राहुल गांधी यांनी होशियारपूर या ठिकाणी वरूण गांधी यांच्याविषयी एक वक्तव्य केलं. ते वक्तव्य असं होतं की वरूण गांधी हा माझा भाऊ आहे, मात्र आमच्या विचारधारा वेगळ्या आहेत. मी कधीही संघ मुख्यालयात जाऊ शकत नाही, माझा गळा चिरला तरीही मी जाणार नाही. असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. तसंच वरूण गांधी हे देखील भारत जोडो यात्रेत सहभागी होणार नाहीत असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे चर्चा सुरू झाली ती मनेका गांधी यांचीही. गांधी घराण्यापासून मनेका गांधी यांनी फारकत घेतली होती. इंदिरा गांधी यांचं निवासस्थान दोन वर्षांच्या वरूणला सोबत घेत अर्ध्या रात्री सोडलं होतं.

गांधी घराणं हे देशातलं सर्वात राजकीय वारसा लाभलेलं घराणं

गांधी घराणं हे देशातलं सर्वात मोठा राजकीय वारसा लाभलेलं घराणं आहे. काँग्रेस या देशातल्या सर्वात जुन्या पक्षाचे हे सगळे सदस्य. इंदिरा गांधी या आपल्या देशाच्या पंतप्रधानही होत्या. त्यांच्यानंतर राजीव गांधी हेदेखील स्पष्ट बहुमत मिळवत देशाचे पंतप्रधान झाले होते. गेल्या काही वर्षांमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी या तिघांनीही काँग्रेस पक्षावर चांगली पकड बसवली आहे. हायकमांड संस्कृती देशात कशी रुजवली गेली हे आपण पाहिलंच आहे. मात्र त्याचवेळी गांधी कुटुंबाचे दोन सदस्य हे भाजपाचे खासदार आहेत. होय बरोबर आम्ही बोलत आहोत ते मनेका गांधी आणि वरूण गांधी यांच्याविषयीच. या दोघांनी खूप पूर्वीच गांधी घराणं सोडलं. भाजपाची विचारसरणी त्यांनी अंगिकारली.

Buldhana, Minor Girl, sexually Tortured, Case Registered, female friend,
बुलढाणा : अल्पवयीन मुलीला डांबून दहा दिवस अत्याचार; मैत्रिणीनेच दिला दगा….
readers reaction on loksatta editorial
लोकमानस: बाबा शक्तिशाली झाले त्यात आश्चर्य ते काय?
sushma andhare
कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांंच्या समोर लढणे आम्हाला मोठे आव्हान वाटतच नाही; उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे मत
Social workers detained yavatmal
आंदोलनाची दहशत… मोदींच्या सभेपूर्वीच सामाजिक कार्यकर्ते स्थानबद्ध

गांधी कुटुंब एकत्रच होतं पण मग वैचारिक मतभेद कसे निर्माण झाले?

२८ मार्च १९८२ च्या रात्री एक घटना घडली, त्यामुळे देशातला सर्वात मोठा राजकीय वारसा असलेले गांधी कुटुंब विभागलं गेलं. राहुल गांधी हे राजीव गांधी यांचे मोठे पुत्र आहेत. त्यांचा जन्म १९ जून १९७० ला झाला. तर वरूण गांधी हे राहुल गांधीपेक्षा दहा वर्षांनी लहान आहेत. त्यांचा जन्म १३ मार्च १९८० ला झाला. एक काळ असा होता की दोन भाऊ एकाच घरात राहिले एकाच अंगणात खेळले. दोघांवर संस्कारही एकच होऊ लागला होता.

मात्र तणाव कसा सुरू झाला हे जाणून घ्यायचं असेल तर इतिहासाच्या उदरात डोकवावं लागेल. १९८० च्या दशकात इंदिरा गांधी या पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्या. ज्यानंतर त्यांचं सगळं कुटुंब १ सफरदरजंग रोड या ठिकाणी असलेल्या पंतप्रधान निवासस्थानात वास्तव्यास गेलं. मात्र याच वर्षी संजय गांधी यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. ज्यानंतर अनेक गोष्टी बदललल्या. मनेका गांधी या अवघ्या २५ वर्षांच्या होत्या. संजय गांधी यांच्याकडे असलेला वारसा हा राजीव गांधींकडे गेला. त्यामुळे इंदिरा गांधी आणि मनेका गांधी यांच्यात छोट्या छोट्या गोष्टींवरून खटके उडू लागले. अखेर हे वाद इतके वाढले की १९८२ मध्ये मनेका गांधी यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं घर सोडलं. यावेळी वरूण गांधी हे अवघे दोन वर्षांचे होते. खुशवंत सिंह यांनी आपल्या आत्मचरित्रात हा उल्लेख केला आहे. आज तकने यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.

२८ मार्च १९८२ या रात्री नेमकं काय घडलं?

स्पॅनिश लेखक जेवियर मोरो यांनी The Red Sari नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात त्यांनी हा उल्लेख केला आहे की तो काळ असा होता जेव्हा संजय गांधी यांच्या अपघाती निधनानंतर राजकारणात रस नसलेल्या राजीव गांधी यांना इंदिरा गांधी राजकीय दृष्ट्या पुढे घेऊन चालल्या होत्या. ही गोष्ट संजय गांधी यांची पत्नी मनेका गांधी यांना मुळीच रूचली नाही. इंदिरा गांधी यांच्यापाशी त्यांनी आपली नाराजी बोलूनही दाखवली. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. यानंतर इंदिरा गांधी विदेश दौऱ्यावर गेल्या असताना मेनका गांधी यांनी आपल्या समर्थकांसह एक सभा घेतली. ज्यावरून इंदिरा गांधी प्रचंड नाराज झाल्या. कारण त्यांनी मनेका गांधी यांना आधीच इशारा दिला होता. मात्र मनेका गांधी यांचं हे कृत्य लक्ष्मणरेषा ओलांडणारं ठरलं.

स्पॅनिश लेखक जेवियर मोरो लिहितात की २८ मार्च १९८२ च्या सकाळी इंदिरा गांधी या लंडनचा दौरा संपवून परत आल्या. त्यावेळी मनेका गांधी त्यांना भेटायला गेल्या. इंदिरा गांधी यांनी मनेका गांधी यांचं काहीही ऐकून घेतलं नाही. त्यानंतर मेनका गांधी या आपल्या खोलीत गेल्या आणि बसून राहिल्या. बराच वेळ गेल्यानंतर एक सेवक आला, त्याने मनेका गांधी यांच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. मनेका गांधी यांनी दार उघडलं तर तो सेवक मनेका गांधी यांच्यासाठी दुपारचं जेवण घेऊन आला होता. त्याने हे सांगितलं की इंदिरा गांधी यांची ही इच्छा नाही की तुम्ही कुटुंबातल्या इतर सदस्यांसोबत दुपारचं जेवण करावं. या घटनेनंतर एक तासाने तो सेवक पुन्हा आला. त्याने मनेका गांधी यांना सांगितलं की तुम्हाला इंदिरा गांधी यांनी बोलावलं आहे.

इंदिरा गांधी यांनी मनेका गांधींना निवासस्थान सोडायला सांगितलं

आता आपलं काही खरं नाही हे मनेका गांधी यांना वाटलं कारण तोपर्यंत या दोघींमध्ये बरेच खटके उडाले होते. मनेका गांधी जेव्हा इंदिरा गांधी यांनी बोलावलेल्या खोलीत गेल्या तेव्हा तिथे कुणीही नव्हतं. तरीही त्या थांबल्या त्यानंतर काही वेळातच इंदिरा गांधी तिकडे आल्या. त्यांच्यासोबत धीरेंद्र ब्रह्मचारी आणि आर. के. धवन हे दोघंही होते. त्यांनी थेट मनेका गांधींना सांगितलं की या घरातून तू चालती हो. मनेका यांनी विचारलं की मी काय केलं आहे? त्यावर इंदिरा गांधी म्हणाल्या की तुला सांगितलं होतं की लखनऊ मध्ये बोलायचं नाही. पण तू तुझा तुझा निर्णय घेऊन मोकळी झालीस. आता या घरात मुळीच थांबायचं नाही आत्ताच्या आता हे घर सोड. त्यावर मनेका गांधी या इंदिरा गांधींना म्हणाल्या की मला किमान माझं सगळं सामान, कपडे, बॅग्ज हे घेण्यासाठी पुरेसा वेळ द्या. त्यावर इंदिरा गांधी म्हणाल्या की तुझ्याकडे भरपूर वेळ होता. तुला आता जराही वेळ मिळणार नाही. तू आत्ता या घरातून बाहेर निघ. तुझ्या ज्या वस्तू, कपडे, बॅग्ज आणि इतर सामान आहे ते तुला पाठवलं जाईल.

मनेका गांधी यांनी यानंतर काय केलं?

मनेका गांधी यानंतर आपल्या खोलीत आल्या. त्यांनी त्यांची बहीण अंबिका यांना फोन केला आणि काय घडलं आहे ते सांगितलं. त्यावेळी अंबिका यांनी खुशवंत सिंह यांना फोन केला आणि सांगितलं की पत्रकारांना तातडीने इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधान निवासस्थानात पाठव. रात्री नऊ वाजता फोटोग्राफर्स, पत्रकार, विदेशी पत्रकार असे सगळेच जण पंतप्रधान निवासस्थानाच्या बाहेर गोळा झाले. यानंतर बाहेर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला.

अंबिका या मनेका यांच्या खोलीत आल्या तेव्हा काय झालं?

मनेका गांधी यांची बहीण अंबिका या मनेका यांच्या खोलीत आल्या. तेव्हा मनेका गांधी या घाईने आपली बॅग जमेल तशी भरत होत्या. त्यावेळी तिथे इंदिरा गांधी आल्या. त्या मनेका यांना उद्देशून म्हणाल्या की मी तुला तातडीने घराबाहेर पडायला सांगितलं होतं.तेव्हा त्यांना थांबवत अंबिका म्हणाल्या की हे घर संजय गांधी यांचंही आहे. यावर इंदिरा गांधी तडक म्हणाल्या हे निवासस्थान भारताच्या पंतप्रधानांचं आहे आत्ताच्या आता इथून निघा. हे सगळं जवळपास दोन तास सुरू होतं. धीरेंद्र ब्रह्मचारी आणि आर. के. धवन त्यावेळी तिथेच होते. तर पत्रकारांना काय घडतं आहे याची माहिती मिळवायची होती.

जेवियर मोरो यांनी आपलं पुस्तक द रेड सारीमध्ये लिहिलं आहे की त्यानंतर सामान कारमध्ये ठेवण्यात आलं. दोन वर्षांच्या वरूण गांधी यांना मनेका गांधी घेऊन निघाल्या. मात्र वरूण गांधी यांना घेऊन जायचं नाही असं इंदिरा गांधी सांगू लागल्या. मी वरूणला घेऊनच जाणार असं मनेका गांधी यांनी सांगितलं. ज्यानंतर तातडीने इंदिरा गांधी यांनी प्रधान सचिव पी. सी. आलेक्झांडर यांना बोलावलं. त्यांनी इंदिरा गांधींना समजावलं की आईपासून मुलाला वेगळं करता येणार नाही. अर्ध्या रात्री कायदेतज्ज्ञही बोलवले गेले. त्यांनी इंदिरा गांधी यांना हे सांगितलं की उद्या मनेका गांधी मुलाचा ताबा मिळावा म्हणून कोर्टात गेल्या तर निर्णय त्यांच्याच बाजूने लागेल. त्यानंतर इंदिरा गांधी कशाबशा तयार झाल्या. अर्धवट झोपेत असलेल्या वरूण गांधींना घेऊन त्यानंतर मनेका गांधी यांनी इंदिरा गांधींचं निवासस्थान सोडलं. त्या कारमध्ये बसल्या.. आणि बहिणीसोबत रवाना झाल्या. हा सगळा घटनाक्रम कॅमेरामन्सनी आपल्या कॅमेरांमध्ये कैद केला.

मनेका गांधी यांची राजकीय कारकीर्द

मनेका गांधी यांनी त्या रात्री घर सोडलं आणि एक कुटुंब विभागलं गेलं. त्यानंतर संजय गांधींच्या जुन्या सहकाऱ्यांसह मनेका गांधी यांनी राष्ट्रीय संजय मंच नावाने एक पक्ष स्थापन केला. १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत मनेका गांधी यांनी राजीव गांधींच्या विरोधात निवडणूक लढवली. मात्र त्या ही निवडणूक हरल्या. यानंतर १९८८ मध्ये मनेका गांधी जनता दलात सहभागी झाल्या. १९८९ मध्ये जनता दलाने त्यांना पीलीभीतमधून तिकिट दिलं. त्यावेळी त्या खासदार झाल्या. १९९१ च्या निवडणुकीत जनता दलाने पुन्हा त्यांनी पीलीभीत मधून तिकिट दिलं मात्र ही निवडणूक त्या हरल्या. यानंतर १९९८ ला त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि त्या विजयी झाल्या.

भाजपासोबत कशा आल्या मनेका गांधी?

मनेका गांधी यांनी २००४ मध्ये भाजपात प्रवेश केला. भाजपाने त्यांना पीलीभीत तिकिट दिलं. त्या मतदारसंघातून त्या भाजपाच्या तिकिटावर निवडून आल्या आणि खासदार झाल्या. याच मतदार संघातून वरूण गांधीही निवडणुकीच्या मैदानात उतरले आणि खासदार झाले. २०१३ मध्ये वरूण गांधी यांना भाजपाचं सरचिटणीस पद दिलं गेलं. भाजपातले सर्वात तरूण सरचिटणीस अशी त्यांची ओळख त्यावेळी झाली होती. २०१४ च्या निवडणुकीच्या वेळी पुन्हा एकदा मनेका गांधी यांना भाजपाने तिकिट दिलं त्या पुन्हा निवडून आल्या. तर वरूण गांधीही याच निवडणुकीत जिंकले आणि खासदार झाले. आता गेल्या काही दिवसांपासून वरूण गांधी हे भाजपात नाराज आहेत अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. तसंच ते काँग्रेसमध्ये जातील अशाही चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केलं त्यावरून आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.