकिस्तानी लष्करप्रमुखांना मिळालेली ही पहिलीच पदोन्नती होती. पाकिस्तान सरकारने मुनीर यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत ही बढती दिल्याचे सांगितले. मात्र, टीकाकारांनी हे राजकीय हेतूने उचलेले पाऊल असल्याचा आरोप केला. त्यांचा दावा होता की, ह्या बढतीमुळे लष्कराच्या अपयशांकडे लक्ष न जाता त्यांची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करण्यात आला. ‘Geo News’च्या एका अहवालात मुनीर यांना देशाच्या सुरक्षेची हमी दिल्याबद्दल ही बढती मिळाल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यात त्यांच्या नेतृत्वाचे आणि कौशल्याचेही कौतुक करण्यात आले. मात्र, परदेशस्थित पाकिस्तानी लोकांनी या दाव्यांची विश्वासार्हता प्रश्नार्थक ठरवली, विशेषतः भारताच्या कारवाईत पाकिस्तामध्ये झालेल्या नुकसानीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
इम्रान खान आणि असीम मुनीर यांच्यातील संघर्ष
इम्रान खान हे पाकिस्तानचे पंतप्रधान असताना त्यांचे आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांचे संबंध ताणले गेले. मे २०२३ मध्ये इम्रान खान यांना भ्रष्टाचार, शासकीय भेटवस्तू विकणे आणि गुप्त कागदपत्रे उघड करणे यांसारख्या आरोपांखाली अटक करण्यात आली. मात्र, त्यांच्या समर्थकांनी हे सर्व आरोप लष्कराच्या सूडाच्या कारवाईचा भाग असल्याचे म्हटले. या कारवाईनंतर इम्रान खान यांना अनेक गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यात आले आणि त्यांना निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यात आली, ज्यामुळे त्यांचा राजकीय पुनरागमनाचा मार्ग पूर्णपणे बंद झाला. खान यांच्या अटकेनंतर संपूर्ण पाकिस्तानमध्ये व्यापक आंदोलनं उसळली. सरकारने या आंदोलनांवर कठोर कारवाई करत खान यांच्या हजारो कार्यकर्त्यांना व नेत्यांना अटक केली.
हेही वाचा : आरसीबी संघाच्या विजयी मिरवणुकीदरम्यान चेंगराचेंगरीप्रकरणी अटक झालेले निखिल सोसाळे कोण आहेत?
इम्रान खान यांची लोकप्रियता कायम
पाकिस्तानमधील दडपशाहीनंतरही इम्रान खान यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात कायम राहिली. तुरुंगात असतानाही त्यांच्या समर्थकांनी त्यांना राजकीय कारस्थानाचा बळी व लष्करी हस्तक्षेपाचा विरोध करणारा नेता म्हणूनच पाहिले. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत खान यांच्या समर्थकांनी सर्वाधिक खासदार निवडून आणले, पण शहबाज शरीफ यांच्या PML-N पक्षाच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार स्थापन करण्यात यशस्वी झाली. अनेकांचे मत आहे की, हे आघाडी सरकार लष्कराच्या समर्थनामुळेच स्थापन होऊ शकले.
टाइम्स स्क्वेअरवरील निदर्शने काय दर्शवितात?
टाइम्स स्क्वेअरवर पाकिस्तानी नेत्यांचे व लष्करप्रमुखांचे फोटो झळकून त्यांचा करण्यात आलेला निषेध हा परदेशातील पाकिस्तानी नागरिकांमधील रोष दर्शवितो. कारण परदेशात राहणारे पाकिस्तानमधील अनेक लोक इम्रान खान यांना अशा नेत्याच्या रूपात पाहतात, ज्यांनी लष्कराच्या राजकीय हस्तक्षेपाला आव्हान दिलं होतं. दरम्यान, पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर हे देशातील राजकीय पक्षांवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याने परदेशातील पाकिस्तानी लोकांची नाराजी दिसून आली आहे. एकीकडे पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांकडून राष्ट्रीय एकतेचा आणि विजयाचा प्रचार सुरू आहे, तर दुसरीकडे मात्र टाइम्स स्क्वेअरसारखी सार्वजनिक आंदोलने देशाची दुर्दशा आणि लोकांचा सत्ताधाऱ्यांवरील विश्वास ढासळल्याचे वास्तव अधोरेखित करीत आहेत. खरंतर अनेक पाकिस्तानींसाठी मुनीर आजही अत्यंत वादग्रस्त व्यक्तिमत्त्वच आहेत.