मोहन अटाळकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रात खरीप हंगामात तुरीपाठोपाठ मूग आणि उडीद या महत्त्वाच्या कडधान्यांचे पीक घेतले जाते. या पिकांचा कालावधी कमी असल्याने त्यांची खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तिन्ही हंगामांत लागवड होते. अर्थात खरिपातच त्याचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. जमीन फेरपालटासाठी कडधान्य लागवड गरजेची आहे. या पिकांची लागवड मुख्य किंवा आंतरपीक म्हणूनही केली जाते, पण गेल्या काही वर्षांत उशिरा पडणारा पाऊस, पावसाचा खंड, काढणीच्या वेळी येणारा मुसळधार पाऊस, हमीभावापेक्षा कमी दर, अशा कारणांमुळे या पिकांचे क्षेत्र कमी होत आहे.

कडधान्य उत्पादनाची स्थिती काय आहे?

भारतात गेल्या तीन दशकांत कडधान्य लागवड आणि उत्पादनात विशेष वाढ झाली नाही. मागील काही वर्षांत क्षेत्र वाढले, मात्र उत्पादकता वाढली नाही. देशाची कडधान्याची गरज सध्याच्या २६० लाख टनांवरून २०५० पर्यंत ३९० लाख टनांवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशांतर्गत उत्पादन वाढीसाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे. अन्यथा, आयातीवरील अवलंबित्व वाढत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जगात भारत हा कडधान्य उत्पादन आणि वापरकर्ता देश आहे. कडधान्याची आयातही देशात सर्वाधिक होते. त्यात मूग आणि उडदाचाही समावेश आहे.

राज्यात मूग आणि उडदाचा पेरा किती?

पश्चिम महाराष्ट्र, खान्देश तसेच पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मूग आणि उडदाची सर्वाधिक लागवड होते. राज्यात २०१२-१३ या वर्षात ४.३१ लाख हेक्टर क्षेत्रात मुगाची तर ३.६० लाख हेक्टरमध्ये उडदाची लागवड करण्यात आली होती. गेल्या दशकभरात लागवडीचे क्षेत्र कमी-कमी होत गेले. गेल्या वर्षीच्या हंगामात तर केवळ २.६९ लाख हेक्टरमध्ये मूग आणि ३.५८ लाख हेक्टर क्षेत्रात उडीद पेरा झाला. मध्यंतरीच्या काळात मूग आणि उडदाची लागवड स्थिर होती.

लागवड कमी होण्याची कारणे काय?

या पिकांचा कालावधी साधारणपणे दोन ते अडीच महिन्यांचा असतो. कमी कालावधीमध्ये येणारी व अधिक आर्थिक नफा मिळवून देणारी पिके म्हणून मूग आणि उडीद याकडे पाहिले जाते. पेरणीयोग्य पाऊस पडल्यावर व जमीन वापसा स्थितीत आल्याबरोबर शक्यतो जूनच्या दुसऱ्या पंधरवाड्यापर्यंत या पिकांची पेरणी पूर्ण केली जाते. परंतु गेल्या काही वर्षांपासून पावसाचे उशिराने आगमन, पावसात खंड तसेच विशेषतः ऑगस्ट महिन्यात होणारी अतिवृष्टी याचा परिणाम मूग, उडीद पिकाच्या लागवडीवर होऊ लागला आहे. केंद्र सरकारने कडधान्यांचे क्षेत्र वाढविण्यासाठी योजना लागू केल्या आहेत. परंतु, त्यानंतरही क्षेत्र वाढीचे प्रमाण कमी आहे.

विश्लेषण : भारतात आयात होत होता… अमेरिकन बर्फ! का, कशासाठी?

उत्पादकतेवर काय परिणाम होतो?

पाऊस उशिरा झाल्यामुळे उत्पादकतेबाबत अनिश्चितता निर्माण होते. जून महिन्यात लागवड झाल्यानंतर साधारणतः ऑगस्टमध्ये पीक काढणीला येते. परंतु याच काळात अतिवृष्टीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मुगाची काढणी करता येत नाही. पावसामुळे परिपक्व झालेल्या शेंगा फुटतात. फुटलेल्या शेंगांतील दाणे शेंगांमध्येच उगवतात. परिणामी संपूर्ण पीक वाया जाते किंवा उत्पन्न कमी मिळते. अनेक भागांत पडणारा दुष्काळ, पावसाचा ताण यामुळे देखील मूग, उडीद लागवडीकडे शेतकऱ्यांचा ओढा कमी झाला आहे.

बाजारातील स्थिती काय आहे?

नैसर्गिक आपत्तींमध्ये नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या हाती कमी उत्पादन येते. अशा परिस्थितीतही या मालाला चांगला भाव मिळत नाही. केंद्र सरकारने २०२२-२३ या वर्षात मुगासाठी ७ हजार ७५५ रुपये, तर उडदासाठी ६ हजार ६०० रुपये हमीभाव जाहीर केला. पण महत्त्वाच्या मूग-उडीद उत्पादक राज्यांमध्ये पावसाने पिकाचे मोठे नुकसान केले. तसेच कीड-रोगाने पिकाला फटका बसला. यामुळे खरिपातील मूग आणि उडदाच्या उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. खरिपातील उत्पादन घटल्याने या कडधान्यांच्या दरात नंतर तेजी दिसून आली, पण त्याआधी हमीभावापेक्षा कमी दर मिळाले.

विश्लेषण : ‘खनिज सुरक्षा सहकार्या’त भारताचा समावेश का महत्त्वाचा?

उत्पादकतेत चढ-उतार का दिसून येतात?

कृषी विभागाच्या तृतीय पुर्वानुमानानुसार यंदा राज्यात १.७० मे.टन मुगाचे तर २.२५ मे.टन उडदाचे उत्पादन झाले. मुगाची उत्पादकता ६.३१ क्विंटल प्रति हेक्टर, तर उडदाची ६.२९ क्विंटल इतकी आहे. पण, २०२१-२२ च्या खरीप हंगामात मुगाची उत्पादकता ४.९४ क्विंटल, उडदाची उत्पादकता ४.८३ क्विंटल होती. २०१५-१६ या वर्षात दशकभरातील सर्वाधिक कमी उत्पादकता नोंदविण्यात आली, त्यात मुगाची प्रति हेक्टरी उत्पादकता केवळ १.९० क्विंटल आणि उडदाची २.१४ क्विंटल होती. पावसाची अनियमितता, वातावरणातील बदल, कीड-रोगांचा प्रादुर्भाव अशा विविध कारणांमुळे त्या-त्या वर्षी उत्पादकतेत घट दिसून आली आहे.

mohan.atalkar@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pulses production in maharashtra toor udid dal decrease print exp pmw
First published on: 27-06-2023 at 09:04 IST