3 March, 2024 wildlife day कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सौगत भट्टाचार्य यांनी अलीकडेच वन्य प्राण्यांना देण्यात येणाऱ्या नावांसंदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला. बंगाल सफारी (नॉर्थ बंगाल वाईल्ड अॅनिमल्स पार्क) येथील अभयारण्यात असलेल्या एका सिंहाच्या जोडीच्या नावावरून गदारोळ झाला होता. सिंहाचे नाव ‘अकबर’ तर सिंहीणीचे नाव ‘सीता’ असे होते. या दोन नर आणि मादी शार्दुलांची जोडी केल्याने या वादाला सुरुवात झाली. याच संदर्भात निकाल देताना न्यायमूर्तींनी नामकरणाची अशा प्रकारची पद्धतच रद्दबातल ठरवली.
प्राण्यांच्या नावांमागील मानसशास्त्र
कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींकडून अशा स्वरूपाची नामकरणाची पद्धत रद्दबादल ठरविल्यानंतर समाजमाध्यमांवर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. प्राण्यांना काहीही नावे दिली तरी त्यांना काय फरक पडतोय, असेही मत अनेकांनी व्यक्त केले. तसं पाहिलं तर प्राण्यांना खरंच काही फरक पडत नाही. त्या मुक्या जीवाला काय कळणार नावाचं महत्त्व? माणूस हा बुद्धीमान प्राणी आहे, माणसाला जितका फरक पडतो, तितका फरक खचितच प्राण्यांना पडतं असेल का? माणसाच्या नावाबरोबर त्याची ओळख, भावना जोडलेल्या असतात त्यामुळे प्रत्येक माणसाला स्वतःचे नाव प्रिय असते. हाच नियम प्राण्यांना लागू होतो का, हेही पाहणे या सध्याच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर गरजेचे ठरते.
अधिक वाचा: भारत आणि पाकिस्तानात अकबर आणि औरंगजेब यांच्या परस्परविरोधी प्रतिमा का आढळतात?
या संदर्भात ‘द इंडियन एक्स्प्रेस’मध्ये प्रकाशित झालेल्या ‘बियॉंड सीता अॅण्ड अकबर, झू चीअर्ड, राम, मुमताझ, तेंडुलकर, अॅण्ड आझादी’ या लेखात, गुजरातमधील प्राणीसंग्रहातील पशुवैद्यकांनी नमूद केल्याप्रमाणे, ‘प्राणी आणि त्याचा पालक यांच्यातील संबंध प्राण्याच्या हाताळणीसाठी महत्त्वाचा असतो, प्राण्यांकडून एका रात्रीत नवीन नावांना प्रतिसाद मिळणे कठीण असते. म्हणूनच अनेकदा प्राण्यांच्या सुरुवातीच्या दिवसांत वापरलेले नाव त्यांना हाताळण्यासाठी योग्य ठरते, असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अनेकदा प्राण्यांच्या पालकांकडून ठेवलेलं नाव कायमस्वरूपी वापरात येते. किंबहुना प्राण्यांच्या मानसशास्त्रानुसार मालकाने/ ट्रेनरने/ पालकाने दिलेल्या नावांचे महत्त्व प्राण्यांच्या लेखी अधिक असते. किंबहुना हीच गोष्ट आपल्या घरात पाळीव प्राण्यांच्या बाबतीतही दिसून येते. असे ‘ओनर्स अँथ्रोमॉर्फिक परसेप्शन्स ऑफ कॅट्स अँड डॉग्स ऍबिलिटीस आर रिलेटेड टू द सोशल रोल ऑफ पेंट्स, ओनर्स रिलेशनशिप बिहेविअर्स अँड सोशल सपोर्ट (एस्थर एमसी बौमा, एरी डिजक्स्ट्रा) या शोधनिबंधात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळेच जन्मतः प्राण्यांना दिलेले नाव अचानक बदल्यास प्राणी ते स्वीकारत नाहीत, हेही तितकचं खरं आहे. हॅण्डलिंग अॅण्ड ट्रेनिंग ऑफ वाईल्ड अनिमल्स: एव्हिडन्स अँड एथिक्स बेस्ड अप्रोचेस अँड बेस्ट प्रॅक्टिस इन द मॉडर्न झू , २०२३ या एस. ब्रँडो लिखित शोधनिबंधातही प्राण्यांची प्रतिक्रिया ही ट्रेनरच्या वागणुकीवर कशी अवलंबून आहे ते स्पष्ट करण्यात आलेले आहे.
एक आगळा वेगळा उपक्रम
भारतीय प्राणिसंग्रहालयात गेल्या अनेक वर्षांपासून वन्य प्राण्यांना वेगवेगळी नावं देण्याची पद्धत आहे. त्यात पौराणिक देवी, देवतांपासून सेलिब्रिटीजपर्यंतच्या नावांचा समावेश होतो. किंबहुना या वन्य प्राण्यांच्या संवर्धनाचा भाग म्हणून गुजरात मधील गीर अभयारण्यात जनसामान्यांनाही प्राण्यांना नाव देण्याच्या प्रक्रियेत सहभागी करून घेतले होते. २०१३ साली या उपक्रमा अंतर्गत सिंहाच्या पाच शावकांचे नामकरण करण्यात आले. भारतात अशा प्रकारे पार पडलेला हा पहिलाच उपक्रम होता.
अधिक वाचा: अकबराची बहीण लक्ष्मी? अकबर, सीता, तेंडुलकर आदी नावं प्राण्यांना द्यायची पद्धत कशी पडली?
गीर अभयारण्याकडून या शावकांच्या नामकरणासाठी वर्तमानपत्रे- प्रसारमाध्यमांमध्ये बातमी देण्यात आली होती. लोकांना या वनराजाच्या अपत्यांसाठी नावं सुचविण्याचे आवाहन करण्यात आले होते. दोन दिवसांच्या कालावधीतच या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला. लोकांकडून सुचवलेल्या नावांचा पूरच आला. गीर अभयारण्याच्या कर्मचाऱ्यांनी आणि सभोवतालच्या गावकऱ्यांनी २ ऑक्टोबर २०१३ रोजी ‘खुल्या लॉटरी’च्या माध्यमातून या अनेक नावांच्या संचातून २५ नावांची निवड केली. या २५ नावांची यादी फेसबुकवर पोस्ट करण्यात आली. त्यातील १५ नराची तर १० मादीची नावं होती. कारण पाच शावकांपैकी तीन नर तर दोन माद्या होत्या.
निवड केलेली २५ नावं
नर: युवराज, सुलतान, भारत, ऋतुराज, गिरीराज, शिव, आर्यन, सिम्बा, मल्हार, कर्ण, शार्दूल, मानव, संदीप, अगस्त्य आणि वनराज
मादी: वनपरी, आनंदी, मीरा, गंगा, धरा, जुंगी, कपिल, हीर, अवनी, मल्लिका
उपक्रमातील जनसामान्यांचा सहभाग
लोकांनी या २५ नावांमधून पाच बाळांसाठी पाच नावं निवडणं आवश्यक होतं. समाजमाध्यमावर ज्या नावांना जास्त मतं असतील त्या नावांची निवड करण्यात येणार होती. मालधारी समुदायातील नारायण गाढवी हे या उपक्रमात भाग घेणारे सगळ्यात वयोवृद्ध व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्याच हातून २५ नावांपैकी पहिले नाव निवडण्यात आले. अशा स्वरूपाचा उपक्रम त्यापूर्वी कधीच झाला नव्हता. त्यामुळे संवर्धनाबद्दल नक्कीच जागरूकता निर्माण झाली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. तत्कालीन डेप्युटी कॉन्झरवेटर ऑफ फॉरेस्ट डॉ. संदीप कुमार यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितले की, अभयारण्याशी संबंधित व्यक्ती, अधिकारी, गावकरी असे मिळून १२०० लोकांनी या उपक्रमात भाग घेतला होता. किंबहुना डॉ. संदीप कुमार यांनी या संपूर्ण घटनेचे वर्णन त्यांच्या ‘द मॅजेस्टिक लायन्स ऑफ गीर; अॅन अनटोल्ड स्टोरी ऑफ एशियाटिक लायन्स’, २०१५ या पुस्तकात केले आहे.
कोण होती ही पाच बाळं?
आई या शब्दाची महती इथे वेगळी सांगायला नको. मग ती मानवी आई असो की प्राण्यांमधली अपत्य जन्मानंतर तिचा दुसरा जन्मच होतोच. अशीच एक घटना २०१० झाली गीरच्या अभयारण्यात घडली. श्यामा नावाच्या सिंहिणीने चक्क पाच शावकांना जन्म दिला. सिंहिणीच्या आयुष्यात दोन ते तीन, क्वचित चार पिल्लांना जन्म देणे सामान्य आहे. परंतु पाच शावकांना जन्म ही अपवादात्मक घटना होती. परंतु दुर्दैवाने या पाच बाळांपैकी तीनच जगण्याच्या शर्यतीत तग धरू शकली. त्यात एक मादी होती. गीर अभयारण्यातील कर्मचाऱ्यांकडून त्या सिंहीणीचे नाव ‘लक्ष्मी’ ठेवण्यात आले.
योगायोग म्हणजे त्यानंतर तीन वर्षांनी लक्ष्मीने देवलीय सफारी पार्कमध्ये पाच शावकांना एकत्र जन्म दिला. अभयारण्याच्या कर्मचाऱ्यांनी सर्वोतोपरी लक्ष्मीची मदत केली, ते या निसर्गाच्या चमत्काराचे साक्षीदार ठरले. पाचही पिल्लं सुखरूप जन्माला आली, आणि अभयारण्यातील सर्वांचाच आनंद गगनात मावेनासा झाला.
अधिक वाचा: महाभारत संस्कृतातून फारसीत; अकबराच्या साहित्यिक आविष्काराबद्दल तुम्हाला माहितेय का?
पंच शावकांच्या नामकरणाचा सोहळा
या नैसर्गिक चमत्कारानंतर डॉ. सी. एन. पांडे (तत्कालीन चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन, गुजरात राज्य) यांनी सार्वजनिक नामकरणाची संकल्पना मांडली. तत्पूर्वी स्थानिक (मालधारी समुदाय) आपल्या आवडीनुसार आपल्या मित्रांची, नातेवाईकांची, जन्म स्थळाची, अंगावरील खुणेनुसार नावं ठेवत होते. २०१३ साली पहिल्यांदाच सार्वजनिक पातळीवर सर्वांच्या सहमतीने हा नामकरणाचा विधी पार पडला.
अंतिम नावांची घोषणा
२५ नावांमधून बहुमतांनी मंजूर झालेल्या पाच अंतिम नावांची घोषणा ४ ऑक्टोबर २०१३ रोजी करण्यात आली. पहिल्यांदाच अरण्यातील मालधारी समुदाय आणि सासन गावातील लोकांनी याप्रकारच्या नामकरण विधीमध्ये सहभाग घेतला होता. ‘वाईल्ड लाईफ वीक’ अर्थात वन्यजीव सप्ताह प्रतिवर्षी २ ऑक्टोबर पासून सुरु होतो. याच आठवड्याचे औचित्य साधून गुजरातचे तत्कालीन वनमंत्री गणपत वासवा यांनी ४ ऑक्टोबर रोजी गीर अभयारण्याला भेट दिली, आणि त्याच दिवशी त्या शावकांच्या नावाची घोषणा करण्यात आली.