अन्वय सावंत

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील ‘प्ले-ऑफ’च्या टप्प्याला आता सुरुवात झाली आहे. एकीकडे भारतीय क्रिकेटरसिक या स्पर्धेचा आनंद लुटत असतानाच, दुसरीकडे त्यांना जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम लढतीचेही वेध लागले आहेत. ‘आयपीएल’चा अंतिम सामना २८ मे रोजी खेळवला जाणार असून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ‘डब्ल्यूटीसी’च्या अंतिम सामन्याला ७ जूनपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंना ‘डब्ल्यूटीसी’च्या अंतिम सामन्यासाठी सरावाकरिता पुरेसा वेळ मिळालेला नाही. जवळपास दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या ‘आयपीएल’चा ताण भारतीय कसोटी संघावर किती परिणाम करणार? ‘डब्ल्यूटीसी’च्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ पूर्णपणे तयार आहे का, या प्रश्नांचा वेध घेण्याचा प्रयत्न.

‘डब्ल्यूटीसी’ अंतिम लढतीसाठी भारतीय संघात कोणत्या खेळाडूंचा समावेश?

इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर होणाऱ्या ‘डब्ल्यूटीसी’च्या अंतिम लढतीसाठी भारतीय संघात रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, के. एस. भरत (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन (यष्टिरक्षक) या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. तसेच सूर्यकुमार यादव, ऋतुराज गायकवाड आणि मुकेश कुमार यांची राखीव खेळाडू म्हणून निवड झाली आहे. पुजाराचा अपवाद वगळता हे सर्वच भारतीय खेळाडू यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये खेळले आहेत.

‘मेटा’ देणार ‘ट्विटर’ला टक्कर! लवकरच जारी करणार नवे सोशल मीडिया ॲप? जाणून घ्या…

हे खेळाडू ‘आयपीएल’मध्ये कोणत्या संघांचे प्रतिनिधित्व करतात?

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, इशान किशन
चेन्नई सुपर किंग्ज : अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा
गुजरात टायटन्स : शुभमन गिल, केएस भरत, मोहम्मद शमी
लखनऊ सुपर जायंट्स : जयदेव उनाडकट (जायबंदी)
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु : विराट कोहली, मोहम्मद सिराज
राजस्थान रॉयल्स : रविचंद्रन अश्विन
कोलकाता नाइट रायडर्स : शार्दूल ठाकूर, उमेश यादव
दिल्ली कॅपिटल्स : अक्षर पटेल

कोणते खेळाडू अद्याप ‘आयपीएल’मध्ये व्यस्त आहेत?

मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे चार संघ ‘प्ले-ऑफ’साठी पात्र ठरले आहेत. या चारही संघांना अद्याप दोन किंवा तीन सामने खेळावे लागणार आहेत. त्यामुळे या संघांमधील खेळाडूंना विश्रांतीसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागेल. अन्य सहा संघांचे ‘आयपीएल’मधील आव्हान संपुष्टात आल्याने या संघांमधील भारताच्या प्रमुख खेळाडूंना ‘डब्ल्यूटीसी’ची तयारी सुरू करता येईल. प्रामुख्याने कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मा अद्याप आयपीएलमधून मोकळा झालेला नाही. ऐनवेळी जुळून आलेल्या समीकरणांमुळे मुंबई इंडियन्स पहिल्या चार संघांमध्ये स्थान मिळवू शकल्याचा चाहत्यांना आनंद असला, तरी कसोटी अजिंक्यपद लढतीसाठी ही चिंतेची बाब ठरत आहे.

संघात निवड झालेल्या खेळाडूंपैकी कोणाच्या दुखापतीची चिंता?

‘आयपीएल’मध्ये कोलकाता नाइट रायडर्सचे प्रतिनिधित्व करताना उमेश यादवच्या पायाला दुखापत झाली होती. त्याने २६ एप्रिलला आपला अखेरचा सामना खेळला. मात्र, त्यानंतर तो तंदुरुस्त झाला असून ‘डब्ल्यूटीसी’च्या अंतिम सामन्यासाठी उपलब्ध असेल. लखनऊ संघाचे आव्हान अजून शाबूत असले, तरी या संघातील जयदेव उनाडकटला खांद्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर जावे लागले. तो बंगळूरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) उपचार घेत होता. भारतीय खेळाडूंची पहिली तुकडी मंगळवारी इंग्लंडला रवाना झाली. यात उमेश आणि उनाडकट यांच्यासह कोहली, सिराज, अश्विन, अक्षर पटेल, शार्दूल यांचा समावेश आहे. उनाडकट आता इंग्लंडमध्ये दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करेल. तो ‘डब्ल्यूटीसी’च्या अंतिम सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी तंदुरुस्त होणे अपेक्षित आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खेळाडूंच्या तयारीबाबत संघ व्यवस्थापन कितपत समाधानी?

‘आयपीएल’मुळे भारतीय खेळाडूंना ‘डब्ल्यूटीसी’ अंतिम सामन्याच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याची संघ व्यवस्थापनाला चिंता आहे. कसोटी सामन्यात एका दिवशी ९० षटके आणि सहा तास मैदानावर टिकण्यासाठी खेळाडूंनी पूर्णपणे तंदुरुस्त असणे आवश्यक असते. तसेच गोलंदाजांना एका दिवसात प्रत्येकी १५-२० षटकेही टाकावी लागतात. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनाने गोलंदाजांना मे महिन्यात ‘आयपीएल’ संघांच्या सराव सत्रांदरम्यान षटकांची संख्या वाढवण्याची सूचना केली होती. मात्र, ‘आयपीएल’च्या दोन सामन्यांदरम्यान विश्रांतीसाठी फारसा वेळ मिळत नसून शरिरावर ताण पडत असल्याचे गोलंदाजांचे म्हणणे आहे. अतिरिक्त षटके टाकल्यास त्यांना दुखापती होण्याचा धोका आहे. त्यामुळे त्यांनी मर्यादित षटके टाकण्यालाच पसंती दिली आहे. ‘आयपीएल’चा अंतिम सामना आणि ‘डब्ल्यूटीसी’चा अंतिम सामना यामध्ये केवळ १० दिवसांचा कालावधी आहे. त्यामुळे ‘डब्ल्यूटीसी’ अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघ सराव सामना खेळण्याची शक्यता फार कमी असल्याचे समजते. याचा भारताला फटका बसतो का, हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल.